Omicron : अफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात दक्षिण अफ्रिका आणि इतर जोखमीच्या देशांमधून आलेले सहा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या प्रवाशांना ओमिक्रोन विषाणूची लागण झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डोंबिवली, मुंबई, भाईंदर, पुणे या भागांतून प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील दोन अशा सहा प्रवाशांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली असून या प्रवाशांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे की नाही हे या चाचणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
या सर्व प्रवाशांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत असल्याचंही आरोग्य विभागाने सांगितलं. स्थानिक प्रशासन आता या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहे.

फोटो स्रोत, Getty images / artur carvalho
गेल्या महिन्याभरात परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला आपल्याविषयी माहिती द्यावी असंही आवाहन राज्य सरकारने केलं आहे.
26 नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण अफ्रिका आणि इतर काही देशांत आढळलेल्या कोव्हिड-19 विषाणूच्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं. हा विषाणू 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणजेच काळजी करण्याजोगा विषाणू असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून महाराष्ट्रात परदेशी प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
मुंबईमध्ये दररोज लाखो प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शहरात प्रवेश करत असतात. त्यामुळे कोरोनाची लक्षण आढळणाऱ्या प्रवशांबाबत खबरदारी घेण्यात येत आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारनेही नवीन नियमावली जारी केली आहे.
दरम्यान मुंबईत दक्षिण अफ्रिकेतून 100 प्रवासी आले होते. मुंबई महापालिकेने त्यांना संपर्क करून सर्वांचे नमुने गोळा केले आहेत, अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.
"आलेल्या प्रवाशांपैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोव्हिड पॅाझिटिव्ह आलाय. पण त्याच्यात S जीन आढळून आलंय. त्यामुळे त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला नाही असं म्हणता येईल. पण आम्ही जिनोम सिक्वेंसिंग करत आहोत," अशी माहिती काकाणी यांनी दिली
जिनोम रिपोर्ट येण्यासाठी आठ दिवस लागतील. तसंच ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये S जीन आढळून येत नाही, असं काकाणी यांचं म्हणणं आहे.
राज्यात खरंतर 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार होत्या मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याची तारीख स्थानिक प्रशासनाने पुढे ढकलली आहे.
हे वाचलंत का?
- ओमिक्रॉन : विमान प्रवासाचे 'हे' आहेत नवे नियम
- कोरोनाच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटमध्ये काय फरक आहे?
- कोरोना साथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल, पहिल्या गोळीला मान्यता
- नोरोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणे काय?
- भारतात कोणत्या लशी दिल्या जातात? कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, कोव्होव्हॅक्स लशींची वैशिष्ट्यं काय?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























