शिवसेनेचे भाजपविरोधात 'ऑपरेशन धनुष्यबाण'? #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, @SHIVSENACOMMS

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. शिवसेनेचे भाजपविरोधात 'ऑपरेशन धनुष्यबाण'?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी शिवसेनेकडून डिसेंबर महिन्यात 'ऑपरेशन धनुष्यबाण' केलं जाणार असल्याची चर्चा आहे. यात भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपने पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमांचा धडाका लावला होता. त्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पक्षांतर जोर धरू लागेल असे दिसते.

मुंबईत भाजपचे 15 ते 20 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. असं घडल्यास यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात काहीही तथ्य नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे.

2017 मध्ये शिवसेनेनं अशीच मेगाभरती केली होती. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पालिकेत मनसेचं अस्तित्वच बाद केलं. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अशाच पद्धतीने रस्सीखेच पहायला मिळणार हे स्पष्ट आहे.

सध्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे 97, भाजपचे 83, काँग्रेसचे 28, राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, सपाचे 6, एमआयएमचे 2 आणि मनसेचा 1 आहे.

2. 'फादर आणि चादरपासून दूर राहा', भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

भोपाळचे भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी आपल्या एका भाषणात हिंदूंना फादर आणि चादरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रामेश्वर शर्मा यांचं भाषण वादग्रस्त ठरतंय. 'हिंदुस्तान टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

दसऱ्याच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना रामेश्वर शर्मा यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, "फादर आणि चादरपासून हिंदूंनी दूर राहा, अन्यथा ते तुमचा नाश करतील. पीरांची पूजा करणाऱ्याला सांगा की जमिनीवर दफन करण्यावर तुमचा विश्वास आहे. आम्ही जग चालवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, जो बजरंगबली आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जनतेला संस्कृतीची काळजी घ्या असा सल्ला देत गुड मॉर्निंग म्हणणे थांबवा असंही आवाहन केलं आहे. या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी ट्वीट केला आहे.

याप्रकरणी अल्पसंख्याकांचा अपमान केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. रामेश्वर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली जातेय.

3. 'हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या', सदाभाऊ खोतांचं शरद पवारांना उपहासात्मक पत्र

'हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या' अशी उपहासात्मक मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

सदाभाऊ खोत

फोटो स्रोत, BBC/Sharad Badhe

फोटो कॅप्शन, सदाभाऊ खोत

अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून महाविकास आघाडी सरकारने त्यांना पुरेशी मदत दिलेली नाही.

त्यामुळे हतबल शेतकऱ्यांना आता गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे असं सदाभाऊ खोत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. गांजा ही कायम मागणी असेलेली वनस्पती आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांना या हर्बल वनस्पतीची लागवड करण्याची मागणी केली आहे.

राज्यात गांजासारख्या मौल्यवान हर्बल तंबाखूची लागवड करण्यासाठी सरकारची परवानगी लागते असं म्हणत त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधला.

4. 'राज्याचं एकतरी काम पारदर्शक झालं पाहिजे', बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

आरोग्य विभातील भरती प्रक्रियेत झालेल्या गोंधळावरुन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अभ्यास करुन मेरीटमध्ये ये, मग नोकरी मिळेल असं म्हणायचे दिवस संपले की काय? अशी टीका त्यांनी केली आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

बच्चू कडू, कोरोना, अमरावती

फोटो स्रोत, Twitter/@RealBacchuKadu

फोटो कॅप्शन, बच्चू कडू

ते म्हणाले, "आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. परीक्षा पारदर्शीपद्धतीने व्हावी यासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घ्यावी." अशी मागणीही त्यांनी केली आहे.

न्यास कंपनी ब्लॅक लीस्टमध्ये असतानाही त्यांना काम कसं देण्यात आलं असाही प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांचे या परीक्षेचे निकाल पाहिले तर गुणवत्तेवर येणारे विद्यार्थी फार कमी आहेत ही शोकांतिका आहे असंही ते म्हणाले.

राज्याचं एकतरी काम पारदर्शक झालं पाहिजे असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहे दिला आहे.

5. राहुल-किशन सुसाट; सराव सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात बातमी दिली आहे.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 188 धावांची मजल मारली. जॉनी बेअरस्टोने 49 तर मोईने अलीने 43 धावांची खेळी केली. लायम लिव्हिंगस्टोनने 30 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना के.एल. राहुल (51) आणि इशान किशन (70) यांच्या दमदार खेळींच्या बळावर भारताने दमदार विजय मिळवला. राहुलने 6 चौकार आणि 3 षटकारांसह खेळी सजवली.

रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने संधी मिळालेल्या इशानने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऋषभ पंतने नाबाद 29 धावा केल्या. विश्वचषकात रोहित शर्मा आणि के.एल. राहुल सलामीला येणार असल्याचं कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं. मी स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेन असंही कोहलीने सांगितलं.

भारतीय संघाचा दुसरा सराव सामना 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारताची सलामीची लढत 24 ऑक्टोबरला रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)