You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनील जवादे: 'गांजा ओढू नका', असं सांगणाऱ्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी नागपूमधून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नागपूरमध्ये समता सैनिक दलाचे निमंत्रक सुनील जवादे यांची चार अल्पवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना घडली आहे.. इमामवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार अल्पवयीन मुलांनी जवादे यांचा शस्त्रांनी वार करून खून केला.
वय वर्षे 15 ते 17 दरम्यान असणाऱ्या मुलांनी क्षुल्लक वादातून ही हत्या केल्याचं नागपूरच्या अजनी विभागाचे एसीपी गणेश बिरादरे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
सुनील जवादे यांनी या चारही अल्पवयीन मुलांना व्यसनांपासून दूर राहा असा सल्ला दिला होता. याच रागातून हा खून झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
सुनील जवादे हे दीक्षाभूमी आणि रामबाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन समाज प्रबोधनाचे काम करीत होते. या परिसरातील अनेक अशिक्षित विद्यार्थी आणि आर्थिक स्थिती बिकट असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षात त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले होते.
नागपूरच्या रामबाग परिसरात राहणारे जवादे यांचा त्यांच्या राहत्या घरासमोरच खून करण्यात आला. गुरुवारी पहाटे 5 वाजता जवादे घराबाहेर पडले असता, त्यांच्या डोळ्यात आधी आरोपींनी मिरची पावडर फेकले. नंतर चाकूने त्यांच्या शरीरावर वार केले, यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर चारही अल्पवयीन मुलांना इमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे. एसीपी गणेश बिरादरे या घटनेविषयी सांगताना म्हणाले, "या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार मुलांपैकी एक मुलगा दहावीत आहे, एक बारावीत आणि दोघांनी शिक्षण सोडले आहे.
ही चारही मुले रामबाग परिसरातील बौद्धविहारासमोरील बाकांवर गांजा ओढत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुनील जवादे यांच्या लक्षात आलं होतं. तीन- चार दिवसांपूर्वी यातील दोन मुलं गांजा ओढताना दिसल्यामुळे त्यांना जवादे यांनी समज दिली होती. दोन दिवसांपूर्वी यातील आणखी दोघेही गांजा ओढत असल्याचं दिसलं असता त्यांनाही जवादे यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. घनटेच्या आदल्या दिवशी ही चारही मुले एकत्र भेटली. सुनील जवादे आपल्याला हटकत असल्याने या चौघांनी त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली."
सुनील जवादे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे. दररोज ते स्थानिक कॉटन मार्केटमधून भाजी आणण्यासाठी पहाटे पाच वाजता घरून निघायचे. गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे जवादे भाजी आणण्यासाठी घराबाहेर जेव्हा निघतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना या मुलांनी आखली. सुनील जवादे घराबाहेर निघताच या मुलांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि त्यांना बाईकवरुन खाली पाडत चाकून त्यांच्यावर वार केले.
या प्रकरणात सर्व अंगाने तपास करून या कटामागे आणखी कुणी प्रौढ आरोपी आहेत काय? याचा तपास करण्याची मागणी समता सैनिक दलाने केली आहे. चार अल्पवयीन मुले अशा पद्धतीने कट रचून एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा खून कसे काय करु शकतात, हा प्रश्न समता सैनिक दलाने उपस्थित केलाय.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना यासंदर्भात एक निवेदनही समता सैनिक दलाने दिले आहे.
समता सैनिक दलाचे, राष्ट्रीय संघटक, प्रदीप गायकवाड बीबीसी मराठीला प्रतिक्रिया देताना म्हणाले," डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या देशभरात शाखा आहेत. या शाखांमध्ये बाबासाहेबांचा विचार तळागाळातील जनेतपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. सुनील जवादे हासुद्धा असाच एक बाबासाहेबांचा खंदा समर्थक सैनिक होता. असा एक चळवळीतला कार्यकर्ता अचानक अशा घटनेनं आपल्यातून निघून जाणे, हा चळवळीला आणि समाजाला धक्का आहे."
या घटनेनंतर रामबाग परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. सुनील जवादे हे समता सैनिक दलाच्या कामाशिवाय स्थानिकांनाही नेहमी मदत करायचे. जवादे यांच्या हत्येनं त्यांचे निकटवर्तीय आणि सहकारी यांना धक्का बसला. आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. इमामवाडा पोलीस ठाण्यात जमावही या घटनेनंतर जमा झाला होता. नागपूरच्या इमामवाडा पोलिसांनी चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर प्रक्षुब्ध जमाव शांत झाला.
या घटनेनंतर अशा घटनांचा निषेध करत अल्पवयीन मुलांपर्यत नशेच्या वस्तू कशा पोहोचताहेत यावर पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. अल्पवयीन आरोपींनाही योग्य ते शासन व्हावे. रामबाग सारख्या वस्तीत बालगुन्हेगारी सारख्या ज्या घटना वाढत आहे त्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)