कमल रणदिवे : गुगल डुडलवर झळकणारी ही महिला कोण आहे?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ब्रेस्ट कॅन्सर जेनेटिक (आनुवांशिक) असू शकतो. म्हणजे आईला, आजीला, मावशीला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मुलीलाही कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत असणारे BRCA1 and BRCA2 जीन्स (जनुकं) आईकडून मुलीकडे जातात आणि जर हे जीन्स मुलीच्या शरीरात असतील तर कॅन्सर व्हायची शक्यता अनेकपटींनी वाढते. अमेरिकेत हे जीन्स शरीरात असणाऱ्या महिलांना स्तन काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रेस्ट कॅन्सर आनुवांशिक असू शकतो हे लक्षात आल्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये मोठा बदल झाला. त्यावर वेगळ्या दृष्टीने संशोधन सुरू झालं.

पण तुम्हाला माहितेय का की ब्रेस्ट कॅन्सरबद्दलच्या या संशोधनात एका मराठी महिला डॉक्टरचं मोलाचं योगदान आहे.

त्यांचं नाव कमल रणदिवे. त्याच्या कामाचं महत्त्व ओळखून गुगलने त्यांना समर्पित डुडल काढलं.

कोण होत्या कमल रणदिवे?

डॉ कमल रणदिवे जैववैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांचा जन्म 1917 साली पुण्यात झाला. त्यांचे वडील स्वतः जैवविज्ञानिक होते. डॉ कमल यांचं शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं.

त्यांना सायटोलॉजी, म्हणजे पेशींच्या अभ्यासाच पीएचडी मिळवली आणि इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये रिसर्चर म्हणून काम करायला लागल्या. पुढे त्या फेलोशिपवर शिकण्यासाठी अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात गेल्या.

अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये आपलं काम सुरू केलं.

1966 ते 1970 या काळात त्यांनी इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरचं अध्यक्षपदही भूषवलं. डॉ कमल रणदिवे यांनी साठच्या दशकात भारतातली पहिली टिश्यू कल्चर लॅब स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्या भारतातल्या पहिल्या काही संशोधकांपैकी होती ज्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि आनुवांशिकता यातला दुवा उलगडून दाखवला.

त्यांनी कॅन्सर आणि इतर व्हायरस यांचा काय संबंध असतो यावरही संशोधन केलं आणि त्यांचा कसा एकमेकांवर कसा प्रभाव पडतो हे दाखवलं. फक्त कॅन्सरच नाही तर त्यांनी अनेक रोगांच्या बाबतीत महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांनी कुष्ठरोगावरची लस विकसित करण्यात मदत केली.

पण वैद्यकीय क्षेत्रसोडून त्यांचं आणखी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी 1973 साली आपल्या 11 सहकाऱ्यांसह इंडियन विमेन्स सायटिंस्ट्स असोसिएशनचा स्थापना केली.

आजही ही संस्था संशोधन, विज्ञान क्षेत्रात महिलांनी पुढे यावं, करिअर करावं यासाठी प्रयत्न करते.

डॉ कमल रणदिवे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. त्यांना 1964 साली मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाचं पहिलं सिल्व्हर ज्युबिली अवॉर्डही मिळालं.

त्यांना त्यांच्या मायक्रोबायोलॉजी क्षेत्रातल्या कामाबद्दल वॉटमल फाऊंडेशन पुरस्कारही मिळाला.

या गुगल डुडलचं डिझाईन आर्ट डिरेक्टर इब्राहिम राईनकान्थ यांनी केलं आहे. या डुडलमध्ये डॉ रणदिवे एका मायक्रोस्कोपमधून सुक्ष्मजीवांचं निरिक्षण करताना दिसत आहेत.

आपल्या डुडलविषयी बोलताना राईनकान्थ म्हणाले, "विसाव्या शतकाल्या प्रयोगशाळा, त्यांची रचना आणि सुक्ष्मजीवांची दुनिया हे डुडल बनवताना माझ्या समोर होते."

या मालिकेतले इतर लेख वाचलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)