ओमिक्रॉन महाराष्ट्र : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सज्ज आहे?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात धडकण्याची भीती व्यक्त केली जातेय.

जगभरात ओमिक्रॅानबाधित रूग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे अत्यंत संसर्गजन्य असणारा हा व्हेरियंट तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतो.

हा व्हेरियंट सौम्य दिसत असला तरी, "मोठ्या प्रमाणात पसरला तर सहव्याधी असणाऱ्यांना गंभीर आजार आणि मृत्यू होऊ शकतात," असं महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॅा. ओक सांगतात.

तर ओमिक्रॅानवर नियंत्रणासाठी "वॅाररूम तयार करा", अशी सूचना केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने केलीये.

मग या परिस्थितीत ओमिक्रॅानशी मुकाबला करण्यात महाराष्ट्र सज्ज आहे का? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची सद्यस्थिती काय?

राज्यात गेले दोन दिवस कोरोना रुग्णांची संख्या हजारावर पोहोचलीये. तर मुंबईत गेल्या दोन दिवसात 490 आणि 603 रूग्णांची नोंद झालीये.

सद्य स्थितीत राज्यात,

  • कोरोनासंसर्गाचा साप्ताहिक पॅाझिटिव्हीटी दर 0.80 टक्के
  • गेल्या तीन महिन्यात सरासरी 700 कोरोना रुग्णांची नोंद
  • कोरोनाचे 7,800 हजार अॅक्टिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत

मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रूग्ण आहेत.

महाराष्ट्रात 88 ओमिक्रॉन संसर्गबाधित

भारतात आत्तापर्यंत 350 पेक्षा जास्त ओमिक्रॅानबाधित रुग्ण नोंदवण्यात आलेत. यातील सर्वाधिक 88 रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

ही धोक्याची घंटा आहे? कोव्हिड टास्कफोर्सचे डॅा. शशांक जोशी म्हणाले, "अमेरिका आणि युरोपात डेल्टा आणि ओमिक्रॅान यामुळे छोटी त्सूनामी आलीये. हा भारताला धोक्याचा इशारा आहे. आपण घाबरून न जाता काळजी घेतली पाहिजे."

ओमिक्रॅानचा रॅपिड जनरेशन रेट 5 असून रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दीड ते तीन दिवस आहे.

"ओमिक्रॅानमुळे मृत्यू होत नाहीत असं म्हटलं जात होत. पण पाश्चात्य देशांमधून येणाऱ्या माहितीनुसार मृत्यू होत आहेत. रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे," डॅा. ओक पुढे सांगतात.

त्यामुळे महाराष्ट्र ऑक्सिजन, बेड्सची संख्या याबाबत सज्ज आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.

राज्यात ऑक्सिजनची सद्यस्थिती काय?

डेल्टा व्हेरियंटमुळे पसरलेल्या कोरोना संसर्गात रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज दिसून आली.

पहिल्या लाटेपासून धडा घेत सरकारने ऑक्सिजन प्लांटचं जाळ निर्माण करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, "राज्याला ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार," असा दावा केला होता.

आता तिसरी लाट येण्याची संभाव्य भीती पाहता महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झालाय? तर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,

  • राज्यभरात 569 (pressure swing adsorption) ऑक्सिजन प्लांटच्या माध्यनातून 601 मेटृीक टन ऑक्सिजन निर्मितीचं उद्दीष्ट
  • 64 टक्के म्हणजे 366 ऑक्सिजन प्लांटचं काम पूर्ण
  • पूर्ण झालेल्या प्लांटची ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता एकूण टार्गेटच्या 63 टक्के, 379 मेटृीक टन

धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीत एकही प्लांट पूर्ण झालेला नाही. तर, आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात मंजूर 7 पैकी फक्त 2 प्लांट पूर्ण झाले आहेत.

वर्धा, सिधुदुर्ग, गोंदिया, परभणी, नांदेड आणि उस्मानाबादमध्येही खूप कमी प्रमाणात काम पूर्ण झालंय.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, "26 प्लांटची मंजुरी मिळाली आहे. 15 सुरू झालेत तर, 11 प्लांटचं काम सुरू आहे. येत्या महिनाभरात प्लांट कार्यान्वित होतील."

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज 1700 मेटृीक टनपर्यंत पोहोचली होती. सरकारने उद्योगाला लागणारा सर्व ऑक्सिजन कोरोनासाठी वळवला होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त प्रोजेक्ट संचालक डॅा. सतीश पवार म्हणतात, "राज्यात ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1350 मेटृीक टन आहे. सद्य स्थितीत कोरोना आणि इतर रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज 125 मेटृीक टन आहे."

मेडिकल ऑक्सिजनचा साठा करून ठेवण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं ठरवलं.

सरकारने 5961 मेटृीक टन क्षमतेचे 397 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) स्टोरेज टॅंक बनवण्याचं ठरवलं होतं. यातील 265 टॅंक बांधून पूर्ण झालेत.

सातारा, रत्नागिरी, नंदूरबार आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी काम पूर्ण झालंय.

राज्यातील बेड्सची क्षमता?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना बेड्स मिळत नव्हते. पण दुसऱ्या लाटेत सरकारने बेड्सची संख्या वाढवत नेली.

ओमिक्रॅान तीव्रतेने पसरणारा असल्याने येणाऱ्या काळात रुग्णसंखा वाढली तर बेड्स उपलब्ध आहेत? आम्ही आरोग्यविभागाला ही माहिती विचारली.

आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोव्हिड रुग्णालयात, 55 हजार ऑक्सिजन बेड्स आहेत. ICU बेड्सची संख्या 21619 आहे, तर व्हेन्टिलेटर्सची संख्या 10 हजारापेक्षा जास्त आहे.

दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॅानचा संसर्ग लहान मुलांनाही झालाय. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे सरकारने लहान मुलांसाठी ऑक्सिजन, व्हॅन्टिलेटर्स बेड तयार केले आहेत. त्यासाठी,.

  • 52 लहान मुलांची रुग्णालयं
  • लहान मुलांच्या संशयीत कोरोना रुग्णांसाठी 6 हजार बेड्स
  • ऑक्सिजन बेड्सची क्षमता 5,136
  • iCU बेड्स 2,965 आणि 977 बेड्स अत्यंत लहान मुलांसाठी राखून ठेवण्यात आलेत
  • 1390 लहान मुलांचे व्हॅन्टिलेटर्स

राज्यातील डेडिकेटेड कोव्हिड सेंटरमध्ये 76 हजार ऑक्सिजन बेड्स आणि 16 हजारावर ICU बेड्स आहेत.

मुंबईत ऑक्सिजन आणि बेड्स पुरेसे आहेत?

पहिल्या लाटेत मुंबईत काही प्रमाणात बेड्सचा तुटवडा जाणवला. पण पालिकेने जंबो सेंटर उभारून बेड्सची संख्या वाढवली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत दिवसाला 11 हजारापेक्षा जास्त रुग्ण येऊन सुद्धा बेड्सचा त्रास लोकांना झाला नाही.

मुंबईमध्ये 1987 ICU, 1158 व्हॅन्टिलेटर्स आणि 6793 ऑक्सिजन बेड्स आहेत. मुंबईत सद्य स्थितीत 30 बेड्स कोरोनारुग्णांसाठी ठेवण्यात आलेत.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी सांगतात, "मुंबईत बीकेसी, गोरेगाव, मुलुंड, भायखळा आणि वरळी जंबो कोव्हिड सेंटर सुरू आहेत."

तर दहिसर, मालाड, गोरेगाव फेज-2, सोमय्या आणि कांजूरमार्ग सेंटर स्टॅंडबायवर ठेवण्यात आलीयेत. यांचा वापर रुग्णसंख्या वाढली तर करण्यात येईल.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनचा हाहाःकार माजला होता. पण मुंबई मॅाडेलची पंतप्रधानांनी स्तुती केली होती.

जानेवारीपर्यंत मुंबंई शहरातील सर्व 42 ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने मुंबई महापालिकेला 690 मेटृीक टनचं टार्गेट दिलं होतं.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी पुढे सांगतात, "ऑक्सिजन प्लांटची टृायल-रन करत आहोत. जेणेकरून गळती कुठे आहे का हे तपासून पाहता येईल. आमची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1150 मेटृीक टन आहे."

मुंबईत तिसऱ्या लाटेची शक्यता पहाता आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

लसीकरण आणि औषधं

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत आपल्याकडे लढण्यासाठी औषधं नव्हती. पण दुसरी लाट येता-येता कोव्हिडविरोधी लस उपलब्ध झालीये.

आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात, "महाराष्ट्रात लशीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या 5 कोटीपेक्षा जास्त आहे. तर लशीचा एक डोस 7 कोटीपेक्षा जास्त लोकांना देण्यात आलाय."

पण अधिकाऱ्यांना चिंता दुसरा डोस न घेतलेल्यांची आहे. जी संख्या 90 लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनाविरोधी लशीचे जवळपास 1 कोटी डोस राज्यात उपलब्ध आहेत.

दुसऱ्या लाटेत मुंबई महापालिकेने 2 लाख रेमडेसिव्हिर खरेदी करण्याचा विचार केला होता. त्यापैकी 65 हजार वापरण्यात आले. पालिका अधिकारी सांगतात गरज पडल्यास उरलेले 1.35 लाख रेमडेसिव्हिर औषधं विकत घेण्यात येतील.

कोरोनावर उपचारासाठी मोनोक्लोनल अन्टीबॅाडीज उपलब्ध आहेत. यांचा वापर अनेकांवर करण्यात आलाय. अतिरिक्त आयुक्त पुढे म्हणतात, पालिकेकडे 5 हजार मोनोक्लोनल अन्टीबॅाडीज उपलब्ध आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)