You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टी20 वर्ल्ड कप : विराट कोहलीच्या टॉसबाबत पाकिस्तानात अफवा, वाढदिवसाच्या दिवशीच ट्रोलिंग
- Author, अब्दुल रशीद शकूर
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
बुधवारी सायंकाळी टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरोधात मैदानावर उतरला तेव्हा, भारताची स्थिती "करा किंवा मरा" अशी आहे, हे सर्वांना माहिती होतं. कारण भारतानं पाकिस्तान आणि न्यूझीलंडबरोबरचे दोन सामने गमावले होते.
अफगाणिस्तानविरोधात सर्वोत्तम कामगिरी करण्याशिवाय दुसरा पर्याय भारतासमोर नव्हता.
भारताने तशीच कामगिरी केली आणि या स्पर्धेत 200 धावांचा टप्पा ओलांडणारा भारत हा पहिला देश बनला. मात्र, पाकिस्तानच्या विरोधात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघानं भारताविरोधात नांगी कशी टाकली, ही बाब क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
कदाचित यामुळंच सामन्यानंतर लगेचच अफगाणिस्तानच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं. पाकिस्तानमधील सोशल मीडिया यूझर्सनं यावर शंका उपस्थित केली.
सोशल मीडिया, टीव्ही वाहिन्या आणि सार्वजनिक ठिकाणीही याचीच चर्चा सुरू झाली. त्यात सगळ्यांनी जोर देत हा सामना फिक्स असल्याचा दावा केला. भारताचं स्पर्धेतील आव्हान कायम राहावं म्हणून अफगाणिस्ताननं पराभव पत्करत भारताची मदत केली, असं म्हटलं जाऊ लागलं.
शोएब अख्तरनं म्हटलं, आरोप करू नका
पाकिस्तानातील माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानी नागरिकांना अशा प्रकारचा ट्रेंड चालवून अफगाणिस्तानच्या संघावर आरोप करू नये, अशी विनंती केली आहे. हा प्रकार अफगाणिस्तानच्या संघासाठी धोकादायक असू शकतो, असं शोएब अख्तर यांनी म्हटलं.
अफगाणिस्तानचा संघ नुकताच तयार झालेला असून तुलनेनं काहीसा कमकुवत आहे. त्यांचा सामना टी20 मधील सर्वांत मोठ्या आणि दर्जेदार भारतीय संघाबरोबर होता. अफगाणिस्तानचा खेळ हवा तसा झाला नाही ही तक्रार मलाही आहे, मात्र भारतीय संघ अत्यंत बळकट आहे, असं त्यांनी म्हटलं.
अफगाणिस्तानची अवस्था पाहता, अशाप्रकारचे आरोप अफगाणिस्तानच्या संघासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यांना त्यांच्या देशात "शरिया" न्यायालयांचा सामनाही करावा लागू शकतो, असं त्यांनी म्हटलं. अफगाणिस्तानच्या संघाविरोधात चालवलेल्या या ट्रेंडमध्ये पाकिस्तानचे नागरिक सर्वाधिक सक्रिय आहेत.
तर्क नव्हे भावना आणि फेक न्यूज
हा सामना संपल्यानंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या, त्यात कुठंही तर्क नव्हता. लोकांनी केवळ एकसारख्या प्रतिक्रिया फॉरवर्ड केल्या, त्यात भावनाच अधिक जाणवल्या.
फेक न्यूजचा हा प्रकार नेमका सुरू कसा झाला, याचा अंदाज लावणं कठीण आहे, मात्र एक व्हीडिओ आणि एका ट्विटर अकाऊंटवरील पोस्टनंतर हे सुरू झाल्याचं स्पष्ट आहे.
सोशल मीडियावर भारत-अफगाणिस्तान सामन्यातील टॉसचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात अफगाणिस्ताननं टॉस जिंकल्यानंतर विराट कोहली अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला आधी गोलंदाजी कर हे सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर मोहम्मद नबी कमेंटेटरला आधी गोलंदाजी करणार हे सांगत असल्याचं दिसून आलं.
मात्र, पत्रकार फैजान लखानी यांनी हा व्हीडिओ ट्वीट करणाऱ्या एका यूझरला उत्तर देताना, ''एवढ्या कॅमेऱ्यांसमोर आणि माईकसमोर ते असं करतील का? एवढाही सावळा गोंधळ नाही. प्रत्यक्षात मोहम्मद नबीनं, विराट कोहलीला निर्णयाबाबत सांगितलं आणि विराटनं ओके म्हटलं," असं ट्विट त्यांनी केलं.
क्रिकेटचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी व्हीडिओ खरा नसल्याचा दावा करूनही हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
मॅच फिक्सिंगचे आरोप
त्यानंतर एक स्क्रीनशॉट शेअर होऊ लागला. त्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाचं एक ट्वीट असल्याचा दावा करण्यात आला. त्यात 'वेल पेड इंडिया' असं लिहिलेलं होतं. त्यानंतर त्याच अकाऊंटद्वारे 'पेड' ला ठिक करत 'प्लेड' लिहिलेलं दाखवण्यात आलं.
मात्र, तेही एक बनावट ट्विटर अकाऊंट होतं आणि प्रत्यक्षात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकृत अकाऊंटवरून अशी पोस्ट केली नसल्याचं समोर आलं.
"पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू रडले होते. मात्र भारताकडून पराभूत झाल्यानंतर ते हसत होते. हेच हा सामना फिक्स असल्याचे संकेत आहेत," असं हसन खान नावाच्या यूझरनं लिहिलं.
तर जॉन काकड नावाच्या एका यूझरनं, सामना गमावण्याची तुमची तयारी आहे, मात्र आयपीएलमधील कॉन्ट्रॅक्ट गमावण्याची तयारी नाही, असं पोस्ट केलं.
पत्रकार उमर इनाम यांनी आणखी एक पाऊल पुढं टाकलं. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी भारत मुद्दाम इंग्लंडकडून पराभूत झाला होता. आज अफगाणिस्तान मुद्दाम भारताकडून फिक्स सामन्यात हारला, म्हणजे त्यांना सेमिफायनलमध्ये जाता यावं. भारतंच कायम सामने फिक्स करतो, असा आरोप त्यांनी केला.
आरोप म्हणजे मूर्खपणा
ज्येष्ठ पत्रकार कमर अहमद यांनी फेसबूकवर एका यूझरला याबाबत उत्तर दिलं. जे लोकं पैजांमध्ये किंवा जुगारात पैसे हारतात तेच, खेळाडूंवर मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंगचे आरोप करतात. जुगारींच्या विचारांचं ते वैशिष्ट्य आहे, असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ फिक्सिंग होतच नाही, असा नाही. स्पॉट फिक्सिंग ही सर्वसामान्य बाब आहे. ज्यांना खेळाबाबत माहिती आहे, तेच हे सांगू शकतात.
भारत आणि अफगाणिस्तानचा सामना हा क्लीन सामना होता, असं ते म्हणाले.
"कोण, कसं जिंकलं? हे सोडा. आपल्या विजयाचा आनंद साजरा करा. सकारात्मक विचार करा आणि चषक जिंकण्याचं स्वप्न पाहा. कुणीही कितीही चुकीचं केलं तरी, काही चांगलं होणार नाही. ज्यांनी योग्य केलं असेल, केवळ त्याला फॉलो करा," असा सल्ला पत्रकार सोहेल इम्रान यांनी पाकिस्तानींना दिला.
अफगाणिस्तान आणि भारत यांच्या झालेल्या सामन्यावर फिक्स असल्याच्या आरोपावरून होणाऱ्या टीकेमध्ये राजकीय नेतेही मागं राहिले नाही.
पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे माजी केंद्रीय मंत्री फिरदौस आशिक अवान ARY न्यूजच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यात माजी क्रिकेटपटू युनिस खान आणि तन्वीर अहमदही होते.
"पाकिस्ताननं भारताला जो 440 व्होल्टचा धक्का दिला, त्यानंतर अफगाणिस्ताननं आज भारताला ऑक्सिजनचं सिलिंडर लावलं आहे. त्यांनी योजना आखून त्यांची मदत केली आहे," असं यावेळी फिरदौस आशिक म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)