जयंत पाटील- सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

भाजपला सत्तेत येण्याची घाई झालेली असल्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सगळ्या मार्गाचा अवलंब करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला.

छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच अनिल देशमुखही निर्दोष सुटतील. त्यांनी काहीही केलेलं नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र नेत्यांचा मानसिक छळ आणि सरकारला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचंही पाटील म्हणाले.

समीर वानखेडे प्रकरणाबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, कारवाईत मराठी-अमराठी मुद्दा नसतो. भुजबळ यांना ईडीनं 28 महिने तुरुंगात ठेवलं, तेही मराठीच होते. त्यामुळं नियमानुसारच सर्वकाही होणार.

जयंत पाटील सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

जिल्हा परिषदेत आघाडीवर राष्ट्रवादीचा जोर असून मविआमधील तिन्ही पक्ष सामंजस्याने काम करतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

2. मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट 5 दिवसांपासून बेपत्ता, शोधमोहीम सुरू

रत्नागिरीमध्ये मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली एक बोट जवळपास 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. या बोटीमध्ये मासेमारी करण्यासाठी सहा जण गेले होते.

'नावेद २' असं नाव असलेली ही बोट 26 ऑक्टोबरपासून सापडत नसल्याची तक्रार बोटीचे मालक नासीर संसारे यांनी दिली, त्यानंतर प्रशासन शोध घेत आहे.

प्रशासनाच्या वतीनं स्पीड बोट आणि खासगी बोटींच्या माध्यमातून ही बेपत्ता बोट शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा जयगडमधून ही बोट मासेमारीसाठी समुद्रात गेली होती.

बोटीवर असलेले सर्वजण गुहागर तालुक्यातील आहेत. दरम्यान, शोधमोहिमेत एक मृतदेह मिळाला असून तो बोटीमध्ये असलेल्या कुणाचा आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.

3. पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेकजण अडकल्याची भीती

पुण्यामध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. या स्लॅबखाली काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती असल्याचं महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

पुण्याच्या बालेवाडीतील पाटील नगर याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा स्लॅब कोसळला. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांद्वारे बचावकार्याला तातडीनं सुरुवात झाली.

दरम्यान, स्थानिकांनी जखमींना लाइफलाइन रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. स्लॅबखाली अडकलेल्या इतरांना बाहेर काढलं जात आहे.

न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

4. जम्मू काश्मिरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात दोन जवानांच मृत्यू झाला आहे, तर इतर तीन जण जखमी आहेत. लष्कराची तुकडी गस्त घालत असताना एका लँडमाईनवर (भूसुरुंग) पाय पडल्यानं हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये हा भुसुरुंग स्फोट झाला. त्यात एका अधिकाऱ्यासह एका जवानाचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यापैकी दोघांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लेफ्टनंट रिषी कुमार आणि शिपाई मंजित अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत. रिषी कुमार हे बिहारच्या बेगूसरायचे तर मंजित हे भटिंडा पंजाब येथील असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

NDTVनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

5. कोव्हॅक्सिनबाबत WHO च्या निर्णयानंतरच दुहेरी लसीकरणाबाबत सुनावणी-सुप्रीम कोर्ट

कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या नागरिकांना कोव्हिशिल्ड या लशीचे दोन डोस देण्याच्या मागणीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी केली.

याबाबत निर्णय देण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटना (WHO)भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला आपत्कालीन वापराची परवानगी देते का? याची वाट पाहणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

पूर्ण लसीकरण झालेल्यांना कोव्हिशिल्डची लस देण्याचा आदेश देऊन आम्ही लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं.

कोव्हॅक्सिनची लस घेऊन परदेशी जाणाऱ्यांना तिथं विलगीकरणात राहावं लागत आहे. त्यामुळं त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

सरकारनं कोव्हॅक्सिनच्या लसीकरणापूर्वी WHO नं या लशीला परवानगी दिली नसल्याची बाब लपवली, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी सरकारवर केला आहे.

'द हिंदू'नं याबाबतचं वृत्त दिलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)