You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनिल देशमुखांनी पैशांची मागणी केली नव्हती- सचिन वाझेंचा नवा खुलासा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पैशाची मागणी केली नसल्याचं निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगासमोर सांगितलंय. त्याचसोबत देशमुख यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही पैसे मागितले नाहीत, असं वाझे यांनी आयोगाला सांगितलंय.
अनिल देशमुखांचे वकील गिरीश कुलकर्णी यांच्याकडून सचिन वाझेंची चांदिवाल आयोगासमोर उलट तपासणी घेण्यात येत आहे.
यादरम्यान 'अनिल देशमुख किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून काही डिमांड करण्यात आली होती?' असा सवाल वकिलांकडून सचिन वाझे यांना करण्यात आला. वाझेंनी त्यांच 'नाही' असं उत्तर दिलं.
देशमुखांकडून अधिकृत किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी पैशांची मागणी केली होती का, या प्रश्नाचं उत्तरही वाझे यांनी 'नाही' असं दिलं.
तर देशमुख यांच्याकडून किंवा कार्यालयातून बारमालकांकडून पैसे उकळण्यास सांगितलं होतं का, यावर आपल्याला आठवत नसल्याचं सचिन वाझे म्हणाले.
अनिल देशमुख यांनी आपल्याला शहरातील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याची सूचना केल्याचा दावा सचिन वाझे यांनी केला होता.
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून ते सेवा बजावत होते. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंहांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय - नवाब मलिक
'केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंहांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण एक दिवस NIA ला खरं काय आहे ते सांगावं लागेल, सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.
केंद्र सरकार आणि भाजपसोबत परमबीर सिंह यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं डील झालं होतं आणि त्यातूनच अनिल देशमुखांवर खोटे आरोप लावण्यात आल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
आपल्या घरावर धाड पडण्याची शक्यता असल्याचं सांगणारं ट्वीटही नवाब मलिक यांनी 10 डिसेंबरला केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)