You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप खासदारानं व्यासपीठावरच पैलवानाच्या कानाखाली मारली, व्हीडिओ व्हायरल
- Author, रवी प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी रांचीतील क्रीडाग्राममध्ये आयोजित 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेदरम्यान एका पैलवानाला व्यासपीठावरच थापड लगावली आहे.
ही घटना 15 डिसेंबरला घडली आहे. या तीन दिवसीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे ते प्रमुख अतिथी होते. ही घटना याच सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडली. त्यावेळी स्टेडियममघ्ये अनेक लोक आणि खेळाडू उपस्थित होते.
तीन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तो ट्विटदेखील केला आहे.
युवक काँग्रसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनीदेखील ही क्लिप ट्विट करत आरोप केला आहे. हे भाजपचे खासदार आहेत, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. त्यांच्या या ट्विटला 2700 पेक्षा अधिक वेळा रिट्विट करण्यात आलं आहे.
काही पत्रकार आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीदेखील ही व्हीडिओ क्लिप ट्विट केली आहे. शनिवारी सकाळपासून 13 सेकंदाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच या पहिलवानाबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा पहिलवानदेखील उत्तर प्रदेशचाच राहणारा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि झारखंड कुस्ती संघाचे अध्यक्ष भोलानाथ सिंह यांनी बीबीसीबरोबर बोलताना या व्हीडिओबाबत दुजोरा दिला आहे. कुस्ती संघाच्या अध्यक्षांनी आधी त्या पहिलवानाला समजावण्याचा प्रयत्नही केला होता, असं ते म्हणाले.
"त्यावेळी अंडर-15 ची नॅशनल चॅम्पियनशिप सुरू होती. वय जास्त असल्यानं उत्तर प्रदेशच्या पहिलवानाला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं आधी खाली असलेल्या लोकांशी वाद घातले. त्यानंतर तो पहिलवान व्यासपाठीवर आला. त्यांना आधी समजावण्यातही आलं होतं. तरीही त्यांनी कुस्ती महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी वाद घालायला सुरुवात केली," असं ते म्हणाले.
"याच दरम्यान ही घटना घडली. त्यावेळी कोणीही विरोध केला नाही. त्या पहिलवानानंही काही म्हटलं नाही. मात्र आता माध्यमांमध्ये अचानक बातम्या कशा आल्या माहिती नाही. अनेक पत्रकार मला फोन करत आहेत. पण याबाबत बृजभूषण सिंह यांनाच विचारणं योग्य ठरेल," असं ते म्हणाले.
का घडली घटना?
चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या पहिलवानानं ओळख सार्वजनिक न करण्याच्या अटीवर बीबीसीबरोबर बोलण्याची तयारी दर्शवली.
हा पहिलवान यूपीहून रांचीला आला होता आणि तो स्वतःला स्पर्धेत सहभागी करू दिलं जावं यासाठी आग्रह करत होता, असं त्यानं सांगितलं.
ही स्पर्धा 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी होती. त्यांचं वय अधिक असल्यामुळं आयोजकांनी त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी नाकारली होती.
त्यांतर त्याची तक्रार करण्यासाठी ते मंचावर गेले. त्यांचा भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांशी काहीतरी वाद झाला.
त्यानंतर ब्रजभूषण शरण सिंह यांनी त्यांना व्यासपीठावरच थापड मारली त्यावेळी त्याठिकाणी अनेक लोक उपस्थित होते आणि सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता.
यामुळं लोकांना आश्चर्य वाटलं, पण त्यानंतर कार्यक्रम सुरुच राहिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)