You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत म्हणजे हिंदुस्तान, यातून हिंदू वेगळा होऊच शकत नाही- मोहन भागवत #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. भारताला 'भारत' ठेवायचं असेल तर हिंदुंना 'हिंदू'च राहावं लागेल-मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुंनी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मोहन भागवत यांनी हिंदुंची संख्या आणि शक्तीही कमी झाल्याचं म्हटलं आहे. हिंदुंना हिंदू राहण्यासाठी भारत अखंड राहायला हवा आणि भारताला 'भारत' राहायचं असेल तर हिंदुंना 'हिंदू'च राहावं लागेल, असं भागवत म्हणाले.
भारताशिवाय हिंदू आणि हिंदूंशिवाय भारत अशी कल्पनाच शक्य नसल्याचं भागवत म्हणाले. भारत म्हणजे हिंदुस्तान आहे आणि यातून हिंदू वेगळा होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
धार्मिक लोकसंख्येचा उल्लेख करतही भागवत यांनी काही मुद्द्यांकडे संकेत केला. सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता कुठे आहे? देशाच्या अखंडतेला आणि एकतेला धोका कुठे आहे? ते पाहा असं भागवत म्हणाले.
एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
2. नव्या विषाणूची चिंता, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण
कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून म्हणजे जवळपास गेल्या दोन वर्षात कोरोना कमी झाला असं वाटू लागतात, नवा एखादा विषाणू येतो आणि पुन्हा चिंता वाढतात. सध्यादेखील आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या विषाणूनं चिंता वाढवली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानं भारताच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून बेंगळुरू विमानतळावर दाखल झालेल्यांमध्ये या दोन कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाचा हा नवा विषाणू आढळला की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शनिवारी (27 नोव्हेंबर) बेंगळुरूच्या विमानतळावर उतरलेल्या विमानातून दक्षिण आफ्रिकेतून 94 जण आले होते. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेचे दोन नागरिक कोरोनाग्रस्त आढळले आहे. इतर सर्वांना ट्रॅक करून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.
सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, तर काही प्रवाशांची माहिती घेणं अजूनही सुरू आहे.
एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
3. देशद्रोहाच्या प्रकरणात अटक झालेल्या शरजील इमामला जामीन मंजूर
अलिगढ मुस्लीम विद्यापीठात देशविरोधी भाषण दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या शरजील इमामला अलाहाबाद हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शरजील यांनी भाषण केलं होतं. ते भाषण देशविरोधी असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.
अलाहाबाद हायकोर्टाच्या जस्टीस सौमित्र दयाल यांच्या पीठानं या प्रकरणी सुनावणी करताना शरजील यांना जामीन मंजूर केला आहे.
बिहारच्या काको गावातील असलेल्या शरजील यांनी आयआयटी बॉम्बेमधून बीटेक आणि एमटेक केलं आहे. तसंच जेएनयूमधून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
4. राणेंच्या सरकार पाडापाडीच्या मुद्द्यावर महाजन म्हणाले, 'तसे प्रयत्न सुरू नाहीत'
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मार्चपर्यंत पडेल आणि राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार असल्याचं भाकित नारायण राणे यांनी व्यक्त केलं होतं. मात्र भाजपच्याच गिरीश महाजन यांनी राणेंच्या वक्तव्याचपेक्षा वेगळं वक्तव्य केलं आहे.
राज्यातील सरकार पडेल तेव्हा पडेल मात्र आम्ही विरोधी पक्षाची भूमिका योग्य प्रकारे बजावण्याचा निर्णय घेतला आहे, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही, असं महाजन म्हणाले. त्याचवेळी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पुन्हा एकदा दगा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर आम्हाला जातीयवादी ठरवणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
5. विलिनीकरण होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच राहणार-गुणरत्न सदावर्ते
एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं या आंदोलनात सहभागी झालेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
सदावर्ते यांनी आझाद मैदानात कामगार संघटनेच्या नेत्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत, असं ते म्हणाले.
एसएसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. कर्मचाऱ्यांना विनाकारण अटक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.
दुसरीकडे, राज्यात एसटीची होणारी तोडफोड ही सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासणं गरजेचं असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलं. पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, असंही ते म्हणाले.
टीव्ही 9 नं याबाबचं वृत्त दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)