You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुमंत रुईकर कोण होते? जे उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी चालले
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावं यासाठी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पायी निघालेले शिवसैनिक सुमंत रूईकर यांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेना परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवासादरम्यान अचानक तब्येत बिघडल्याने कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रुईकर यांच्या मृत्यूबाबत बोलताना नगरविकासमंत्री आणि वरिष्ठ शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले, "सुमंत रूईकर यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शिवसेना उचलणार आहे."
उद्धव ठाकरेंवर नोव्हेंबर महिन्यात मणक्याच्या आजारावर शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे सावरत आहेत. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून सुमंत रूईकर यांनी पायी सुरू केला होता.
सुमंत रूईकर यांचा मृत्यू कसा झाला?
बीड ते तिरूपती बालाजी 1100 किलोमीटरचा प्रवास, सुमंत रूईकर आणि त्यांचे सहकारी श्रीधर जाधव यांनी 2 डिसेंबरला पायी सुरू केला होता.
मात्र प्रवासात 25 डिसेंबरला कर्नाटकच्या रायचूर शहरात त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमंत रूईकर यांचं अकाली निधन झालं.
पत्नी कीर्ती रूईकर पत्रकारांशी बोलताना सांगतात, "त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. प्रवासादरम्यान ताप होता. तरीदेखील त्यांनी परत न येता, प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला." आणि, तीन आठवड्यानंतर अचानक मृत्यूची बातमी धडकली.
सुमंत रूईकर आणि त्यांचे सहकारी दररोज 35 किलोमीटर अंतर पायी चालत होते. शनिवारी ते कर्नाटकातील कडप्पापर्यंत पोहोचले होते.
सुमंत रूईकर यांचे चुलत भाऊ लक्ष्मीकांत रूईकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "त्यांचा दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरच्यांना फोन येत होता. पण एक दिवस फोन आला नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार करून चौकशी सुरू केली." फोन ट्रॅक केला तर, स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली.
रोज 30-35 किलोमीटर पायी चालल्यामुळे सुमंत रूईकर यांना खूप थकवा जाणवत होता. घरच्यांनी परत येण्याची विनंती केली. पण, त्यांनी कोणाचच ऐकलं नाही.
त्यांना जवळून ओळखणारे गणेश तालखेडकर यांनी सांगितलं, "घरातून निघतानाच त्यांच्या अंगात ताप होता. प्रवासात तब्येत जास्त बिघडली आणि ताप डोक्यात गेला," ते चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडले होते.
ते पुढे म्हणाले, "पहिले दोन दिवस योग्य उपचार मिळाले नाहीत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू झाले. पण शरीराने औषधांना प्रतिसाद दिला नाही." किडनी आणि यकृताने काम करणं हळूहळू बंद केलं, त्यात कावीळ झाली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
प्रवासादरम्यानच्या व्हिडीओत काय म्हणाले सुमंत रूईकर?
सुमंत रूईकर यांनी आपल्या पायी प्रवासाची माहिती देण्यासाठी या प्रवासादरम्यान एक व्हिडीओ बनवला होता.
या व्हिडीओत ते म्हणाले होते, "उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावं, येणाऱ्या निवडणुकीत महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावा यासाठी मी पायी यात्रा सुरू केलीये."
प्रवासाला 15 दिवस उलटल्यानंतर सुमंत रूईकर यांनी हा व्हिडीओ बनवला होता.
ते पुढे म्हणाले होते, "आत्तापर्यंत 525 किलोमीटर पायी चाललोय. अजून 15 दिवसांचा प्रवास बाकी आहे. तिरूपती बालाजीला 31 डिसेंबरला पोहोचू."
उद्धव ठाकरेंना दिर्घायुष्य मिळावं यासाठी तिरुपतीला साकडं घालणार असल्याचंही, त्यांनी व्हिडीओत पुढे म्हटलं.
उद्धव ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत त्यांनी हा व्हिडीओ संपवला होता.
कोण होते सुमंत रूईकर?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक कडवा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत रूईकर यांची ओळख होती.
शिवसेनेसोबतचा त्यांचा प्रवास 1984 मध्ये सुरू झाला. गेली 37 वर्षं ते बीड जिल्ह्यात शिवसेनेसोबत जोडले होते.
पत्नी किर्ती सांगतात, "शिवसेनेविषयी विरोधक किंवा कोणी काही बोललं तर त्यांना प्रचंड राग येत होता. त्यांना शिवसेना किंवा नेत्यांवरील टीका सहन होत नव्हती. त्यांनी लोकांची सेवा केली. पदाचा कधी लोभ ठेवला नाही," शिवसेनेची त्यांनी निस्वार्थीपणे सेवा केली.
पंचायत समिती सीओंच्या कार्यालयात केलेल्या तोडफोड केल्याप्रकरणी सुमंत यांना जेलची हवा खावी लागली होती. तर, बीडमध्ये शिवसेनेचा उपशहरप्रमुख म्हणूनही सुमंत रूईकर यांनी काम केलं होतं.
सुमंत यांचे चुलत भाऊ लक्ष्मीकांत रूईकर पुढे सांगतात, "दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा बीडमध्ये 1984 साली झाली. सुमंत त्यावेळी 16-17 वर्षांचा असेल. तेव्हा तो शिवसेनेशी जोडला गेला, तो कायमचा."
नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा 2006 मध्ये त्यांचा पराभव झाला. पण, 2011 मध्ये विजय मिळवून ते नगरसेवक बनले. पण, 2016 मध्ये त्यांचा पुन्हा पराभव झाला.
शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष सचिन मुळीक सांगतात, "अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सुमंत यांची ओळख होती."
सुमंत यांचं उद्धव ठाकरेंवर एवढं प्रेम का होतं?
सुमंत यांचे शिवसेनेतील सहकारी अनिल जगताप म्हणाले, सुमंतचं ठाकरे कुटुंबावर प्रचंड प्रेम होतं. ते बाळासाहेबांच्या भगव्याचे पाईक होते.
तर चुलत भाऊ लक्ष्मीकांत, त्याचं शिवसेनेप्रती असलेलं प्रेम, म्हणजे 'वेड' असल्याचं सांगतात. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंनी हाती घेतली. त्यामुळे त्यांची उद्धव ठाकरेंप्रती निष्ठा होती.
उद्धव ठाकरेंसाठी बीड ते तिरूपती बालाजी हा सुमंत रईकर यांचा पहिला प्रवास नव्हता.
लक्ष्मीकांत रूईकर पुढे सांगतात, "2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल का नाही? यावर चर्चा सरू होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी पायी येईन असा नवस त्यांनी बालाजीला केला." उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नवस पूर्ण करण्यासाठी सुमंत यांनी पायी प्रवास केला.
त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात सुमंत रूईकर यांची यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला होता.
कुटुंबीयांची मागणी काय?
सुमंत रूईकर यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. ते घरातील एकमेव कर्ते व्यक्ती होते.
घरातील कुटुंबप्रमुखाचं अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबीयांसमोर पुढे काय, असा प्रश्न पडलाय.
त्यांच्या पत्नी किर्ती म्हणाल्या, "माझा मुलगा लहान आहे. भाड्याच्या घरात राहातो. राहायला स्वत:च घर नाहीये. मला आता कोणाचाच सहारा नाही."
सुमंत यांच्याबाबत बोलताना कीर्ती यांच्या डोळ्यात अश्रू दिसून येत होते. त्या पुढे सांगतात, "सुमंत आता आमच्यासोबत नाहीत. आतातरी उद्धव साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, मला मदत करावी एवढीच माझी अपेक्षा आहे."
सुमंत यांच्या मृत्यूनंतर शिवसेना नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सुमंत रूईकर यांच्या निधनाने त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलंय. रूईकर कुटुंबीयांची पूर्ण जबाबदारी शिवसेना उचलणार आहे." तर, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रूईकर कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केलीये.
तर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी तातडीची मदत म्हणून 50 हजार रूपयांची मदत केलीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)