'जय भीममधल्या प्रकाशराज यांच्या ‘त्या’ दृश्याला पब्लिसिटी स्टंट म्हणणं चुकीचं’

तामिळ सुपरस्टार सूर्या याचा 'जय भीम' चित्रपट दिवाळीच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झालाय आणि प्रचंड चर्चेत आहे. दुसरीकडे या चित्रपटावर वादही निर्माण झालाय.
सिनेमातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो काढून टाकावा अशी मागणीही अनेकांनी केली.
या वादाबद्दल तसंच 'जय भीम'च्या एकूणच निर्मिती प्रक्रियेबद्दल बीबीसी तमीळने चित्रपटाचे दिग्दर्शक टी. ज्ञानवेल यांच्याशी संवाद साधला. त्या मुलाखतीचा काही भाग...
'जय भीम'ला असा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती?
आम्ही जेव्हा 'जय भीम' हे नाव निवडलं तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतील हे माहिती होतं. त्यातला फायदा किंवा सकारात्मक गोष्ट म्हणजे या शीर्षकाकडे बदलाची घोषणा म्हणून पाहिलं, स्वीकारलं गेलं.
चित्रपटाच्या कथेचं स्वरुप असंच राहावं यावर मी ठाम होतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक तरुणांनी वकील बनण्याची इच्छा व्यक्त केली. तुम्ही एखाद्या विषयावर परखडपणे मत मांडलं, बोललात तर त्याला विरोधही होतोच.
मात्र, हा संपूर्ण तमिळ समाज बदलासाठी अशा गोष्टी किंवा चर्चा स्वीकारण्यास तयार असतो.
चित्रपटाच्या पहिल्याच सीनमध्ये तुम्ही जातीव्यवस्थेवर परखडपणे मत मांडता. यापूर्वी तमीळ सिनेमात असं काही झालेलं नाही, मग यामागची प्रेरणा काय होती?
या घटनेशी संबंधित माहिती मिळवताना मला मागासवर्गीय आयोगाकडे सादर करण्यात आलेला एक अहवाल आढळला.
पोलिसांना दिलेल्या जबाबातून पीडित कसे पकडण्यात आले होते, हे त्यातून लक्षात आलं. हीच प्रेरणा या दृश्याच्या मागं होती. अशा गोष्टींवर भाष्य करणं आपल्याला फारसं महत्त्वाचं वाटत नाही.
'जय भीम' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित होता. अशावेळी अधिकाधिक वास्तववादी दृश्य मिळवण्यात नेमकी काय आव्हानं होती?
दोन भिन्न प्रकारची आव्हानं होती. त्यातील पहिलं म्हणजे सर्वसामान्यांप्रमाणे राहणाऱ्या आदिवासींचं जीवन. कारण साधारणपणे आदिवासी डोंगरांवर राहत असतात. पण सर्वसामान्यांप्रमाणेच राहणाऱ्या आदिवासींचं जीवन नेमकं कसं असतं, याची कल्पनाच नव्हती. त्यामुळं त्यांच्या जीवनाबाबत चर्चा करावी लागली. मी तेही केलं.
मी आधी शिक्षणाशी संबंधित काम केलं होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या समस्या मला माहिती होत्या.

फोटो स्रोत, PR IMAGES
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा दूर असते. आदिवासींना गावापासून दूर ठेवलं जातं. आदिवासींसाठी काम करणारे माझे सगळे मित्र आणि प्राध्यापक कल्याणी यांचीही खूप मदत झाली. त्यामुळं शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्यानं त्यासाठी आदिवासींच्या जीवनाशी संबंधित बाबींकडेही लक्ष द्यावं लागलं.
कथानक तुरुंग आणि न्यायालय याभोवती फिरणारं आहे. चंद्रू यांनी मला या केसबद्दल माहिती दिली होती. त्यामुळं चित्रपट सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानं आम्ही चित्रपट पूर्णपणे न्यायालयात वकिलाच्या दृष्टिकोनातून सादर केला.

फोटो स्रोत, @2D_ENTPVTLTD
चित्रपटातील अंधःकार हा आदिवासींचं प्रतीक म्हणून वापरला आहे. तसं नसतं तर चंद्रू यांनी कायद्याच्या दृष्टीनं ज्या अडचणींचा सामना केला, त्यासह आदिवासींच्या जीवनातील आव्हानं याला चित्रिकरणाच्या दृष्टीनं काही महत्त्वच राहिलं नसतं. अशा गोष्टींमुळं सहजपणे चित्रपट माहितीपटासारखा वाटू शकतो. पण तरीही मी कलात्मकपणे ते आव्हान स्वीकारलं.
चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर अभिनेते सूर्या भूमिका आणि निर्मितीसाठी तयार झाले होते. पण चंद्रू यांच्या भूमिकेसाठी तुमची पहिली पसंती कोणाला होती?
मी सुरुवातीला पसंती वगैरे असा विचारच केला नाही. कारण ही अत्यंत आव्हानात्मक बाब होती. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने ही भूमिका करावी अशी माझी इच्छा होती. पण मी कोणाला विचारू शकत नव्हतो. कारण यात नेहमीप्रमाणे गाणं, अॅक्शन अशा गोष्टी नव्हत्या.
जर चित्रपटात नेहमीप्रमाणे मसाला नसेल तर मजा येणार नाही, याची कल्पना होता. अशा अनेक अडचणी होत्या. त्यामुळं याबाबत विचारणं कठिणच होतं.

फोटो स्रोत, PR IMAGES
कदाचित हा होकार मिळाला नसता तर अनेक दारं ठोठवावी लागली असती. कारण ही कथा कशी स्वीकारली जाईल, हा प्रश्न होता.
कथा सांगताना माझी सुरुवात 'जय भीम' शीर्षकानं होणार, त्यामुळं किती निर्मात्यांना हा विषय लक्षात येईल हेच कळत नव्हतं. पण कथा सांगायला सुरुवात केल्यानंतर पाच मिनिटांत होकार मिळाला. साधारणपणे अशा पटकथांना होकार मिळायला चार ते पाच वर्षे लागतात. मात्र माझ्याबाबतीत तसं झालं नाही. आणखी एक अनपेक्षित गोष्ट घडली. ती म्हणजे अभिनेते सूर्या यांनी स्वतःच भूमिका करणार असल्याचं म्हटलं.
सूर्या केवळ चित्रपटाचा अभिनेता नसून निर्माताही आहे. कथेचा विषय समजून घेत ती लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळं मला प्रचंड बळ मिळालं आणि त्याच मोकळेपणानं मी ही कथा मांडू शकलो.
या खटल्यावर चित्रपट तयार करणार असल्याचं चंद्रू यांना समजलं तेव्हा ते काय म्हणाले?
त्यांच्या पत्नी भारती यांनी चंद्रू निवृत्त झाले तेव्हा त्यांच्याबाबत एक माहितीपट बनवण्याची विनंती केली होती. पण चंद्रू यांनी नकार दिला.
मात्र, या प्रकरणात ते तयार झाले. त्याचं कारण म्हणजे या आदिवासी महिलांची न्यायासाठीची लढाई अजूनही सुरू आहे, आणि या चित्रपटामुळं ती सर्वांसमोर येणार होते.
ते आणि प्राध्यापक कल्याणी जवळचे मित्र आहेत. ते वकील होते तेव्हापासून कल्याणी यांना ओळखतात. चंद्रू यांनी कल्याणी यांची अनेक प्रकरणं हाताळली आहेत. कल्याणी यांनी एकट्यानंही 11 प्रकरणं हाताळली आहेत. कायद्याच्या या लढाईत पोलिस कल्याणीला अटक करू शकले नाहीत, त्याचं एकमेव कारण म्हणे चंद्रू आहेत. कल्याणी यांनी अनेक ठिकाणी तसं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, PR IMAGES
चंद्रू यांनी त्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्यच मानलं होतं. लोकांची सेवा करण्यासाठी कल्याणी यांना काम करण्यासाठी चंद्रू यांनी दिलेलं ते मोलाचं योगदान होतं.
कथेसाठी तुम्ही स्वतः पार्वती यांना भेटला का?
नाही, मी भेटलो नाही. मी गावात विचारणा केली तर ती मुलीसह दुसऱ्या गावी निघून गेल्याचं सांगण्यात आलं. शिवाय मला भेटण्याची गरजही वाटली नाही. खटल्याच्या वेळी पार्वतीचं वय 40 पेक्षा अधिक असेल.
अधिक चांगल्या प्रकारे ही कथा मांडण्यासाठी तरुण दाम्पत्य असेल तर अधिक योग्य ठरेल, असं मला वाटलं. त्यामुळं त्यांना भेटल्यानं मला तसं लिहिता आलं नसतं.
1993 मध्ये जे घडलं ते बदलून 1995 का केलं?
यामागचं कारण मी 'क्रिएटिव्ह लिबर्टी' असं म्हणेन. मी यात संघर्ष मांडला आहे. खासगी टिव्ही वाहिन्यांसारख्या गोष्टी 1993 मध्ये सुरू झाल्या पण 1995 मध्ये समोर आल्या. त्यापूर्वी आपण प्रत्येक राज्याचं स्वतंत्र चॅनेल किंवा असं काही विचारही करू शकत नव्हतो. त्यात हवामानाची माहिती, सरकारी बातम्या असे अनेक निर्बंध होते.

फोटो स्रोत, PR IMAGES
पण खासगी वाहिन्या आल्याने हे सर्व बदललं. त्यामुळं या काळात अनेक बदल घडत गेले. तमिळनाडूच्या दृष्टीनंही हा काळ महत्त्वाचा होता. कारण तमिळनाडूमध्ये 1995 - 1996 मध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते. त्यामुळं हा काळ माझ्यासाठी योग्य होता.
केवळ हिंदीत बोलल्यामुळं प्रकाशराज एकाला थप्पड मारत असल्याचं दाखवलं आहे. त्यावरून वाद झाला आहे? त्या दृश्याचा उद्देश काय होता?
प्रकाशराज यांनी मुलाखतीत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते एक पात्र आहे. त्याचा चोरीच्या एका प्रकरणाशी संबंध आहे.
त्याला केवळ हिंदी बोलल्यामुळं मारलं असं समजणं म्हणजे त्याचा योग्य अर्थ न समजण्यासारखं आहे. असं करता येत नाही, हे सर्वांनाच समजतं.

फोटो स्रोत, PR IMAGES
'स्कॅम 1992' या सीरिजमध्ये एका तमीळ पात्राला हिंदी येत नाही म्हणून अशीच वागणूक दिल्याचं दाखवलं आहे. त्यात काही अडचण वाटली नाही.
भाषा लादल्याने राग वाढतो हे मी नाकारत नाही. पण याचा काही तसा हेतू किंवा उद्देश नव्हता.
काही लोकांनी याचं व्यावसायिकदृष्ट्या चांगली युक्ती म्हणून कौतुकही केलं. पण जर यामुळं चित्रपट उत्तर भारतापर्यंत पोहोचला असं म्हटलं जात असेल, तर चित्रपट तयार करण्याचा मूळ हेतूच मागं पडला. मला त्याचं कौतुकही आवडणार नाही. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























