झाकिर हुसैन यांना श्रीरंगम मंदिरातून बाहेर काढण्यात आलं का? प्रकरण काय?

    • Author, मुरलीधरन विश्वनाथन
    • Role, बीबीसी तमिळ
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

तामिळनाडूतील भरतनाट्यम नर्तक झाकीर हुसैन यांना श्रीरंगम येथीर रंगनाथन मंदिरातून बाहेर हाकलून दिल्याच्या घटनेमुळं वादाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन तमिळनाडूचे हिंदू धार्मिक व्यवहार राज्यमंत्री शेखर बाबू यांनी दिलं.

झाकीर हुसैन हे शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी श्रीरंगम येथील रंगनाथन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी असलेले रंगराजन नरसिंहन यांनी त्यांना मंदिरातून बाहेर हाकलून लावल्याचा आरोप झाकीर हुसैन यांनी केला आहे.

"मला केवळ माझ्या नावामुळं एका धर्मांधानं माझी श्रद्धा असलेल्या मंदिरातून बाहेर काढलं. माझा अपमान करण्यात आला. मात्र माझ्या हृदयात देव आहे," असं झाकीर हुसैन यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या प्रकारामुळं हुसैन यांना प्रचंड धक्का बसला. माझ्या मनावर हा आघात कायमचा राहणार आहे. मात्र एक दिवस ते मला नक्की स्वीकारतील असा मला विश्वास आहे, असंही हुसैन म्हणाले.

या प्रकारानंतर झाकीर हुसैन यांचा रक्तदाब वाढला होता. त्यामुळं त्यांना चेन्नईतील राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी उपचारानंतर ते घरी परतले.

मी तीन वर्षांचा असल्यापासून या मंदिरात जात आहे, मात्र असा प्रकार प्रथमच घडल्याचं ते म्हणाले.

मी मंदिरात गेलो तेव्हा रंगराजन मासिक वाचत बसलेले होते. मला पाहिल्यानंतर त्यांनी मला बाहेर काढण्याचे आदेश त्याठिकाणच्या कार्यकर्त्यांना दिले. तसंच मला धमकावण्यात आलं, असंही झाकीर हुसैन म्हणाले.

मोठ्या हिंदू मंदिरांमध्ये शक्यतो बिगरहिंदुंना एका ठरावीत सीमेच्या पलिकडे जाण्याची परवानगी दिली जात नाही.

माझा जन्म मुस्लीम कुटुंबामध्ये झालेला आहे. मात्र मला हिंदू आजोबांनी दत्तक घेतलं. त्यांना मूल नव्हतं. त्यांचं लग्न हिंदू समाजातील मुलीशी झालं होतं. ते पेरुमलचे भक्त होते. त्यामुळं मीही पेरुमलची भक्ती करू लागलो असं, ते म्हणाले.

"मी भरतनाट्य शिकलेलो आहे. मी नृत्याच्या माध्यमातून हिंदू कथांचं सादरीकरण करतो. गर्भगृहासमोर हिंदू नसलेल्यांना प्रवेशास मनाई असल्याचा फलक आहे. पण, देव आणि माझ्यामध्ये येणारे ते कोण?" असा प्रश्न हुसैन यांनी उपस्थित केला.

हिंदू धार्मिक व्यवहार मंत्री सेहगर बाबू यांच्याकडे बीबीसीनं याबाबत विचारणा केली. त्यावर मंदिर प्रशासनाला घटनेची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे. त्या अहवालाच्या आधारे लवकरच कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)