इंदिरा गांधींना विसरणं म्हणजे भारतमातेला विसरणं-सामना #5मोठ्याबातम्या

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) इंदिरा गांधींना विसरणं म्हणजे भारतमातेला विसरणं - सामना

1971 च्या बांगलादेश युद्धाला यंदा 50 वर्षे पूर्ण झाली. भारतानं मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयानिमित्त 'विजय दिवस' साजरा करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख टाळला. हाच धागा पकडत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजप आणि मोदींवर निशाणा साधण्यात आलाय.

'सामना'च्या संपादकीयमध्ये म्हटलंय की, "केंद्र सरकारनं विजय दिवस साजरा केला, पण पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार इंदिराजींना विसरले. इंदिरा गांधींना श्रेय द्यायचे नाकारले तरी बांगलादेश युद्धाचा विजय त्यांच्याच नावावर नोंदवला जाईल."

"इंदिरा गांधींना वगळून देशाचाच नव्हे, जगाचा इतिहास कुणालाच लिहिता येणार नाही. पण आपल्या देशातील 'खुज्या' राज्यकर्त्यांना हे सांगणार कोण? लहान मनाच्या राज्यकर्त्याकडून देश महान कसा होणार?" असं म्हणत या संपादकीय लेखातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आलाय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"काँग्रेस पक्षाशी तुमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असू शकतात. तरीही देश घडविणाऱ्या नेत्यांविषयी आकस ठेवणे हे सच्च्या हिंदुस्थानीचे लक्षण नाही. इंदिरा गांधींचा पराक्रम विसरणे, बांगलादेश युद्धातील त्यांचे विजयी योगदान विसरणे म्हणजे भारतमातेला विसरणे," असं या संपादकीय लेखात म्हटलंय.

"देशभक्ती दुर्मीळ झाली आणि बेइमानी बेछूटपणे वावरू लागली तर राष्ट्र हे राष्ट्र राहत नाही. स्वातंत्र्याचा लोप कधी झाला हे कळत नाही. आज दुसरे काय चालले आहे," असंही या संपादकीय लेखात शेवट म्हटलंय.

2) 'बिलं भरावीच लागतील, फुकट वीज दिल्यास महावितरण बंद पडेल'

"वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर बिल भरावेच लागेल," असं महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. लोकमतनं ही बातमी दिलीय.

फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल आणि यात खासगी कंपन्या येतील, असा इशाराही नितीन राऊत यांनी दिलाय.

नितीन राऊत

फोटो स्रोत, Twitter/Nitin Raut

नितीन राऊत म्हणाले, "महावितरण फुकटात वीज विकत घेत नाही. कोणत्याही कंपन्या महावितरणला वीज फुकट देत नाहीत. वीज निर्मिती करण्यास खर्च लागतो."

शेतकरी वीज बिलावरून भाजप आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली सक्तीने करू नये, वीज बिलात सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर राऊत यांनी वीज बिल भरावेच लागेल, अशी भूमिका घेतली.

3) काँग्रेस विचारांचा माणूसच खरा देशभक्त - विजय वडेट्टीवार

"काँग्रेस विचारांचा माणूसच खरा देशभक्त आहे. आज जे दिल्लीच्या तख्तावर बसलेत ते स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना इंग्रजांचे पाय चाटत होते," अशी टीका काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

चंद्रपुरातल्या गोंडपिंपरीत वडेट्टीवार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

विजय वडेट्टीवार

फोटो स्रोत, Twitter/Vijay Wadettiwar

फोटो कॅप्शन, विजय वडेट्टीवार

भाषणात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "माझ्यापुढे बसलेल्या देशभक्त, राष्ट्रभक्त मतदारांनो.. मुद्दाम तुमचा उल्लेख मी देशभक्त केला. तुम्ही ज्या विचाराने इथे बसलात तोच विचार देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. तुमचा विचार देशासाठी रक्त सांडत होता."

राहुल गांधींच्या 'हिंदू आणि हिंदुत्ववादी' या मुद्द्याचंही वडेट्टीवारांनी समर्थन केलं.

वडेट्टीवार म्हणाले, "आम्ही हिंदू आहोत, हिंदुत्ववादी नाहीत. हिंदुत्ववादी धर्माधर्मात आग लावतात. हिंदू बांधव सर्व धर्माला सोबत घेऊन चालतात."

4) मध्य प्रदेशातही ओबीसींचं राजकीय आरक्षण रोखलं

महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील इतर मागासवर्गीयांचं (ओबीसी) राजकीय आरक्षण रोखण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. लाईव्ह लॉ संकेतस्थळानं ही बातमी दिलीय.

मध्य प्रदेश निवडणूक आयोगानं 4 डिसेंबर 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती आणलीय.

न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठानं ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवर सर्वसाधारण जागा म्हणूनच निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

याआधी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलंय.

5) कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भाजपसोबत युती

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नव्या पक्षानं पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

भाजपचे पंजाबचे प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चर्चा केली आणि त्यानंतर युतीची घोषणा केली.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसचा 'हात' सोडला आणि त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली.

कॅप्टन अमरिंदर सिंह स्वबळावर लढणार की भाजपसोबत जाणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली होती. भाजपसोबत युतीची घोषणा करून त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)