एसटी संप : 'आत्महत्या करण्यापेक्षा मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवलेला बरा'

विजय खैरनार
फोटो कॅप्शन, एसटी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या विजय खैरनार यांच्यावर गवंड्याच्या हाताखाली मजुरी करायची वेळ आली आहे.
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

येवल्यातला गंगा दरवाजा या भागात विजय खैरनारांचं कुटुंब राहातं. पत्ता शोधत शोधत गेलो. लहानशी गल्ली, वाहतं सांडपाणी, एखादं-दोन भटकणारी डुकरं... तिथेच एका खोलीच घर.

आदल्या दिवशी विजय यांना फोन केला तर या म्हणाले, पण नंतर त्यांचा फोनच बंद आला. त्यांच्या घरापाशी गेलो तर घरात त्यांच्या पत्नी एकट्याच. हे कामाला गेले पण कुठे गेलेत काहीच माहिती नाही असं त्या म्हणाल्या.

आता काय करावं या प्रश्नात असताना विजय यांचा फोन आला आणि म्हणाले धामणगावला एका बांधकामावर काम करतोय.

जरा वेळाने लक्षात आलं की, त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांना मी पत्रकार न वाटता कोणीतरी अधिकारी वाटले आणि आपल्यावर उगाच कारवाई होईल या भीतीने त्यांनी नंतर माझा फोन उचलला नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

हे सांगायचं कारण म्हणजे इतकं पिचलेलं आणि हलाखीत जगणारं विजय खैरनारांचं कुटुंब आहे. म्हणजे त्यांना नोकरी नाही असं नाही. गेली नऊ वर्षं ते एसटी महामंडळात येवला आगारात ड्रायव्हर म्हणून काम करतात.

आज त्यांना गवंड्याच्या हाताखाली मजुरी करायची वेळ आली आहे.

विजय यांच्या घरी गेलो तर आधी भेटल्या त्यांच्या गृहलक्ष्मी मीरा. रोजच्या स्वयंपाकाला किराणा कुठून आणावा सध्या याच विवंचनेत त्या असतात.

"पैसाच नाही हातात. घरात किराणा नाही, बाजाराला पैसे नाही. घरी मुलगी, मुलगा आलेले. लेक-जावई आलेले. त्यांना कपडे करायला पैसे नाहीत. अशीच गेली आमची दिवाळी," त्या थांबत थांबत एकेक वाक्य तुटक तुटक बोलत होत्या.

विजय, त्यांच्या पत्नी मीरा, दोन मुली, एक मुलगा आणि आईवडील असं कुटुंब आहे. मोठ्या मुलीचं मागच्याच वर्षी लग्न झालंय, तीही गेले चार महिने आजारी होती. तिला मनमाडच्या सरकारी दवाखान्यात दाखल केलं होतं.

हातात पैसा यायला तर एकही रस्ता नाही, पण जायला हजार रस्ते आहेत.

"मुलीचं लग्न केलं तेव्हा एक रुपया नव्हता आमच्या हातात, ते माझ्या आईवडिलांनीच लावून दिलं," मीरा सांगतात.

मीरा खैरनार
फोटो कॅप्शन, रोजच्या स्वयंपाकाला किराणा कुठून आणावा याच काळजीत मीरा असतात

घरात दूध, भाजीपाला आणयलाही पैसे नाहीत तरी आम्ही निघत असताना 'घरी आलेल्याला तसंच कसं पाठवायचं' या विचाराने चहाचा आग्रह करतात. मनातल्या मनात दूध कुठून आणायचं ही जुळवाजुळव करत असेल ती माऊली.

घराच्या अशाच परिस्थितीमुळे विजय खैरनार मजुरी करायला जातात. त्यात त्यांची आठवड्याला हजार-दीड हजार अशी कमाई होते.

एसटीचा पगार आधीच कमी, त्यामुळे अडीअडचणींसाठी कर्ज घेतलेलं. पगारातून कर्जाचे हफ्ते जात असल्याने त्यांच्या हातात अवघे चार हजार महिन्याला येतात.

आता तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्यामुळे काम बंद, पगार नाही.

विजय यांच्या घरच्यांची भेट घेऊन निघालो. जवळच असणाऱ्या धामणगावी ते एका घराच्या बांधकामवर गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करत होते.

"मॅडम काय करू सांगा? आमच्या 36 लोकांनी आजवर आत्महत्या केल्यात. तसं करण्यापेक्षा मी मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतोय," मला भेटल्यावर विजय म्हणाले.

कोव्हिडच्या काळातही एसटी बंद होत्या तेव्हाही काही महिने विजय मजुरी करूनच घर चालवत होते.

"माझी इतकी बेकार परिस्थिती आहे. घरात कोणत्या गोष्टीला पैसै नाहीत. माझं वीज कनेक्शन तोडलं होतं कारण बिल भरलं नाही, शेवटी मुलाने इथून तिथून पैसे गोळा केले आणि चार हजार रुपये भरले, तरी अजून दीड हजार रुपये बाकी आहेत," ते सांगतात.

हलाखीमुळे आता विजय यांची मुलगी धुणंभांड्याची कामं करायला जाते, तर मुलगाही मजुरी करायला जातो.

आज त्यांच्या दोन्हीही मुलांचं शिक्षण सुटलं आहे.

"मुलांना शिकवू की खायला घालू?" विजय हताशपणे विचारतात. "महागाई इतकी वाढली आहे, पैसा आणायचा तरी कुठून हो?"

"आज माझी मुलगी पंधरा वर्षांची आहे, दोन-तीन वर्षांत मला तिचं लग्न करून देणं आहे, तेव्हा कुठून आणू पैसे? पगार वाढत नाही, हातात दुसरं कुठूनही पैसा येत नाही. आज मुलगी काही कमवेल, मुलगा हातभार लावेल तेव्हा तिच्या लग्नासाठी पैसे जमा होतील ना," ते आपल्या विवंचना सांगतात.

विजय खैरनार

मुलीचं लग्न, घरखर्च, वृद्ध आईवडिलांचं आजारीपण असे सगळे प्रश्न फणा काढून त्यांच्यापुढे उभे असतात. पण सगळ्यांत मोठी चिंता आहे ती रोज हातातोंडाची गाठ कशी घालायची याची.

बोलता बोलता विजय म्हणतात, "मॅडम एसटीचा खरा कणा, मुलभूत पाया चालक आहे."

"आज आमच्या मायभगिनी एसटीतून प्रवास करतात, त्या कोणाच्या भरोशावर तर चालकाच्या. एसटी चालकाला कुठलं व्यसन नसतं, तो विश्वासू असतो. पाव्हणे विश्वास टाकतात आणि आम्ही तो विश्वास सार्थ ठरवतो. पण आमच्याकडे कोण बघतो? आमच्या प्रश्नांची कोण दखल घेतो," त्यांच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नसतं.

एसटी ड्रायव्हर्स किंवा कंडक्टर्स काम करतात तेव्हाही त्यांना अनंत अडचणी असतात. त्या अडचणींचा पाढा विजय वाचून दाखवतात.

"आम्हाला ड्युटी लावली म्हणजे ती करणं आहेच. खाजगीवाल्यांसारखं गाडी बाजूला लावून झोप तर काढू शकत नाही आम्ही. मुक्कामाची काही सोय नसते. मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय नसते.

आज बाहेर खायचं म्हटलं तर कमीत कमी ऐंशी रुपयाला एक भाजी मिळते आणि दहा रुपयाला पोळी. कुठून आणायचे हे पैसे आम्ही. आमच्या बायका भाकऱ्या बांधून देतात त्याच शिळ्या भाकऱ्या खाऊन आमचा दिवस साजरा होतो."

आज दोन आठवडे होऊन गेले तरी एसटी कामगारांचा संप मिटलेला नाही. त्याच्या मागण्या मान्य होतील किंवा नाही हे स्पष्ट नाही पण विजय खैरनारांसारख्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य अंधारात आहे हे नक्की.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)