You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्यन खान प्रकरण : समीर वानखेडे, विश्वास नांगरे-पाटील हे दोन 'दबंग' अधिकारी आता आमनेसामने
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी तीन दिवसांची नोटीस देण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिली आहे.
पण या निमित्ताने आता मुंबई पोलिसांतील लोकप्रिय अधिकाऱ्यांपैकी एक मानले जाणारे विश्वास नांगरे पाटील आणि NCB चे लोकप्रिय अधिकारी समीर वानखेडे हे दोन बडे अधिकारी आमनेसामने उभे ठाकले आहेत.
हायप्रोफाईल अधिकारी एकमेकांच्या समोर आल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता यासंदर्भात काय घडामोडी घडतात, याची उत्सुकता सर्वांना आहे.
कारवाई करण्याआधी नोटीस द्यावी, मुंबई हायकोर्टाची सूचना
समीर वानखेडे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्याआधी त्यांना तीन दिवसांची नोटीस द्यावी, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी याप्रकरणी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने वरील सूचना केली आहे.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. पण ही चौकशी त्यांच्यामार्फत न करता सीबीआय कडून करावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी सदर याचिकेमार्फत केली होती.
सदर प्रकरणात मुंबई पोलिसांनी सक्तीची - अटकेची कारवाई करू नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली होती.
दरम्यान, माझ्यावर वैयक्तिक हल्ला करण्यात येतो, मला लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला.
काही कारवाई करायची असेल तर तीन दिवसांची नोटीस द्यावी लागेल, असं समीर वानखेडे यांचे वकील अतुल नंदा यांनी केली.
ही मागणी मान्य करून न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. नोटीस दिल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, असं न्यायालयाने म्हटलं.
चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या 4 अधिकाऱ्यांची नेमणूक
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (कायदा व सुव्यवस्था) यांनी याबाबतचा कार्यालयीन आदेश काढला आहेत.
प्रभाकर साईल, अॅड. सुधा द्विवेदी, अॅड. कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी समीर वानखेडे यांच्या संदर्भात अर्जांच्या माध्यमातून तक्रारी केल्या आहेत.
या सर्व तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी हा कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे.
पोलिसांनी काढलेल्या या चौकशी आदेशानुसार, सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांच्यासह पोलिस निरीक्षक अजय सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी हे वानखेडेंवरील तक्रार अर्जांची चौकशी करतील.
वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान समीर वानखेडेंच्या सुरक्षेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने वाढ केली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल.
समीर, आपल्या आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचं समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. त्यानंतर समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
समीर वानखेडेंवरील आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप केले होते.
प्रभाकर साईल असं या साक्षीदाराचं नाव असून त्यांचं नाव NCB कडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात 9 साक्षीदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरच होतं.
प्रभाकर यांनी या प्रकरणी NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर 8 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)