You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप नेत्यांनी 'हा' फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर का झाला गदारोळ?
उत्तर प्रदेशमधील नोएडापासून चीनपर्यंत एका फोटोमुळं गेल्या अनेक तासांपासून सोशल मीडियावर मॅसेजेसची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारचे अनेक मंत्री आणि नेत्यांनी ट्विटर हँडलद्वारे हा फोटो ग्रेटर नोएडाच्या जेवर विमानतळाचा असल्याचं सांगत ट्वीट केलं होतं.
सरकारनं प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्येही हा फोटो वापरण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशच्या जेवर मध्ये नोएडा इंटरनॅशनल विमानतळाची पायाभरणी केली. तयार झाल्यानंतर हे आशिया खंडातील सर्वात मोठं विमानतळ असेल, असं सांगितलं जात आहे.
याच दाव्यासह केंद्रीय मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला, तो काही तासांतच व्हायरल झाला.
त्याची सुरुवात शेन शिवाई नावाच्या एका व्यक्तीच्या ट्विटमुळं झाली. शेन शिवाई यांच्या व्हेरीफाईड ट्विटर अकाऊंटवर ते चीनसंबंधी घडामोडींचे तज्ज्ञ असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच त्यावर चीनच्या सरकारी मीडियाचं लेबलही लागलेलं आहे.
भारतातील अनेक नेते जो फोटो जेवर एअरपोर्टचा म्हणून पोस्ट करत आहोत, तो फोटो प्रत्यक्षात बीजिंमध्ये दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका विमानाचा आहे, असं दावा शेन शिवाई यांनी केला आहे.
"भारत सरकारचे मंत्री ट्विटर हँडलवर केवळ चीनच्या बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिझाईनचा फोटोच नव्हे तर, दक्षिण कोरियाची राजधानी इंचियोनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फोटोही नोएडा एअरपोर्टचा मूळ ढाचा असल्याचं सांगत पुरावा म्हणून पोस्ट करत आहेत," अशी पोस्ट त्यांनी केली.
शेन शिवाई यांनी केंद्रीय माहिती प्रसारण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्य मंत्री प्रहलाद सिंह पटेल, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, उत्तर प्रदेशचे भाजप उपाध्यक्ष पंकज सिंह, दिल्ली प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि डीडीसीएचे डायरेक्टर सुनील यादव यांच्या ट्विटचं कोलाज शेअर केलं होतं.
"भारत सरकारच्या फेक न्यूज प्रोपगंडाचा पर्दाफाश," असं लिहित त्यांनी आणखी एक ट्वीट पोस्ट केली.
आम्ही एका-पाठोपाठ एक या नेत्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विटची माहिती घेतली तर त्यातील बहुतांश ट्वीट आढळले नाही.
पण त्यात अधिक माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि पंकज सिंह यांच्या ट्विटर हँडलद्वारे त्याचदिवशी सकाळी एक व्हीडिओ ट्वीट करण्यात आले होते. त्यात या फोटोचा वापर करण्यात आला होता.
कोणी काय म्हटलं?
ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्यावर एकापाठोपाठ अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.
समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याबाबत एक ट्वीट केलं. "भाजपच्या खोट्या कामाचा प्रत्येक फोटो उधारीचाच आहे. मग खोटे दावे करणाऱ्यांचा विचार प्रामाणिक कसा?" अशी पोस्ट त्यांनी केली.
शेन यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत जम्मू-काश्मीर काँग्रेसचे नेते सैफुद्दीन सोज यांचा मुलगा सलमान अनीस सोज यांनीही चिमटा काढला.
"भारतीय परिसरावर ताबा मिळवल्याच्या प्रत्युत्तरात भारताचा दावा थेट बीजिंगच्या विमानतळापर्यंत पोहोचला आहे. हा खरंच मास्टर स्ट्रोक आहे. त्यासाठी आपण पंतप्रधान मोदींचं कौतुक करायला हवं. आपल्या मंत्र्यांनी आपला गौरव वाढवला आहे." असं ट्वीट त्यांनी केलं.
"वाह, मोदी जी वाह! असत्य आणि प्रपोगंडा याचीही सीमा असते. तुमची 56 इंचाची छाती चीनला लद्दाख आणि अरुणाचलमध्ये आपल्या जमिनीवर कब्जा करण्यापासून रोखू शकली नाही. आता तुमचे मंत्री बीजिंग एअरपोर्टचं डिझाईन कॉपी-पेस्ट करून जेवर एअरपोर्ट असल्याचं सांगत आहेत," असं ट्वीट प्रशांत भूषण यांनी केलं.
फोटोचं सत्य काय?
सोशल मीडियावरच्या गदारोळानंतर हा फोटो नेमका कुठला आहे याचा आम्ही शोध घेतला तर हा फोटो बीजिंगच्या दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिझाईनचा आहे, अशी माहिती मिळाली.
चीनमधील सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सच्या माहितीनुसार दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाला यावर्षी 25 सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे 2019 पासून याठिकाणी विमान वाहतूक सुरू आहे.
आम्ही गेट्टी इमेजवरही या फोटोची माहिती घेतली, त्यावरही हा फोटो दाशिंग एअरपोर्ट असल्याचं स्पष्ट झालं. इथे क्लिक करून तुम्हीही पाहू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)