गोपीचंद 'पडळकरांना संपवण्याचा प्रयत्न होतोय' असं भाजपा का म्हणते आहे?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भाजपाचे विधानपरिषदेतले आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही ते दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेचा विषय बनले. आता निमित्त आहे नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीत झालेल्या हल्ल्याचं.

या हल्ल्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत असे आरोप करुन पडळकरांनी त्यामागे राजकारण होतं म्हटलं, तर विधानसभेतही हा कट असून त्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी सामील आहेत असा आरोप करुन फडणवीस यांनी या विषयाचं गांभीर्य अधिक वाढवलं.

आटपाडीत दीड महिन्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेची एक व्हिडीओ क्लिप अधिवेशन सुरू असतांना समोर आली आणि हा विषय पुन्हा चर्चेला आला.

पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी हे वाद विशेषत: पश्चिम महाराष्ट्राला नवीन नाहीत. पण तरीही राजकीय विरोधाचा हा जीवावर उठण्याचा प्रकार आहे का या प्रश्नानं विधिमंडळही गंभीर झालं.

नेमकं काय झालं होतं?

7 नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यातला आटपाडीमध्ये हा प्रकार घडला होता. तेव्हा सांगली जिल्हा बँकेची निवडणूक होती. त्यावेळेस दोन्ही बाजूंमध्ये जोरदार रस्सीखेच होती.

एका ठरावावरुन वातावरण तापलं, प्रकरण शिवीगाळीपर्यंत गेल्याचं सांगण्यात येतं. याच वातावरणात राष्ट्रवादी आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आटपाडीत राडा झाला. दगडफेक झाली.

पडळकर हे स्वत:ही तिथे होते. या सगळ्या प्रकारात राजू जानकर हे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी जखमी झाले. त्यांनी पडळकरांनी आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला होता.

हा राडा इथल्या साठे चौकात सुरु असतांना पडळकर निघून गेले. नंतर पोलिसांनी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

पण आता त्या दिवशी आटपाडीत घडलेल्या या घटनेची एक व्होडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती गोपीचंद पडळकर यांनीही शेअर केली आहे आणि माध्यमांमध्येही आली आहे.

या क्लिपवरनं या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळाला. तिचाच दाखला देत देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना जीवे मारण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडिओ क्लिपमध्ये काही लोक दगडफेक करतांना दिसत आहेत. काहींच्या हातात रॉड्स सुद्धा आहेत. ती दगडफेक पडळकर यांच्या गाडीवर होत असल्याचा दावा आहे.

शिवाय त्यात दोन मोठे मालवाहतूक करणारे डंपरही दिसताहेत. त्या डंपरमधून दगड आणि तर मारहाणीचं साहित्य आणलं गेल्याचा आरोपही होतो आहे. या क्लिपमध्ये दोन पोलिसही दिसताहेत.

भाजपाचा आरोप आहे की पोलिस रेकॉर्डिंग करताहेत, पण दगड मारणाऱ्यांना पकडत नाहीत. शेवटी पडळकरांची गाडी वेगानं तिथून निघून जाते.

गोपीचंद पडळकरांचा आरोप आहे की 200 ते 300 लोकांनी सुनियोजित पद्धतीनं त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. "आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस यात स्वत: चित्रिकरण करतांना दिसत आहेत. हा सगळा कट पोलिस संरक्षणात घडवून आणला गेला. या कटामध्ये जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक, सह पोलिस अधिक्षक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील सामील आहेत.

"यांनी कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला निलंबित केलं आहे उलट माझ्यावरती कलम 307 अन्वये खोटा गुन्हा दाखल केला. पण मी एक सांगतो की महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातला माझा लढा हा मी चालूच ठेवेन," असं पडळकरांनी म्हटलं.

'महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका'

या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले आणि जोरदार चर्चा झाली. राजकीय विरोधक आहेत म्हणून पडळकरांना मारण्याचाच प्रयत्न होतो आहे असा आरोप करत विधानसभा आणि विधानपरिढद इथे दोन्हीही सभागृहात भाजपा आक्रमक झाली.

एवढी की त्यांनी पश्चिम बंगालमधल्या राजकीय हत्यांशी या घटनेची तुलना केली.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गोपीचंद पडळकर संपला पाहिजे अशी अवस्था जर होत असेल तर ते लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. ज्यांनी पडळकर यांच्याविरुद्ध 307 कलम लावलं त्यांच्याविरुद्द कारवाई झाली पाहिजे.

"वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली केली पाहिजे. नाहीतर या सभागृहांमध्ये आम्ही कोणीही स्वतंत्र आणि स्पष्ट काम करु शकणार नाही.

"अशा प्रकारे पोलीस दहशतवाद फैलावणार असतील आणि पोलिसांच्या दहशतवादामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सत्तापक्षाचे आहोत म्हणून पोलिसांच्या मदतीनं विरोधी पक्षाच्या आमदाराचा मुडदा पाडण्याचा प्रयत्न करत असतील, तर संरक्षण मागायचं कोणाला? महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका. इथे राजकीय हत्या होऊ देऊ नका," फडणवीस म्हणाले.

'समाजात बोलतांना आपण भान ठेवलं पाहिजे'

पडळकरांनी आता स्वत: पोलिसांनी दिलेला सुरक्षारक्षक न घेण्याचा निर्णय घेतला असला तरीही सरकार त्यांना सुरक्षा पुरवेल असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे आणि तिकडेच भाजपाचंही बोट आहे. फडणवीसांनी उचललेल्या मुद्द्याला दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देतांना पडळकरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा दाखला दिला आणि त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचाही. अर्थात संदर्भ हा त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल, विशेषत: पवारांबद्दल, केलेल्या वक्तव्यांचा होता.

"जर इतिहास काढून पाहिला तर आमदार पडळकरांवर वेगवेगळे 15 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्या बंधूंवर 10 गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांनाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

"आपण समाजामध्ये बोलत असतांना, वागत असतांना एक पथ्य आणि भान ठेवलं पाहिजे. ते भान जर नाही ठेवलं तर मग अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण तरीही पडळकरांच्या सुरक्षेबाबत सरकारनं सूचना दिलेल्या आहेत. स्टेशन डायरीतल्या नोंदी, व्हिडिओ क्लिप यांची तपासणी करुन कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी हा इतिहास

गोपीचंद पडळकर हे राज्यभरातल्या चर्चेत आले 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळेस जेव्हा त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित बहुजन आघाडी' तर्फे सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवली. ते ही निवडणूक हरले. पण त्यापूर्वीपासूनच धनगर आरक्षणाच्या चळवळीतून पुढे आलेले पडळकर हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांच्या जवळचे आहेत अशी त्यांची प्रतिमा होती. विधानसभा निवडणुकीवेळेस ते भाजपात गेले. तिथे यश आलं नाही, पण त्यांच्या कामाचं फळ म्हणून भाजपानं त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं.

पडळकर सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत ते त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच्या टीकेमुळे आणि सततच्या संघर्षामुळे. त्यातही ते शरद पवार, अजित पवार या राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांवर थेट टीका करतात.

त्यांची वक्तव्य अनेकदा वादग्रस्त ठरतात आणि रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडतात. आता जसा आटपाडीत त्यांच्यावर हल्ला झाला तसंच काही महिन्यांपूर्वी मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीअगोदर त्यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती.

शरद पवार यांच्याविषयी बोलतांना त्यांनी अनेकदा आक्रमक, कधी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. एकदा पवारांच्या विरोधी पक्षांसोबतच्या दिल्लीतल्या बैठकीबद्दल ते म्हणाले, "मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा."

पवारांविषयी बोलतांना पडळकरांनी त्यांना कोरोनाची उपमा दिल्यानं मोठा वाद महाराष्ट्रात झाला होता आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते होणाऱ्या अनावरणाला विरोध करतांना ते म्हणाले होते, " शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नये."

अजित पवार यांच्यावरही पडळकर सतत टीका करतात. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात 'अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर चार दिवसात राज्य विकतील' अशा आशयाचं विधान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अजित पवारांनीही एखादा सदस्य असं बोलतो यावर नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्या वादाचा इतिहास मोठा आहे. आता आटपाडीच्या घटनेनं तो पुन्हा अधोरेखित केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)