You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: 'केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून भीती दूर करणं' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून भीती दूर करणं - नरेंद्र मोदी
"केंद्रीय तपास संस्थांचं काम कुणाला घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं हे आहे. आपल्याला भ्रष्टाचाराची पाळेमुळे संपवावी लागणार आहेत," असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
बुधवारी (20 ऑक्टोबर) एका रेकॉर्डेड व्हीडिओच्या माध्यमातून CBI आणि CVC च्या अधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदी बोलत होते.
यावेळी मोदी पुढे म्हणाले, "भ्रष्टाचार छोटा असो किंवा मोठा, तो कुणाचा ना कुणाचा हक्क हिरावून घेतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात. भ्रष्टाचारामुळे राष्ट्राच्या प्रगतीत बाधा निर्माण होते."
"देशाची फसवणूक करणारे, गरिबांना लुटणारे कितीही ताकदवान असले, ते देशात किंवा जगात कुठेही असले तरी त्यांना दया दाखवली जाणार नाही. सरकार त्यांना सोडून देत नाही असा विश्वास आज देशातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे," असंही मोदींनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.
2. कुणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा, मुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई महापालिकेने कुणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, ही कारवाई युद्धपातळीवर तातडीने करण्यात यावी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी BMC च्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे तसंच कर्तव्यकठोरपणे तातडीने यावर कारवाई करावी.
मुंबई हे देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मैदानात उतरा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. ही बातमी झी 24 तासने दिली.
3. समीर वानखेडे यांचा मोबाईल, व्हॉट्सअॅप तपासा, सगळं समोर येईल - नवाब मलिक
भाजप, NCB आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत आहेत. NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा मोबाईल, व्हॉट्सअॅप तपासा, सगळं समोर येईल, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी वरील वक्तव्य केलं.
महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देऊ, असं मलिक यावेळी म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
दरम्यान, आर्यन खानचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर समीर वानखेडे यांनी सत्यमेव जयते असं ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रूपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
राज्य शासनाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून चाकणकर गुरुवारी आपला पदभार स्वीकारतील, अशी माहिती मिळाली आहे.
राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्तच होतं. या आधीच्याच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा 4 फेब्रुवारी 2020 रोजी दिला होता. गेल्या दीड वर्षात हे पद राज्य सरकारने भरावं, याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत होती.
अखेरीस या पदावर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली असून तीन वर्षांसाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी असेल, असं राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
5. 'आठवड्यात 2 दिवस काम करणाऱ्या सरकारी नोकरदारांसाठी कर्ज घेतलं, आता शेतकऱ्यांसाठी घ्या'
"कोव्हिड काळात राज्य सरकारने आठवड्यात 2 दिवस काम करणाऱ्या सरकारी नोकरदारांसाठी कर्ज घेतलं, आता शेतकऱ्यांसाठीही कर्ज काढा," अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यावेळी केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम थकवल्याच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं. जीएसटी काऊन्सिलमध्ये जमा झालेला पैसा राज्यांना नुकसानभरपाई म्हणून दिला जातो. राज्य सरकारला 50 टक्के रक्कम आधीच मिळालेली असते. गेल्या दोन वर्षांत जीएसटी काऊन्सिलमध्ये पैसाच जमा झाला नाही, असं पाटील म्हणाले.
तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 हजार कोटी रुपयांचा चेक दाखवला होता. तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, असंही पाटील यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)