नरेंद्र मोदी : महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही, सामनातून मोदींवर टीका #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवरील बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही - सामना

मथुरेत मंदिरांचं आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल, असं कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. महागाई, बेरोजगारी या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही, असं स्पष्ट मत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात मांडण्यात आलं आहे.

सामनाच्या आजच्या (15 डिसेंबर) अग्रलेखात काशी मंदिराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका करण्यात आली.

अग्रलेखात पुढे म्हटलं, मंदिरांचा जीर्णोद्धार हा वेगळा विषय आहे. ज्या गंगेच्या पात्रात पंतप्रधान मोदी यांनी काल डुबकी मारली त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिली होती. पंतप्रधान नव्हे तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्यावेळी त्याठिकाणी जाणं गरजेचं होतं. पण मोदी आज झगमगाटाच्या वातावरणात तिथं गेले, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

2. हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्षपद निवडणूक गुप्त मतदानाने घ्या - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीत हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असं आव्हान भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधीसुद्धा राज्य सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, त्यामुळेच विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. ही बातमी लोकमतने दिली.

3. डॉ. पायल तडवी प्रकरण : दोन आरोपी डॉक्टरांना स्वगृही परतण्याची सशर्त परवानगी

मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींपैकी दोन महिला आरोपी डॉक्टरांना स्वगृही परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

वरिष्ठ सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवीनं नायर रुग्णालयाच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

या प्रकरणात डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना ऍट्रॉसिटी आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांन्वय अटक करण्यात आली होती. कालांतरानं या तिघींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करताना कठोर अटीशर्थी घातल्या.

त्यामध्ये सूट मिळावी, म्हणून डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केलं होतं. हा अर्ज स्वीकारात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी वरील निर्णय दिला. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

4. संजय राऊत यांना रोड रोमिओंचे ब्रँड अॅम्बेसिडर जाहीर करावं - चित्रा वाघ

महाविकास आघाडी सरकारने शिवसेना खासदार संजय राऊत यांना रोड रोमिओंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसिडर म्हणून तरी जाहीर करावं, अशा शब्दांत भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी दिल्लीत भाजप नेत्यांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यासंदर्भात बोलताना चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केल्याचं दिसून आलं.

त्या म्हणाल्या, "जाहीरपणे शिवीगाळ करत 'रोड रोमिओ' सारखी भाषा करणाऱ्या सर्वज्ञानी संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला. पण अद्याप राज्य सरकारनं ना दखल घेतली ना कारवाई करण्याची हिम्मत दाखवली, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

5. रुपाली पाटील यांचा मनसेला जय महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली पाटील या मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून प्रकाशझोतात आल्या होत्या.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज आणि पक्षाला रामराम ठोकतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच पाटील यांनी राजीनामा दिल्याने राजकीय विश्वात याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)