तेल अविव जगातलं सर्वांत महागडं तर अहमदाबाद स्वस्त शहर

फोटो स्रोत, Reuters
इस्रायलमधील तेल अविव हे राहण्यासाठी जगातील सर्वांत महागडं शहर म्हणून ओळखलं गेलं आहे.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजेस युनिट (EIU) च्या सर्वेक्षणात हे इस्रायली शहर प्रथमच पहिल्या क्रमांकावर आलं आहे. गेल्यावर्षी ते पाचव्या स्थानावर होतं. पॅरिस आणि सिंगापूर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
युद्धग्रस्त सीरियातील दमास्कसने जगातील सर्वांत स्वस्त म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे.
या यादीत भारतातलं एकच शहर पाहायला मिळालं. जगातलं सातवं सर्वांत स्वस्त शहर म्हणून अहमदाबादचं नाव या यादीत आढळलं.

फोटो स्रोत, Eiu
173 शहरांमधील वस्तू आणि सेवांसाठी यूएस डॉलरमधील खर्चाची तुलना या सर्वेक्षणात केली जाते.
EIU नं सांगितलं की, "ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गोळा केलेल्या डेटावरून असं दिसून आलंय की, स्थानिक चलनाच्या बाबतीत सरासरी किमती 3.5% वाढल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वांत वेगवान चलनवाढीचा दर आहे."
एका लिटर पेट्रोलच्या किमतीत शहरांमध्ये सरासरी 21% एवढी वाढ झाल्यानं वाहतुकीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलचं चलन शेकेलचं डॉलरच्या तुलनेत वाढलंले मूल्य यामुळे तेल अविव हे जगातील सर्वांत महागडं शहर ठरल्याचं प्रमुख कारण आहे. जवळपास 10% वस्तूंच्या स्थानिक किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषतः किराणा मालाच्या किंमतींमध्ये.
तेल अविव हे अल्कोहोल आणि वाहतुकीसाठी दुसरं सर्वांत महागडं शहर, पर्सनल केअर वस्तूंसाठी पाचवे आणि मनोरंजनासाठी सहावे शहर असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
तेल अविवचे महापौर रॉन हुलदाई यांनी हारेट्झ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, वाढत्या मालमत्तेच्या किमतींचा EIU च्या गणनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये. याचा अर्थ शहरातील महागाई प्रचंड वाढण्याच्या दिशेनं जात आहे.
"संपूर्ण देश जसा महाग होत आहे, त्याचप्रमाणे तेल अवीव अधिक महाग होईल," असं ते म्हणाले.
"मूलभूत समस्या अशी आहे की इस्रायलमध्ये कोणतंही पर्यायी महानगर नाहीये. जसं युनायटेड स्टेट्समध्ये न्यूयॉर्क, शिकागो, मियामी इत्यादी आहेत. ब्रिटनमध्ये ग्रेटर लंडन, मँचेस्टर आणि लिव्हरपूल आहेत. जिथं राहण्याची किंमत खूप जास्त असेल, तर तिथं तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊ शकता."
गेल्या वर्षी पॅरिस, झुरिच आणि हाँगकाँगने EIU च्या सर्वेक्षणात संयुक्तपणे प्रथम स्थान पटकावला होता. या वर्षी झुरिच आणि हाँगकाँग अमुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असून त्यानंतर न्यूयॉर्क, जिनिव्हा, कोपनहेगन, लॉस एंजेलिस आणि ओसाका यांचा क्रमांक लागतो.
अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणमध्ये वस्तूंचा तुटवडा आणि आयातीच्या वाढत्या किंमती कायम राहिल्यानं तेहराननं क्रमवारीत सर्वाधिक उसळी घेतली आहे. तेहराननं 79व्या स्थानावरून 29व्या स्थानावर उडी घेतली आहे.
कोरोना व्हायरसमुळे या रँकिंगमध्ये बदल होऊ शकतो, असंही EIUनं म्हटलं आहे.
"कोव्हिड-19 वरील लस आल्यामुळे बहुतेक देशांमधील अर्थव्यवस्था आता सुधारत असल्या तरी, जगातील प्रमुख शहरांमध्ये अजूनही वारंवार कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहेत, ज्यामुळे नवीन निर्बंध लादले जात आहेत. अनेक शहरांमध्ये यामुळे वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्यामुळे तुटवडा आणि किमती वाढल्या आहेत."
"ग्राहकांच्या मागणीतील चढ-उतारामुळे खरेदीच्या सवयींवरही परिणाम झाला आहे, तर गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासामुळे चलनांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधनाच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे."
EIU ने सांगितले की, आगामी वर्षात या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्या त्या देशांतील केंद्रीय बँकांनी महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवायला सुरुवात केली आहे.
5 सर्वाधिक महागडी शहरं
1. तेल अविव
2. पॅरिस आणि सिंगापूर
3. झुरिच
4. हाँगकाँग
5 सर्वाधिक स्वस्त शहरं
1. दमास्कस
2. ट्रिपोली
3. ताश्कंद
4. ट्यूनिस
5. आल्मटी
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

























