सुप्रिया सुळे : 'आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं, आई म्हणून वाईट वाटतं' #5मोठ्याबातम्या

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, @supriyasule

फोटो कॅप्शन, सुप्रिया सुळे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं, आई म्हणून खूप वाईट वाटतं : सुप्रिया सुळे

आर्यन खानने ड्रग्ज घेतलं नव्हतं, तर मग त्याला 25 दिवस तुरुंगात का ठेवलं? असा सवाल करतानाच एक आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

शाहरुख खान हा आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. अशाने भारताचं नावही खराब होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

"आर्यन खाननं ड्रग्ज घेतलं नाही. मुलाकडे काहीच सापडलं नाही. एखादा मुलगा निर्दोष असेल तर मग त्याला 25 दिवस कोठडीत का ठेवलं? आई म्हणून मला त्याचं वाईट वाटतं.

"शाहरूख खानं हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारलं जातं. पण अशा प्रकरणाने भारताचंही नावं खराब होतं. चुक नसतानाही अधिकारी कारवाई करत असेल तर चुकीचं आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

2. समीर वानखेडे : 'आम्हांला रोज बेइज्जत केले जात आहे'

आमच्या कुटुंबाची जाहीरपणे बेइज्जती केली जात असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच माझ्यावर दबाव आणला जात आहे, अशी तक्रार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी समीर वानखेडे यांनी हलदर यांच्याकडे आपलं म्हणणं मांडत तक्रार केली.

समीर वानखेडे

फोटो स्रोत, ANI

ते म्हणाले, "आमचं संपूर्ण वानखेडे खानदान बोगस आहे, असं थेट प्रसारमाध्यमांसमोर बोललं जात आहे. अशी भाषा प्रसारमाध्यमांसमोर करणं योग्य नाही. मी दलित समाजाचा आहे. हे लोक माझी बेइज्जती करण्याचं काम करत आहेत.

"माझा युनिफॉर्म काढून घेतला जाणार, माझी नोकरी हिरावून घेतली जाणार असं बोलून मला धमकावलं जात आहे. मला राष्ट्रपती नियुक्त करतात. जर मी काही चुकीचे काम केलं असेल, तर राष्ट्रपती आणि आपण त्यावर न्याय कराल."

3. एसटी कामगार आज कामावर रुजू न झाल्यास बडतर्फ : परब

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील 250 पैकी 39 आगारांमध्ये संप सुरूच आहे.

त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी जाहीर केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

एसटीचा प्रवास महागला

फोटो स्रोत, Getty Images

एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील लातूर विभागातील 5, नांदेड विभागातील 9 , भंडारा विभागातील सहापैकी 3 , गडचिरोली विभागातील सर्व 3, चंद्रपूर विभागातील 4 , यासह कोल्हापूर, वर्धा, सांगली, सोलापूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती विभागातील एकूण 39 आगारं सायंकाळी पाचपर्यंत बंद होती.

4. झायडस कॅडिला कोरोना लशीची किंमत कमी करणार

झायडस कॅडिला ही कंपनी कोरोना लशींची किंमत कमी करण्यास तयार झाली आहे. यामुळे कंपनीच्या कोरोना लशीची किंमत प्रती डोस 265 रुपये इतकी असेल. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images /RICARDO ARDUENGO

भारत सरकार आणि कंपनी यामध्ये सातत्यानं झालेल्या वाटाघाटीनंतर ही बाब समोर आली आहे. असं असलं तरी यावर अद्याप शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.

ऑगस्टमध्ये भारतात झायडस कॅडिला लशीला परवानगी देण्यात आली. ही लस 12 वर्षांवरील मुलांनाही देता येणार आहे. तसंच, झायडस कॅडिलाचे तीन डोस असून, ते इंजेक्शन शिवाय देता येईल.

5. पीक विम्याची भरपाई दिवाळीपूर्वी

जवळपास 21लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम देण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई वितरण सुरू केल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

"अतिवृष्टी तसंच अवर्षण यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अशा 38 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यापैकी नुकसानभरपाई निश्चित झालेल्या 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1555 कोटींची मदतीची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी सूचना राज्य सरकारने विमा कंपन्यांना केली.

"त्यानंतर काही विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई वितरण सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल," अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)