गर्भपात झाला म्हणून तिला 4 वर्षांची शिक्षा झाली, कारण...

ब्रिटनी पुलॉ

फोटो स्रोत, STATE OF OKLAHOMA

फोटो कॅप्शन, ब्रिटनी पुलॉ यांना मनुष्यवधासाठी दोषी ठरवत 4 वर्षांची शिक्षा देण्यात आली.
    • Author, रॉबिन लेविन्सन-किंग
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

ओक्लाहोमामधल्या 21 वर्षांच्या अमेरिकन महिलेला गर्भपात झाल्यानंतर तिला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं, त्यानंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला. पण असं घडलेल्या त्या अमेरिकेतील एकट्याच महिला नाहीत.

जानेवारी 2020 मध्ये ब्रिटनी पुलॉ यांनी रुग्णालयात बाळ गमावलं त्यावेळी त्या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या.

जन्माला न आलेल्या मुलाच्या हत्येप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

गर्भपातापासून ते स्वतःच्याच पोटातील बाळाच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास होईपर्यंत त्यांना किती अडचणी आणि वेदनांचा सामना करावा लागवा, याबाबत सध्या माध्यमांमध्ये आणि इंटरनेटवर चर्चा सुरू आहे.

गर्भपात जागरुकता महिन्यामध्येच त्यांना दोषी ठरवण्यात आलं याकडंही काही समाजमाध्यमांनी लक्ष वेधलं. तर इतरांनी याची तुलना मार्गारेट अॅटवुड यांच्या डिस्टोपियन कादंबरीमधील 'द हँडमेडस टेल'मधील प्रकरणाशी केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

गर्भवती असताना काही बेकायदेशीर ड्रग्ज किंवा औषधांचं सेवन केल्याचं पुलॉ यांनी उपचारांसाठी रुग्णालयात आलं असताना मान्य केलं.

नंतर वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाच्या यकृत आणि मेंदूमध्ये मेथॅम्फेटामाईनचे (एक प्रकारचा अंमली पदार्थ) काही अंश आढळल्याचं समोर आलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अर्भकाच्या मृत्यूचं कारण वैद्यकीय तपासणीत स्पष्ट करण्यात आलं नाही. मात्र अनुवांशिक दोष, प्लॅसेंटामधील अडचणी किंवा आईनं मेथाम्फेटामाईनचं सेवन करणं ही कारणं असू शकतात, असं म्हटलं आहे.

पुलॉच्या वकिलांनी त्यांच्या सुटकेसाठी अपील करणार असल्याचं म्हटलं आहे. तर ज्या सरकारी वकिलांनी त्यांचा खटला कोर्टासमोर मांडला त्यांनी प्रकरण न्यायालयात असल्यानं बोलण्यास नकार दिला आहे.

मात्र पुलॉ यांची ही कथा म्हणजे केवळ हिमनगाचं एक टोक आहे, असं नॅशनल अॅडव्होकेट्स ऑफ प्रेगनंट वूमन (NAPW) च्या उपकार्यकारी संचालक दाना सुसमन यांनी म्हटलं आहे.

"ब्रिटनी यांच्या प्रकरणाने वर्मावर बोट ठेवलंय. लोकांना वाटतंय तितकी अशी प्रकरणं दुर्मिळ नाही," असं सुसमन म्हणाल्या.

सुसमन यांची संघटना पुलॉ यांना मदत करत आहेत. तसंच अमेरिकेतील गर्भवती महिलांच्या प्रकरणात बळजबरीने हस्तक्षेपाची प्रकरणं आणि अशा महिलांची अटक यावर नजर ठेवण्याचं कामही करत आहे.

1973-2020 या काळात NAPW नं अशा 1,600 प्रकरणांची नोंद केली आहे. त्यापैकी 1,200 प्रकरणं ही गेल्या 15 वर्षांच्या काळातली आहेत.

यामध्ये समावेश असलेल्यांमध्ये खाली पडल्यामुळं किंवा घरी प्रसुती झालेल्या महिलांचा समावेश असला तरी अधिक प्रमाण हे ड्रग्जचा संबंध असलेल्या प्रकरणांचा आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा स्फोट हा अमेरिकेच्या ड्रग्ज विरोधातील लढ्याचा आणि पर्सनहूड मुव्हमेंटचा भाग असल्याचं सुसमन यांनी म्हटलं आहे.

क्रॅक बेबीज

व्यसनाधीन माता जन्म देत असलेल्या मुलांबाबत 1980 मध्ये क्रॅक बेबी (crack baby) ही संकल्पना वापरली जाऊ लागली. त्यावेळी भ्रूणावर ड्रग्जच्या परिणामाबाबत चर्चेला सुरुवात झाली.

अमेरिकेत कोर्टाबाहेर झालेली निदर्शनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेत कोर्टाबाहेर झालेली निदर्शनं

गर्भवती महिलांनी ड्रग्जचं सेवन केल्यास त्याचे अनेक वाईट परिणाम समोर येतात. त्यात गर्भपाताच्या धोक्याबरोबरच मृत बाळ जन्माला येण्याचाही धोका असतो.

पण प्रत्यक्ष भ्रूणावर त्याचा होणारा परिणाम अधिक वाईट असतो. 1980 पासून झालेल्या अभ्यासांनुसार कोकोनचं व्यसन असलेल्या मातांच्या बाळांमध्ये शारीरिक विकासासंबंधीच्या अनेक अडचणी असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

तेव्हापासूनच मेथॅम्फेटामाईनच्या वापरापासून इतर ड्रग्जच्या वापराचा मुद्दाही कायम चर्चेत राहिला आहे.

त्यात अमेरिकेतील काही राज्यांनी केलेल्या कायद्यांमुळं गर्भपात करणंदेखील अधिक कठीण होऊन बसलं आहे. गर्भपाताला विरोध करण्यासाठी विविध कारणं दिली जातात. त्यात नैतिक आणि धार्मिक मुद्द्यांचा समावेश असतो. पण त्याचबरोबर चर्चेमध्ये पर्सनहूड (व्यक्तिमत्त्वाच्या) मुद्द्याचाही समावेश असतो.

"पर्सनहूड ही संकल्पना अगदी सोपी आहे," असं पर्सनहूड अलायन्स एज्युकेशनच्या सारा क्वेल म्हणाल्या.

"मानव हे मानव आहेत आणि समानता ही मानवतेवर अवलंबून आहे, असा पर्सनहूडचा अर्थ आहे. आपण सुरुवातीपासून अगदी अखेरपर्यंत जैविक मानव असतो, हे वैद्यकीय तथ्य कशानेही बदलणार नाही. त्यामुळं माणूस म्हणून कायद्यानुसार सर्वांना समान संरक्षण आणि जन्मजात नैसर्गिक अधिकार आहेत," असं त्या म्हणाल्या.

या पर्सनहूड चळवळीच्या माध्यमातून गर्भपातावर नियंत्रण आणण्यापलिकडे कायद्यानुसार भ्रूणाला जन्मल्यानंतर तो राज्याचा नागरिक असण्यासारखे अधिकार देण्यासही मदत झाली आहे.

गर्भवती मातांच्या ड्रग्ज सेवन प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवावा किंवा नाही याबाबत पर्सनहूड चळवळीची स्पष्ट भूमिका नाही. मात्र, आई गर्भवती असताना तिनं ड्रग्ज सेवन केल्यामुळं भ्रूणाला जी हानी पोहोचते, त्यापासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठीच्या तरतुदींना पाठिंबा असल्याचं क्वेल म्हणाल्या.

मात्र, कायदेव्यवस्थेनं केवळ जबाबदारी निश्चित करून चालणार नाही. त्यांनी ड्रग्जचं व्यसन असलेल्यांचं पुनर्वसन आणि उपचार यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असंही त्या म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)