राहुल गांधी : ‘हिंदुत्ववादी हिंसा पसरवतात, किंमत मात्र हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाई यांना मोजावी लागते’, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. हिंदुत्ववादी हिंसा पसरवतात - राहुल गांधी
हिंदुत्ववादी हिंसा पसरवतात आणि त्याची किंमत मात्र हिंदु-मुस्लिम-शिख-ईसाई अशा सर्वांना मोजावी लागते, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हरिद्वारमध्ये झालेल्या धर्म संसदेमध्ये काही वादग्रस्त वक्तव्य केल्याची बातमी आली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य ट्वीटद्वारे केलं आहे.
काँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांकडूनही धर्मसंसदेतील वक्तव्यावर टीका केली जात असून, वक्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
जमियत उलेमा-ए-हिंद संस्थेनं व्हायरल व्हीडिओ प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून दखल घेण्याची मागणी केली आहे.

फोटो स्रोत, BBC/VARSHA SINGH
एमआयएमनंदेखील या धर्मसंसदेतील भाषणांविरोधात तक्रार केली. धर्ससंसदेत भाजप सरकार देखील सामील असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. तसंच कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
2. एसटी विलिनीकरण शक्य नव्हतं तर जाहीरनाम्यात का उल्लेख केला? - गोपीचंद पडळकर
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. पवार कुटुंबावर विश्वास ठेवू नका हे एसटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून सांगत होतो, असं पडळकर म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एसटीचं विलिनीकरण करणं कुणालाही शक्य नसल्याचं वक्तव्य करत याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. यावरूनही पडळकरांनी टीका केली. टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
विलीनीकरण शक्य नाही हे अजित पवारांना माहिती होतं, तर राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात उल्लेख का केला होता? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC
एसटी कर्मचारी ज्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला, असा आरोपही पडळकरांनी पवारांवर केला आहे.
3.भारत-पाकिस्तान सीमेवर मिग-21 विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू
जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचं मिग 21 हे विमान कोसळलं आहे. त्यात पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. लोकमतनं ही माहिती दिलीय.
जैसलमेरमधील सुदाशिरी या गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय याचा तपास हवाई दलाकडून केला जाणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
विमान क्रॅश झालं त्यावेळी मोठा आवाज झाला आणि त्यामुळं परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर हे हवाई दलाचं विमान असल्याची माहिती मिळाली.
याठिकाणी पोहोचलेल्या लोकांनी वैमानिकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण विमानाला लागलेल्या आगीमध्ये ते खूप भाजले होते, त्यामुळं त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
4. बूस्टर डोस संदर्भात ३००० जणांवर चाचणी करून घेणार निर्णय
कोरोनापासून अधिक संरक्षण मिळण्यासाठी दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस द्यायचा की नाही याचा अभ्यास करण्यासाठी 3 हजार जणांवर चाचणी केली जाणार आहे. दिव्य मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
केंद्र सरकारनं यासाठी अभ्यास करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्यांना तिसरा बूस्टर डोस देऊन ही चाचणी केली जाणार आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतर पाच महिन्यांनी लसीचा प्रभाव 70% पर्यंत कमी होतो. बूस्टर डोसमुळं कोरोनाच्या संसर्गानंतरही गंभीर आजारी पडण्यापासून संरक्षण मिळतं असंही समोर आलं आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES / ARTUR CARVALHO
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक-V या लसींचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. त्यातून लसीपासून मिळालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकू शकते याचा अभ्यास केला जाईल.
ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी याबाबचं धोरण ठरवण्याचा विचार असल्याचं म्हटलं आहे. ओमायक्रॉन विरुद्ध लसीच्या परिणामकारकतेची चाचणी घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं.
5. कडाक्याच्या थंडीमध्ये आता पावसाची शक्यता
कडाक्याच्या थंडीमुळं संपूर्ण देशामध्ये सध्या हुडहुडी भरल्याचं चित्र आहे. राज्यातही सगळीकडे कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, एकिकडं अशी थंडी असताना आता डिसेंबर महिन्यामध्येच राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
राज्यामध्ये 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना यासह जळगाव आणि विदर्भातील गोंदिया, भंडारा, वर्धा नागपूर, अकोला, अमरावती अशा ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























