You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची चार अल्पवयीन मुलांकडून हत्या
- Author, इमरान कुरेशी,
- Role, बंगळुरूहून, बीबीसी हिंदीकरिता...
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
बंगळुरू पोलिसांनी एका 46 वर्षीय व्यक्तीच्या हत्येच्या आरोपाखाली चार अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
ही व्यक्ती कथितरित्या आपल्या 17 वर्षीय मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार करत होती, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात हत्येचा आरोप असलेले चारही आरोपी मुलीचे वर्गमित्र असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या मुलीने आपल्या एका मित्राकडे यासंदर्भात तक्रार केली होती.
पीडित मुलीची आई आपल्या माहेरी कलबुर्गी येथे गेली असताना गेल्या आठवड्यात वडिलांनी पुन्हा आपल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असं मुलीने मित्राला सांगितलं.
पीडित मुलीचे वडील बंगळुरूतील एका खासगी संस्थेत सिक्युरिटी मॅनेजरचं काम करतात.
मुलीने आपल्या ज्या मित्राला यासंदर्भात सांगितलं होतं, त्याने आपल्या इतर तीन मित्रांना या कृत्यासाठी तयार केलं आणि हत्या केली, असा आरोप आहे.
सर्व आरोपींनी रविवारी मध्यरात्री कथितरित्या मुलीला घराचा दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर मुलीने दरवाजा उघडून चारही मित्रांना आतमध्ये घेतलं. त्यानंतर चारही मुलांनी तिच्या वडिलांवर कुऱ्हाड आणि इतर हत्यारांच्या मदतीने हल्ला केला.
मृत व्यक्तीच्या शेजाऱ्यांनी येलहंका पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी 46 व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला.
मुलीची आई ही कपडे शिवणारी मजूर आहे. कर्नाटकच्या कलबुर्गी येथून ती बंगळुरूत उदरनिर्वाहासाठी आली होती.
तर मृत व्यक्ती बिहारचा रहिवासी होता. त्यांची मुलगी जवळच्याच एका कॉलेजमध्ये अकरावीचं शिक्षण घेत होती.
दांपत्याची दुसरी मुलगी अकरा वर्षांची असून ती शाळेत शिकत आहे.
पोलिसांचं काय म्हणणं?
बंगळुरू नॉर्थ-ईस्टचे पोलीस उपायुक्त सी. के. बाबा यांनी बीबीसी हिंदीला याविषयी अधिक माहिती दिली.
पोलीस उपायुक्तांनी सांगितलं, "हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. पती आपल्या मुलीचं लैंगिक शोषण करतो, हे तिच्या आईला माहिती होतं. मुलीच्या आईने याबाबत वडिलांशी चर्चा करून हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. पण तिला त्यामध्ये यश मिळालं नाही. पुढे हे प्रकरण चिघळून तिचे पतीसोबतचे संबंध तणावपूर्ण बनले होते."
घटनास्थळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्या रात्री मुलीची चौकशी केली. त्यावेळी तिची भूमिका संशयास्पद असल्याचं पोलिसांना लक्षात आलं.
नंतर आपल्याच मित्रांनी वडिलांची हत्या केल्याचं तिने कबूल केलं.
मुलीने सर्वप्रथम पित्याची हत्या घडवून आणली त्यानंतर सर्व आरोपी मुलं घटनास्थळावरून फरार झाली. काही वेळाने लहान बहिणीला झोपेतून उठवलं. त्यानंतर दोन्ही बहिणींनी मिळून आरडाओरडा करून लोकांकडे मदत मागितली. वडिलांवर काही लोकांनी हल्ला केला, असं मोठ्या बहिणीने त्यानंतर सर्वांना सांगितलं, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्तांनी सांगितलं, "आम्ही पुढचे 10 तास या प्रकरणाचा तपास केला. सर्व आरोपींना पकडलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलं घरात घुसत असल्याचा तसंच बाहेर पडतानाचे सबळ पुरावे आम्हाला सापडले आहेत.
या प्रकरणातील सर्व आरोपींना ज्युवेनाइल जस्टीस बोर्डसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)