नाशिक साहित्य संमेलन, नाश्त्याचा आग्रह आणि बिअरचं खोकं : ब्लॉग

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी, नाशिकहून
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

माझ्या बहिणीच्या लग्नातला किस्सा आहे, ऐन विधींची वेळ, घरातला जो माणूस दिसेल तो प्रचंड घाईत होता आणि एका क्षणाला आईने मला ओरडून सांगितलं, 'भांगसळ आण'.

मुळात भांगसळ काय हा पहिला प्रश्न होता आणि ती कुठे असेल हे तर माहिती असण्याचे चान्सेस शून्य नाही तर मायनसमध्ये होते.

आता तो किस्सा आठवला की हसू येतं. कोणतंही कार्य म्हटलं की प्रचंड सामान आणि कोणाचा पायपोस कशात न राहाणं आलंच.

त्याशिवाय का नाशिकच्या साहित्य संमेलनात मी एकाला बडवाजयर बिअरच्या बॉक्समध्ये माईक, वायरी, संमेलनाच्या पासांच्या पट्ट्या वाहून नेताना पाहिलं.

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला खात्री पटली की बडवायजरच्या बॉक्समध्ये संमेलनाच्या पासाच्या गळपट्ट्या नसत्या तर खरं काहीतरी चुकतंय असं वाटलं असतं.

कार्यघर म्हटलं की व्हायचंच.

संमेलन योग्य की अयोग्य, त्यात काय चुकलं याचा उहापोह करायची जागा प्रत्यक्ष संमेलन नसते. त्याला साहित्य संमेलनाआधीही भरपूर वेळ असतो आणि नंतरही वेळ मिळेलच.

आज लिहितेय ते खास तिथे राबणाऱ्या हातांचं कौतुक करायला. लग्नघरात जेवताना कधी कार्याला नावं ठेवायची नाही असं ऐकत मोठे झालेलो आहोत आपण. स्टेजवर मानापमानाची नाटकं रंगत असली तरी ज्यांच्या जीवावर कार्य तारून नेलं जातं त्यांच्यासाठी चार कौतुकाचे शब्द काढायलाच हवेत.

त्याशिवाय का मंडपात पाय टाकल्या टाकल्या तुमची किती माणसं हे विचारून पुढच्या तिन्ही दिवसाचे जेवणाचे पास हातात पडले. मान्य आहे पत्रकार आहोत म्हणून काही सुविधा मिळतात, पण आधी नाश्ता करायचा आग्रह एकदम घरचं लग्न असल्याचा फिल देऊन गेला.

नेते मंडळी जेव्हा दिंडीत रमली होती, त्या दिंडीची पण एक गंमतच आहे, संगीत मानापमान रंगल्यामुळे, भरीस भर बेक्कार पावसाळी वातावरणामुळे दिंडी कॅन्सल करायची वेळ आली होती. असो, तर दिंडीत जेव्हा हूज हू, चॅनलला बाईट देत होते, तेव्हा आम्ही संमेलनस्थळी फिरत होतो.

अज्ञानी लोकांसाठी एक्स्ट्राची माहिती, दिंडी होती शहरात, संमेलनस्थळ - म्हणजे शहराबाहेर 10 किलोमीटर लांब.

जेव्हा चमक-धमक संमेलनाच्या तंबूत उतरली नव्हती, तेव्हापासून आम्ही तिथे होतो.

चाळीस समित्या आहेत संमेलनासाठी, आणि प्रत्येक समितीसाठी कॉलेजच्या स्वयंसेवकांची टीम दिलेली आहे. मुख्य प्रवेशदारावर पांढरे कोट घालून पोरं, पोरी आहेत. येणाऱ्या जाणाऱ्याची व्हॅक्सिन सर्टिफिकेट तपासत आहेत.

कोणी बिना-मास्कचा दिसला तर खिशातून मास्क काढून देत होती. सकाळी सकाळी उठून नाशिकच्या कोनाकोपऱ्यातून आलेली मंडळी आहेत ही.

मांडवात शिरलात की कोणत्याही लग्नघरात गेल्याचा फिल येतो, कारण गरम-गरम अन्नपदार्थांचा वास लगेच नाकात शिरतो. तिथे 'फुड कमिटीची' पोरं, मंडळी असतील. दुपारी तरी जेवलीत की नाही कुणास ठाऊक.

पांढरे टी-शर्ट घालून ही पोरं सकाळी सातपासून कॅम्पसमध्ये हजर असतील. प्रकाशकांच्या पुस्तकांचे गठ्ठे येत होते, स्टॉल मांडणं चाललं होतं. कुसुमाग्रज नगरी असं नाव दिलेल्या बिल्डिंगमध्ये रांगोळी घालणं चालू होतं.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईं फुलेंच्या मुर्त्या आहेत या भुजबळ नॉलेज सिटीच्या मेन कँपसमध्ये. तिथे तर इतकी सुंदर रांगोळी काढली पोरींनी. त्यांचे कधी चेहरे लक्षात राहाणार नाही, कधी नावं कळणार नाहीत.

आर्ट कॉलेजच्या पोरांनी भिंती रंगवल्या होत्या, बाराखडीच्या अक्षरांनी आकाशदिवे तयार केले आहेत. तरुण पोरंच ती. सेल्फी आणि ग्रुपी काढायला जागा असाव्यात म्हणून आजकाल फॉर्मात असणाऱ्या क्वर्की स्टाईलने टायर पण रंगवून हिरवळीवर टाकलीत.

जेष्ठ-श्रेष्ठ मंडळी येणार म्हणून गुढी उभारणं चाललं होतं, एक बारकं पोरगं, हातात वजनापेक्षा जड स्पीकर घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी संमेलनाचं गीत लावत चाललं होतं.

दोन माणसं एकमेकांशी काय बोलतात हे स्पष्ट ऐकू येणार नाही अशी परिस्थिती.

मागे सामान घेऊन येणाऱ्या टेम्पोंचे आवाज, लावली नसली तर आपल्या भारतीयत्वावर शंका घेतील का काय अशी भीती वाटून तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या चालींची लावलेली सनई, कुठून गाडी, कोणी आत घालावी यासाठी चाललेली वादावादी, पोलिसांच्या शिट्या, वायरलेस... माझ्या सहकाऱ्याला, संकेतला फोन केला होता मी तिथून.. त्यावर त्याने काय ऐकलं हे एक त्याला माहिती आणि एक देवाला.

तरीही या गोंधळात सुसूत्रता होती. झरकन माणसं इकडून, तिकडे जात होती, फोनवर बोलत होती, झपाझप काम करत होती. कोण काय करतंय हे पाहाणाऱ्याला कळत नसलं तरी करणाऱ्याला कळत होतं.

चार वेळा मुख्यदारातून आतबाहेर करताना चौथ्यांदा एक जुनी ओळखीची मुलगी भेटली. आरोग्य विभागात आहे म्हणाली, सुंदर साडी नेसलेली, छानसा मेक-अप आणि वर पांढरा कोट.

आरोग्य विभागात जाण्यासाठी हिने कुठली डिग्री घेतली हेही माहिती नसण्याइतक्या वर्षांनंतर आम्ही परत भेटलो होतो.

आता सगळेच भेटतील नवे-जुने. एखाद्या लग्नात नाही का पाच-सात चुलीमध्ये असलेले नातेवाईक भेटतात तसं. कोणाचे 'हळवे' कोपरे भेटतील, कोणाचे 'हिरवे' कोपरे.

जरीच्या साड्या नेसून आलेल्या बायका, कुर्ते घातलेले पुरुष. प्रत्येक कमिटीचा रंग ठरलेला. पण त्यातल्या त्यात सुंदर कपडे आणि चेहऱ्यावर हास्य. यातले अनेक जण गेले कित्येक रात्री झोपले पण नाहीयेत. घरचं कार्य असलं की काम संपत नाही हो.

उद्या येतील बातम्या कदाचित ढिसाळपणाच्या. पण दोन दिवस तुफान पाऊस पडूनही, तिसऱ्या दिवशी हे सगळं उभं करणारी माणसं आहेत ही.

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गाण्याचा कार्यक्रम होता, संध्याकाळी पाच वाजता. साडेचारपर्यंत तर स्टेज बांधायला कोरडी जागा सापडत नव्हती. तरी कार्यक्रम झाला. उशिरा संपला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेरून बॅगाबोजे सांभाळत येणाऱ्या निमंत्रितांना रस्ते दाखवत, ठेवणीतले कपडे घालून माणसं तयार.

एका ठिकाणी याच मंडळींपैकी काहींशी बोलत होते. एकांनी आपल्या महिला सहकाऱ्याला बोलावलं. ताबडतोब धावत ये म्हणे. त्या बाईही, पन्नाशीच्या, जरीची साडी नेसलेल्या, खरंच धावत आल्या.

यंदाचं संमेलन भव्य आहे म्हणे. खर्चाचा अंदाज तरी असंच सांगतोय. जागाही मोठी आहे. जेष्ठ-श्रेष्ठ मंडळींना (वयाने नाही, तर कोण हे लक्षात आलंच असेल) इथून तिथे न्यायला, मुख्य इमारतीपाशी आणायला बॅटरीवरच्या गाड्या आहेत.

हे मंडळी ध्वजारोहण करतील, मग बॅटरी गाडीत बसतील, मग ही गाडी त्यांना मुख्य मंडपात नेऊन सोडेल. स्टेजवर जातील, भाषण करतील. बाकीची मंडळी टाळ्या वाजवतील.

वरती उल्लेख केला ती मंडळी टाळ्या वाजवायलाही नसतील, ती जेवणाची ताटं लावायला गेली असतील.

सगळं आलबेल आहे, संमेलन किती भारी असा सूर नाहीचे माझा. वर म्हटलं ना, त्यातले वाद-प्रतिवाद, आरोप, कमतरता, तोच-तोचपण सगळ्यावर चर्चा होईल. आज फक्त इतकंच की 'राबणाऱ्या हातांनी संमेलनं उभी करणाऱ्यांची' दखल घ्यावी.

मग बडवायजर बिअरच्या बॉक्समध्ये वायरी घेऊन जाणारे हात त्यात आलेच.

हेही वाचलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)