पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का दिसत नाही? - अमोल कोल्हे, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का दिसत नाही? - अमोल कोल्हे

पुण्यातील विमानतळावर लावण्यात आलेल्या पेशवेकालीन पेंटिंगबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून सध्या या पोस्टची प्रचंड चर्चा सुरू आहे.

पुण्याच्या विमानतळावर पेशवाईची चित्रं दिसतात, मग शिवरायांचं कर्तृत्व का दिसत नाही?, असा प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे. सकाळनं याबाबत बातमी दिली आहे.

पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लाल महालसुद्धा आहे, सिंहगडही आहे. याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी हेही आहे, असं अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

त्याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूरही पुण्यात आहे, याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? असा सवालही कोल्हे यांनी केला आहे. पेंटिंगसोबतचा एक सेल्फीदेखील त्यांनी पोस्ट केला आहे.

2. भाजपचा 'भगवा' म्हणत शिवसेनेवर फडणवीसांची टीका

पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. भगव्याची शपथ घेतलेल्यांना त्याची लाज वाटते त्यामुळं मला भगवा फकडणार असं आवर्जून सांगावं लागत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पुण्यात शिवाजी नगर भागात भाजपच्या शहरातील नवीन पक्ष कार्यालयाचं शुक्रवारी उद्घाटन झालं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर याबाबत टीका केली.

कार्यक्रमासाठी आलेली गर्दी पाहून पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी फडणवीस यांनी पुण्यात शिवसेना नावालाही उरली नसल्याचंही म्हटलं. पुणेकर विकासाच्या मागे जाणार असून, पुन्हा महापालिकेत सत्ता मिळाल्यावर पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

3. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा

एसटीच्या विलीनीकरणासाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

एसटी अत्यावश्यक सेवेअंतर्गत येत असल्यामुळं ही कारवाई सुरू झाल्यास, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कर्मचाऱ्यांना अटक केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा कारवासही होऊ शकतो.

वेतनवाढीच्या घोषणेनंतर सरकारनं कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रूजूही झाले. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपावर आहेत.

त्यामुळं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्यानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

4. 'राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी ममतांवर गुन्हा दाखल करा'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला असून या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वसई भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. टिव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

ममता बॅनर्जी या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यादरम्यान कार्यक्रम संपताना राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण होण्याआधीच ममता कार्यक्रमातून निघून गेल्या, असा आरोप ममतांवर करण्यात आला आहे.

या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं पत्र भारतीय जनता पक्षाचे वसई-विरार जिल्हा युवा अध्यक्ष अभय कक्कड यांनी आचोळे पोलिसांत दिलं आहे.

ममता यांची ही कृती राष्ट्रगीताप्रती असंवेदनशीलता आणि अपमान करणारी आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर पिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर 1971 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

5. शेतकऱ्यांना वीजबिल भरावंच लागेल - नवाब मलिक

वीज कंपन्यांकडून राज्याला मोफत वीज मिळत नाही, त्यामुळं ज्यांनी वीज वापरली आहे, त्यांना बिल भरावंच लागणार आहे असं वक्तव्य मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे हे खरं आहे. पण महावितरणची थकबाकी जवळपास 50 हजार कोटी एवढी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बिलं भरणं गरजेचं असल्याचं लक्षात घ्यावं असं मलिक म्हणाले.

शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर बिल भरू द्यावी असं म्हटलं, त्यामुळं काही सवलतीही दिल्या. एखाद्याची अडचण लक्षात घेता येऊ शकते, मात्र सरसकट शेतकरी 7-7 वर्षे बिलं भरणार नसतील, तर कंपन्या सेवा कशा देणार, असं म्हणत नवाब मलिकांनी शेतकऱ्यांना बिलं भरावी लागतील असं म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)