You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेले खुर्रम परवेझ कोण आहेत?
- Author, माजीद जहांगीर
- Role, श्रीनगरहून, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
काश्मीरचे श्रीनगरमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते 43 वर्षीय खुर्रम परवेझ यांना एनआयएनं त्यांच्या घरातून अटक केली आहे.
तपास संस्थेनी खुर्रम परवेझ यांची सोमवारी (22 नोव्हेंबर) अनेक तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अधिकृतरित्या अटक करण्यात आली.
एनआयएनं सोमवारी (22 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता त्यांच्या घरी छापा मारला आणि सुमारे दीड वाजेपर्यंत घराची तपासणी केली, असं खुर्रम यांच्या पत्नी समिना यांनी बीबीसीशी फोनवर बोलताना सांगितलं.
तपासणीनंतर एनआयएनं खुर्रम यांना सोबत नेलं आणि सायंकाळी सहा वाजता त्यांना अटकेची माहिती देण्यात आली, तसंच त्यांचे कपडे घेऊन यायला सांगितलं, अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिली.
खुर्रम यांच्या पत्नीच्या मते, एनआयएची टीम खुर्रम यांचा लॅपटॉप आणि दोन मोबाईलदेखील सोबत घेऊन गेली.
नेमके आरोप कोणते?
खुर्रम परवेझ यांच्या विरोधात यूएपीए आणि आयपीसीच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबीयांना देण्यात आलेल्या अरेस्ट मेमोनुसार, खुर्रम यांच्यावर आयपीसीच्या म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम 120B (गुन्हेगारी कटामध्ये सहभाग) आणि कलम 121 (भारत सरकार विरोधात युद्ध पुकारणे) लावण्यात आले आहेत.
खुर्रम यांच्या विरोधात अनलॉफुल अॅक्टिव्हिटिज (प्रिव्हेंशन) कायदा (यूएपीए) अंतर्गतही गंभीर कलमं लावण्यात आली आहेत.
त्यांच्यावर यूएपीएच्या कलम 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी जमवणे, कलम 18 (कट रचने) आणि 18B(दहशतवादी कारवायांसाठी एखादा व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींना तयार करणे), कलम 38 (दहशतवादी संघटनेचे सदस्य असणे) आणि कलम 40 (दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येही खुर्रम यांच्या घरी आणि कार्यालयावर एनआयएनं छापे मारले होते.
त्यापूर्वी खुर्रम परवेझ यांना 2016 मध्ये अटकही करण्यात आली होती. काश्मीरमध्ये कट्टरतावादी कमांडर बुरहान वानी एका चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक दिवस हिंसाचार सुरू होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती.
मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्रिपदी असताना खुर्रम यांच्यावर पब्लिक सेफ्टी अॅक्ट (पीएसए) लावण्यात आला होता.
खुर्रम यांना दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाला. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर लावण्यात आलेला पीएसए हटवण्यात आला.
खुर्रम संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जीनिव्हाला जात होते, त्याचवेळी त्यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती.
त्यापूर्वी 2004 मध्ये उत्तर काश्मीरच्या लोलाब परिसरात झालेल्या एका स्फोटात खुर्रम परवेझ यांची गाडीचं नुकसान झालं होतं.
त्यावेळी सुरू असलेल्या निवडणुकांची ते निगराणी करत होते. त्या स्फोटात त्यांचा एक पाय तुटला होता तर त्यांची एक सहकारी आसिया जिलानी याही गंभीर जखमी झाल्या होत्या. नंतर त्यांचा मृत्यू झाला.
मानवाधिकार उल्लंघनाविरोधात भूमिका
खुर्रम परवेझ जम्मू-कश्मीरच्या कोएलिशन ऑफ सिव्हिल सोसायटी (जेकेसीसीएस) नावाच्या एका सामाजिक संस्थेचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहेत.
या संस्थेनं गेल्या तीन दशकांपासून काश्मीरमध्ये तथाकथित मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनांवर आधारित अनेक रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत.
या रिपोर्टमध्ये जेकेसीसीएसनं काश्मीरमध्ये झालेलं मानवाधिकारांचं तथाकथित उल्लंघन, कैदेत असताना झालेले अत्याचार, बळजबरी बेपत्ता करण्यात आलेले लोक, हत्या आणि अटक यांच्याशी संबंधीत माहिती उजेडात आणली आहे.
2020 मध्ये या संस्थेनं त्यांच्या रिपोर्टमध्ये संशयास्पद कायद्याच्या चौकटीआडून सरकार जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेटवर बंदी लावत आहे, असं म्हटलं होतं.
जेकेसीसीएसचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर असण्याबरोबरच खुर्रम फिलिपाईन्समधील एशियन फेडरेशन अगेन्स्ट इन्वॉलन्ट्री डिसअपीअरन्स (एएफएडी) चे अध्यक्षही आहेत.
2006 मध्ये खुर्रम यांना रिबॉक ह्युमन राइट्स अवार्डनंही गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार अहिंसाच्या मार्गाचा अवलंब करत मानवाधिकारांसाठी लढा दिलेल्या तीस वर्षांखालील व्यक्तीला दिला जातो.
अटकेबाबत प्रतिक्रिया
जो कोणी विरोधात आवाज उठवतो, त्याला तुरुंगात टाकलं जातं असं, पीडीपीचे प्रवक्ते सोहेल बुखारी म्हणाले.
"एखाद्याला काही सांगायचं असेल, किंवा मानवाधिकारांच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर त्याला ते करण्यापासून रोखलं जातं. खुर्रम यांची अटक हा त्याचाच एक भाग आहे," असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.
जम्मू काश्मीरमधील भारतीय जनता पार्टीनं ही अटक योग्य असल्याचं म्हणत, राजकारण आणि मानवाधिकारांच्या नावाखाली लोकांनी आजवर मनात येईल तसं वर्तन केल्याचं म्हटलं आहे.
"मानवाधिकाराच्या नावाखाली याठिकाणी ज्या संघटना सुरू आहेत, त्या लोकांचा कायम टेरर फंडिंगमध्ये सहभाग राहिला आहे. खुर्रम परवेझ यांना NIA नं ज्या पद्धतीनं अटक केली आहे, त्यावरून त्यांना ठोस पुरावे सापडले असतील. कारण एनआयएची विश्वसनीयता आहे. वेळ आल्यावर सर्वकाही समोर येईल. खुर्रम यांच्यावर आधीही तपास संस्थांची नजर असेल. त्यांनी काही तरी केलं असेल, म्हणूनच त्यांना अटक झाली असेल," असं प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणाले.
"अशा प्रकारची अटक ही बहुतांशवेळा राजकीय उद्देशानं केली जाते, हे गेल्या सहा-सात वर्षांपासून केंद्र सरकारला माहिती आहे. अटक केलेल्या व्यक्तीबाबत काही सिद्ध झालं किंवा नाही झालं तरी, त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्वकाही केलं जातं. माझ्या मते, जर एखाद्या व्यक्तीबाबत निःपक्ष तपास केला तर सत्य सर्वांसमोर येईल," असं जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रमुख गुलाम अहमद मीर म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते नबी डार यांनी फोनवरून प्रतिक्रिया देतो असं सांगितलं, मात्र त्यांच्याशी नंतर संपर्क होऊ शकला नाही.
असोसिएशन ऑफ पॅरेंट्स ऑफ डिसअपियर्ड पर्सन (एपीडीपी) च्या अध्यक्षा परवीना अहंगर यांनी खुर्रम यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
बीबीसीनं खुर्रम यांचे वकील परवेझ इमरोज यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
'खुर्रम कट्टरतावादी नाहीत'
मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्यांबाबत संयुक्त राष्ट्राच्या विशेष दूत मॅरी लॉलोर यांनी खुर्रम हे कट्टरतावादी नसल्याचं म्हटलं आहे.
"खुर्रम परवेझ यांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे आणि भारतातील अधिकारी त्यांच्यावर दहशतवादाशी संबंधित गुन्हे दाखल करणार आहे, अशा बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. ते दहशतवादी नाहीत, ते मानवाधिकारांचे रक्षक आहेत," असं ट्विट त्यांनी केलं.
जीनिव्हा मधील वर्ल्ड ऑर्गनायझेशन अगेन्स्ट टॉर्चर (ओएमसीटी) नंही खुर्रम यांच्या अटकेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
"पोलिसांच्या ताब्यात असताना खुर्रम यांच्यावर अत्याचार होईल, याची चिंता आहे," असं या संस्थेनं त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)