टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण

एरवी थंडीत स्वस्त असणारे टोमॅटो अचानक एवढे 100 रुपये किलो झालेयत. देशभरात टोमॅटोसोबतच इतर भाज्यांचे भावही वाढलेले आहेत.
टोमॅटो आणि भाज्यांचे भाव वाढण्याची नेमकी कारणं काय?
मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींवरून प्रत्येक वस्तूची किंमत ठरते. आणि सध्याच्या घडीला बाजारात येणाऱ्या टोमॅटोंचं प्रमाण कमी आहे, आणि म्हणून किंमती वाढल्यायत.
देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. टोमॅटोच्या पिकलासुद्धा त्याचाच फटका बसलाय आणि टोमॅटोची आवक कमी झाली.
परिणामी देशभरातल्या टोमॅटोच्या किंमती किरकोळ बाजारात 80 ते 110 रुपये किलोवर गेल्यात.
पावसाचा टोमॅटो पिकांवर परिणाम
भारत हा चीननंतरचा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा टोमॅटो उत्पादक आहे.
नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सुमारे 7.89 लाख हेक्टर क्षेत्रावर वर्षभरात टोमॅटोचं साधारण 1 कोटी 975 लाख टन पीक घेतलं जातं. दर हेक्टरी सरासरी 25.05 टनांचं टोमॅटो पीक भारतात दरवर्षी घेतलं जातं.
देशामध्ये आंध्र प्रदेशात टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन होतं. सोबतच कर्नाटक आणि तामिळनाडू हे देखील मोठे टोमॅटो उत्पादक आहेत.

पण गेल्या काही दिवसांत या तीनही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आणि इथलं पीक वाया गेलं.
उत्तर भारतात ऑक्टोबर महिन्यात बेमोसमी पाऊस पडला, उत्तराखंडमधल्या पावसामुळे पूर आले आणि तिथल्या टोमॅटो पिकांनाही फटका बसला.
परिणामी देशाच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागांतून होणारी टोमॅटोची आवक घटली.
महाराष्ट्रात स्थिती काय?
महाराष्ट्रातली स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बोललो जुन्नर तालुक्यातले टोमॅटो उत्पादक शेतकरी अजित घोलप यांच्याशी. महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची तुलनेने कमी लागवड झाल्याचं त्यांनी सांगितलं.
टोमॅटोची लागवड केल्यापासून फळ हातात येईपर्यंत 60 दिवसांचा कालावधी जातो. हे पीक घ्यायला साधारण एकरी 1 लाखाची गुंतवणूक लागते.
गेले काही महिने शेतकऱ्यांना टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव मिळाला नसल्याने फार कमी शेतकऱ्यांनी नवीन टोमॅटो लागवड केलीय. वेळी-अवेळी होणाऱ्या पावसाचा या पिकावर परिणाम होतोच शिवाय CMV व्हायरस आणि टूटा अळीचं सावटही टोमॅटोच्या पिकावर आहे. या 60 दिवसांच्या काळात टोमॅटोची फार काळजी घ्यावी लागत असल्याचं अजित घोलप सांगतात.
हवामान बदल आणि पिकं
पाऊस पडला आणि पिकांवर परिणाम झाला हे खरं आहे. पण हे फक्त आपल्याला समोर दिसणारं कारण आहे. या पावसामागचं आणि पिकांवर होणाऱ्या परिणामांमागचं खरं कारण आहे हवामान बदल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
निसर्गाचं बदलेलं चक्र, वेळी अवेळी पडणारा पाऊस, दाटून येणारं मळभ यासगळ्यामागे हवामान बदल हे कारण आहे.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले,
"पिकांचं नुकसान होण्यामागचं हवामान बदल हे मुख्य कारण आहे. गेल्या काही वर्षांत या नुकसानाची पातळी वाढलेली आहे. कांद्याच्या पिकाच्या बाबतीतही हेच घडतंय.
चाळीसगावला झालेल्या पावसात माणसंदेखील वाहून गेली, कोकणात झालेल्या पावसामुळे फार मोठे प्रश्न निर्माण झाले. सोलापूरला झालेल्या पावसाचं पाणी पिकांमध्ये शिरलं. हे सगळे हवामान बदलाचे परिणाम आहेत. यामुळे महाराष्ट्रातल्या 28 लाख हेक्टर क्षेत्रावर परिणाम झालाय. कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याच्या दृषीने प्रयत्न करायला हवेत अन्यथा हवामान बदलाचा फेरा भविष्यात निश्चितपणे मोठे प्रश्न निर्माण करेल."
जगभरातल्या पिकांवर परिणाम
हवामान बदलाचा हा फटका फक्त भारतात नाही तर जगभरातल्या शेतीला बसतोय. भारतातल्या फळभाज्यांसारखाच अमेरिकेत कापसाच्या पिकावर परिणाम झालाय.

गेल्या वर्षी आफ्रिकेमधल्या टोमॅटोंचे दर असेच वाढलेले होते.
ब्राझीलमध्ये ज्या भागात अराबिका कॉफी पिकवली जाते तिथे गेल्यावर्षी भयंकर दुष्काळ पडला आणि जवळपास 30 टक्के पिकांचं नुकसान झालं. त्यातच तिथे कडाक्याची थंडी पडली परिस्थिती आणखी बिकट झाली.
हवामानातले बदल रोखण्यासाठी जोपर्यंत पावलं उचलली जात नाहीत, तोपर्यंत पूर, दुष्काळ, चक्रीवादळं, वणवे अशा नैसर्गिक आपत्ती येत राहतील, याचा परिणाम शेती-अन्नपदार्थावर होईल, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि त्यामुळे महागलेलं पेट्रोल डिझेल याचाही परिणाम होत राहील आणि महागाई भविष्यात अशीच वाढत राहील, असं जगभरातल्या तज्ज्ञांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























