You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अपूर्वा नेमळेकर: 'रात्रीस खेळ चाले'तील शेवंताची 'या' कारणामुळे मालिकेतून माघार...
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वी नेमळेकर हिने मालिकेतून माघार घेतली आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अपूर्वाने याबाबत सर्वांना माहिती दिली. तसंच ही मालिका सोडण्याचं कारणही तिने या पोस्टमधून सांगितलं आहे.
आपल्या या पोस्टमध्ये अपूर्वाने प्रोडक्शन हाऊसवर अनेक आरोप केले आहेत.
कभी कभी इतनाही काफी नहीं होता..
अपूर्वा नेमळेकर हिच्या तीन पानी सोशल मीडिया पोस्टचं शीर्षक तिची अस्वस्थता दर्शवतं.
शेवंता...बस नाम ही काफी है, पर कभी कभी इतनाही काफी नही होता...या शीर्षकाखाली तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
पोस्टमध्ये ती लिहिते, "शेवंता म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचं नातं एका साध्या अपूर्वाशी जोडलं गेलं. एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका करताना मला खूप मजा आली आणि समाधानही वाटलं. खर सांगायचं तर शेवंताचं सादरीकरण मला सहज जमत गेलं. जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना आवजर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य. त्या व्यक्तीरेखेतील विविध पैलू, निरनिराळ्या छटा यांमुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली."
"असं सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी शेवंताच्या भूमिकेचा त्याग का केला?
"असं काय घडलं की मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत, ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याचं उत्तर देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा उलगडा करणं हे माझं कर्तव्य समजून या खुलासा मी करत आहे," असं अपूर्वा नेमळेकरने लिहिलं.
वाढलेल्या वजनावरून थट्टामस्करी
अपूर्वी पुढे लिहिते, "शेवंता भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कमेंट आल्या, त्याला मी फेस करत आले. परंतु सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी वाढलेल्या वजनावरून माझं विडंबन केलं. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली.
त्यात काही कमेंट्स जिव्हारी लागणाऱ्या होत्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई करूनसुद्धा नवख्या कलाकारांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही.
प्रोडक्शन हाऊसवर आरोप
रात्रीस खेळ चालेचं शूटिंग सावंतवाडीत सुरू आहे. मुंबईवरून 12 तासांचा रेल्वे प्रवास करून मी जात होते. तिथं गेल्यानंतर एकच दिवस शूट केलं जायचं. नंतर 3-4 दिवस शूट केलं जायचं नाही. असं महिन्याभरात केवळ 6 ते 7 दिवस काम लागत होतं. त्यासाठी वारंवार प्रवास करावा लागत होता. यात महिन्याभराचा अमूल्य वेळ वाया जात होता.
"तिसऱ्या सीझनसाठीही आम्हाला 5 ते 6 दिवसच लागणार आहेत, असं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं होतं. तेव्हा मी नकार दिल्यानंतर मला आणखी एक शो देण्याचं आश्वासन देण्यात आलं परंतु 5 ते 6 महिने झाले तरी आश्वासन पूर्ण केलं नाही. यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं.
"असाच प्रकार गेल्या वर्षी झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेच्या वेळी घडला होता. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही. मी चॅनलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण मला कष्टाचा मोबदला मिळाला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मला बाहेर पडावं लागलं. हा माझा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे," असं अपूर्वाने म्हटलं आहे.
दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या या आरोपांवर चॅनेलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर या मालिकेच्या निर्मात्यांशीही यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्या बातमीत टाकण्यात येतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)