You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
T-20 World Cup: वरुण चक्रवर्ती टीम इंडियाच्या यशस्वी वाटचालीचा 'आर्किक्टेट' ठरणार का?
ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी निवडसमितीने वरुण चक्रवर्ती या रहस्यमय फिरकी गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं. वरुणच्या वाटचालीविषयी आपण जाणून घेऊया.
तो वास्तूरचनाकार आहे पण तो सध्या भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचण्यासाठी प्रयत्नशील आहे. गोंधळून गेलात ना? साहजिक आहे. भारतीय संघातला मिस्ट्री अर्थात रहस्यमय फिरकीपटू असं वर्णन होणारा वरुण चक्रवर्तीने वास्तूरचनाकार होण्याचं शिक्षण घेतलं आहे. मात्र क्रिकेट की आर्किक्टेट असा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा त्याने क्रिकेटची निवड केली. तामिळनाडू प्रीमिअर लीग, आयपीएल आणि आता भारतीय संघ अशी वरुणने तीन वर्षात मोठी भरारी घेतली आहे.
तामिळनाडूत 13व्या वर्षी वरुणने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. 17व्या वर्षापर्यंत वरुण याच भूमिकेत होता. वयोगट स्पर्धांच्या स्वरुपात नाकारलं गेल्यावर वरुणने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतल्या एसआरएम विद्यापीठातून वरुणने वास्तूरचनाशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं. हा अभ्यासक्रम पाच वर्षांचा होता.
अभ्यास सुरू असताना वरुण फ्रीलान्स क्रिकेटर म्हणून खेळायचा. उमेदीच्या वर्षांपैकी वरुणने पाच वर्ष शिक्षणाला दिली. वास्तूरचनाकार म्हणून त्याला काम करायची संधी मिळाली. पण क्रॉमबेस्ट क्रिकेट क्लबला बॉलिंग ऑलराऊंडरची आवश्यकता होती. वरुणने ही संधी हेरली. क्लबसाठी खेळत असतानाच गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे वरुणचं वेगवान गोलंदाज होण्याचं स्वप्न भंगलं. फिरकीपटू होण्याच्या दृष्टीने वरुण कामाला लागला.
दुखापतीतून परतल्यानंतर वरुण ज्युबिली क्रिकेट क्लबसाठी खेळायला लागला. 2017-18 हंगामात वरुणने या क्लबसाठी खेळताना 31 विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनाचा फायदा वरुणला झाला. आयपीएलच्या धर्तीवर देशात अनेक राज्यांमध्ये लीग सुरू झाल्या. तामिळनाडू प्रीमिअर लीग हे असंच एक प्रारुप.
सियाचेम मदुराई पँथर्स संघाने रहस्यमय फिरकीच्या जाळ्यात फलंदाजांना अडकवणाऱ्या वरुणला संघात समाविष्ट केलं. दोन हंगाम मिळून मदुराई संघाची कामगिरी सर्वसाधारण झाली होती. वरुणने धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करत मदुराई संघाला जेतेपद मिळवून दिलं. वरुणने 9 विकेट्स घेतल्या. इकॉनॉमी रेटही उत्तम होता.
तामिळनाडू प्रीमिअर लीगमधल्या कामगिरीमुळे वरुणला चेन्नई क्रिकेटमधल्या अव्वल क्लब्सपैकी एक असलेल्या विजय क्लबची दारं खुली झाली. विजय क्लबने व्हीएपी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. वरुणने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. याच कामगिरीच्या बळावर वरुणची निवड विजय हजारे चषकासाठीच्या तामिळनाडू संघात झाली. याच हंगामात वरुणने तामिळनाडू रणजी संघातही प्रवेश केला.
आयपीएल प्रवेश कसा झाला?
वरुणला चेन्नई सुपर किंग्स संघासाठीच्या सराव सत्रात नेट बॉलर म्हणून बोलावण्यात आलं. वरुणने तिथे गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्स संघानेही त्याला ट्रायलसाठी बोलावलं होतं. 2019 हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने 8.4 कोटी रुपये एवढी प्रचंड रक्कम देत त्याला संघात समाविष्ट केलं. पंजाबने केवळ एका सामन्यात त्याला संधी दिली.
पदार्पणाच्या सामन्यात वरुणच्या पहिल्याच षटकात 25 धावा वसूल करण्यात आल्या. पंजाबसाठी वरुणची तो पहिला आणि एकमेव सामना ठरला. पंजाबने हंगामाअखेर वरुणला संघातून कमी केलं.
तामिळनाडू प्रीमिअर लीगमधल्या कामगिरीची नोंद कोलकाता संघाचा तत्कालीन कर्णधार दिनेश कार्तिकने घेतली होती. कार्तिक आणि कोलकाता संघाचे अनालिस्ट ए.आर.श्रीकांत यांनी व्यवस्थापनाला वरुणविषयी सांगितलं. कोलकाताने वरुणच्या कौशल्यावर विश्वास ठेवला आणि त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. पंजाबच्या तुलनेत कोलकाताने 4 कोटी रुपये खर्च करून वरुणला घेतलं. तामिळनाडू प्रीमिअर लीगदरम्यान माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी वरुणचा खेळ पाहिला होता. त्यांनीही वरुणला घेण्यासंदर्भात सल्ला दिला. शिवरामाकृष्णन, कर्णधार कार्तिक आणि कोलकाता संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
2020 हंगामात कोलकातासाठी खेळताना वरुणने 17 तर यंदाच्या हंगामात 18 विकेट्स पटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली.
वरुण नेमकं काय करतो?
वरुण फिरकीपटू आहे. लेगब्रेक, ऑफब्रेक, कॅरम बॉल, गुगली, फ्लिपर, टॉपस्पिन, स्लायडर अशी अनेक अस्त्रं वरुणच्या भात्यात आहेत. टप्पा पडल्यानंतर आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना फलंदाजांना येत नाही. मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात वरुण पटाईत आहे. महिनाभरापूर्वी वरुणने चेन्नईचा कर्णधार आणि अव्वल फिनिशर महेंद्रसिंग धोनीला त्रिफळाचीत केलं होतं. विराट कोहलीलाही वरुणने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं आहे.
पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकांमध्ये 30 गज वर्तुळाच्या बाहेर दोनच क्षेत्ररक्षक असतात. त्यावेळी फलंदाज जोरदार आक्रमण करतात. वरुण पॉवरप्ले षटकांमध्ये सफाईदार गोलंदाजी करतो. ट्वेन्टी20 प्रकारात 6 ते 15 हा संथ काळ म्हणून ओळखला जातो. या टप्प्यात धावा रोखून विकेट्स पटकावण्यात वरुण माहीर आहे. हाणामारीच्या षटकांमध्येही वरुणने नेटाने गोलंदाजी केली आहे. दडपणाच्या क्षणीही डोकं शांत ठेवून गोलंदाजी करणं वरुणची खासियत आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांची गोलंदाजी पाहत वरुण लहानाचा मोठा झाला. कोलकातासाठी खेळताना वरुणला सुनील नरिनच्या बरोबरीने सराव करता आला. ट्वेन्टी20 प्रकारात जगातल्या अव्वल गोलंदाजांमध्ये नरिनचा समावेश होतो. नरिन जगभरात विविध संघांसाठी खेळतो. नरिनचा अनुभव वरुणसाठी मोलाचा ठरला. कोलकाता संघाचे फिरकी प्रशिक्षक कार्ल क्रो यांचं मार्गदर्शनही वरुणच्या वाटचालीत महत्त्वाचं आहे.
प्रतिस्पर्धी फलंदाजांचा व्यवस्थित अभ्यास करून सापळा रचण्यावर वरुणचा भर असतो. पण विकेट मिळाल्यानंतर वरुण शांत असतो. कोणतंही आक्रस्ताळं सेलिब्रेशन तो करत नाही.
डीके-वरुणची केमिस्ट्री
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक मूळचा तामिळनाडूचा. आयपीएल स्पर्धेत वरुणला कोलकाता संघात आणण्यात दिनेशचा वाटा मोलाचा आहे. वरुणही तामिळनाडूचाच. कोलकाताचा सामना असला की वरुण-डीके यांची केमिस्ट्री पाहणं रंजक असतं.
वरुण गोलंदाजीला आला की दिनेश कार्तिक त्याला तामीळ भाषेत सूचना देतो. प्रोत्साहन, कौतुकही तामीळ भाषेतच देतो. प्रतिस्पर्धी फलंदाजांना हिंदी किंवा इंग्रजी समजतं पण तामीळ नाही. फलंदाज कशा पद्धतीने फटका मारणार आहे, त्याची बॅट कोणत्या दिशेने जाते आहे, पदलालित्य कुठे चुकतंय हे बारकाईने टिपून कार्तिक वरुणला सांगतो.
तामीळ भाषेत बोलत असल्याने हे दोघे काय बोलतात हे प्रतिस्पर्धी आणि कोलकाता संघातल्याही अन्य कोणाला कळत नाही. कोलकातासाठी पदार्पण केल्यापासून वरुणने छाप उमटवली आहे. वरुणला दडपण जाणवू न देता त्याला चांगल्या गोलंदाजासाठी प्रोत्साहन देण्यात कार्तिक आघाडीवर असतो. कोलकातासाठी वरुणने जे यश कमावलं आहे त्यात या जोडीच्या केमिस्ट्रीचा म्हणजेच कार्तिकच्या सल्ल्याचा-पाठिंब्याचा सिंहाचा वाटा आहे.
अखेर भारतासाठी पदार्पण
गेल्या वर्षी आयपीएलचा 13वा हंगाम युएईत झाला होता. या हंगामात वरुणने कोलकातासाठी सर्वाधिक म्हणजे 17 विकेट्स घेत निवडसमितीला दखल घ्यायला भाग पाडलं. वरुणच्या कामगिरीची दखल घेत निवडसमितीने वरुणची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी संघात निवड झाली. भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न जवळ येऊन ठेपलं होतं. पण फिटनेसने दगा दिला.
वरुण फिट नसल्यामुळे निवडसमितीने टी. नटराजन या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली. नटराजनने अगदी अचानक मिळालेल्या संधीचं सोन केलं. ट्वेन्टी20सह तो वनडेतही खेळला. कसोटी मालिकेसाठी नेट बॉलर म्हणून त्याची निवड झाली. दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच गेल्याने नटराजनने कसोटी पदार्पणही केलं.
दुसरीकडे वरुणने या कालावधीत लग्न झालं. रिहॅब प्रक्रियेसाठी तो बेंगळुरूस्थित एनसीए इथे रवाना झाला. मायदेशातल्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी त्याची संघात निवड होईल अशी अपेक्षा होती. मात्र 100 टक्के फिट नसल्याने त्याची निवड झाली नाही. त्याचं भारतासाठी पदार्पण आणखीनच लांबलं.
आयपीएलचा 14वा हंगाम भारतातच सुरू झाला. वरुण कोलकातासाठी चांगला खेळत होता. मात्र देशात त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आली होती. दररोज शेकडो नागरिक कोरोनामुळे प्राण गमावत होते. आयपीएल स्पर्धा बायोबबलमध्ये सुरू होती. वरुणला खांद्यावर स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटल गाठावं लागलं. यादरम्यानच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. वरुण आणि संदीप वॉरियर या कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर चेन्नईच्या पाच आणि सनरायझर्स हैदराबादच्या काही खेळाडूंना कोरोना झाला. दिल्लीच्या एका खेळाडूला कोरोना झाला. कोरोनाने बायोबबल भेदल्याने धोका वाढला आणि बीसीसीआयने हंगाम स्थगित करण्याची घोषणा केली.
हंगाम अर्धवट राहिल्याने वरुण घरी परतला. कोरोना आणि दुखापत यातून सावरायला त्याला वेळ मिळाला. भारतासाठी खेळण्याची संधी दोनदा हुकल्यानंतर निवडसमितीने त्याच्या कौशल्यांवर विश्वास ठेवत श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड केली.
मुख्य खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना पर्यायी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता. वरुण या संघाचा भाग होता. 25 जुलै 2021 या दिवशी वरुणचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. वरुणने पहिल्याच सामन्यात विकेटही घेतली.
आजच्या घडीला वरुणने 4 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केवळ एकच सामना खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत वरुण 31 सामन्यात खेळला असून, त्याने 36 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याची गोलंदाजी समजून खेळणं अवघड असल्याचं अनेक अव्वल फलंदाजांनी म्हटलं आहे.
विश्वचषकासाठी निवड
पाच वर्षांनंतर होत असलेल्या विश्वचषकासाठी निवडसमितीने वरुणच्या रहस्यमयी गोलंदाजीवर विश्वास ठेवला. निवडसमितीने गेल्या 5 वर्षात ट्वेन्टी20 संघात नियमित असलेल्या युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडगोळीला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्याऐवजी वरुणसह राहुल चहरला संघात समाविष्ट करण्यात आलं. रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन ही अनुभवी जोडगोळी संघात आहे. वरुणचा हा पहिलाच विश्वचषक आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं दडपण त्याच्यावर असणार आहे. युएईतील खेळपट्यांवर सलग दोन वर्ष त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी तो उत्सुक असेल.
तामिळ चित्रपटात काम
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या जीवा या तामीळ भाषेतील चित्रपटात वरुणने एक छोटीशी भूमिका केली होती. रुपेरी पडद्यावर वरुण आधीच झळकला आहे. सात वर्षांनंतर वरुणचं कर्तृत्व रुपेरी पडद्याच्या माध्यमातून जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसमोर पोहोचलं.
फावल्या वेळात वरुण युट्यूबवर गिटार आणि फ्लूट शिकतो. क्रिकेटव्यतिरिक्त अनेक गोष्टीत वरुणला रस आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)