You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : लहान मुलांच्या लशीसाठीची भारताची प्रतीक्षा संपली?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
लहान मुलांचं लसीकरण आणि त्यांना शाळेत पाठवणं या दोन्ही संबंध जोडणाऱ्या पालकांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
खरं म्हणजे, शास्त्रज्ञांनी मुलांना शाळेत पाठवणं आणि त्यांच्यासाठीची लशीची उपलब्धता या दोन्ही स्वतंत्र गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
मात्र, तरीही तुम्ही अशा पालकांपैकी एक असाल, तर लहान मुलांच्या लशीशी संबंधित ही बातमी तुमच्यासाठी आहे.
तज्ज्ञांच्या समितीने 2-18 वर्षं वयाच्या मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला हिरवा कंदील दाखवला आहे. भारत बायोटेकनं या कमिटीसमोर जी माहिती सादर केली होती, त्याबाबत सकारात्मक सूचना दिल्याचं, कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारत बायोटेकनं म्हटलं आहे.
आता या लशीला भारतीय औषधी महानियंत्रक (डीजीसीआय) च्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर भारतात लहान मुलांच्या लसीकरणासाठी या लशीचा वापर केला जाईल.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनआधीच झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी लशीला मुलांच्या लसीकरणासाठी वापरण्याची परवानगी मिळाली आहे. याचवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून बाजारात ती उपलब्ध होऊ शकते.
त्यामुळं भारत आता लहान मुलांच्या लसीकरणापासून केवळ एक पायरी दूर असल्याचं म्हटलं जात आहे.
म्हणजे महिन्याभरात प्रत्येक सुदृढ मुलाला कोरोनाची लस देता येईल का?
मुलांसाठी लशीची उपलब्धता?
भारतात लवकरच 97 कोटी लशीचे डोस पूर्ण केले जातील. त्यापैकी केवळ 11 कोटी डोस हे कोव्हॅक्सिनचे आहेत. म्हणजे गेल्या 10 महिन्यांमध्ये 11 कोटी डोस मिळाले असं, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील मेडिसिन विभागाच्या प्रमुख आणि केंद्र सरकारच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टर सुनीला गर्ग सांगतात.
विशेष बाब म्हणजे, भारतात कोव्हॅक्सिनची जी लस प्रौढांना दिली जात आहे, तिच लस लहान मुलांनाही दिली जाणार आहे. केवळ लहान मुलांवर तिच्या परिणामासाठी स्वतंत्र चाचणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अंदाजानुसार भारतात 18 वर्षांपेक्षा कमी वयाची 42-44 कोटी मुलं आहेत. सर्वांच्या लसीकरणासाठी प्रत्येकी दोन डोसनुसार एकूण 84-88 कोटी डोसची आवश्यकता असेल. त्यापैकी झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी लशीचे 5 कोटी डोस वर्षाच्या अखेरीपर्यंत मिळण्याचा अंदाज आहे.
त्याशिवाय लहान मुलांसाठीच्या आणखी दोन लशींना मंजुरी मिळायची आहे.
मात्र, लहान मुलांचं लसीकरण सुरू करण्याआधी केंद्र सरकार लशींच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रीत करेल हे स्पष्टच आहे.
त्यामुळं मुलांच्या टप्प्या-टप्प्यानं लसीकरणाची परवानगी दिली जाईल अशी अपेक्षा आहे.
"काही मुलांना मधुमेह, किडनी, हृदयरोग किंवा इतर आजार असतात. त्यांना लशीकरणात प्राधान्य देण्याची गरज असेल. भारतात अशा मुलांची संख्या 6-7 कोटी आहे. या मुलांना सुदृढ मुलांच्या तुलनेत गंभीर संसर्गाचा धोका 3-7 पटीनं अधिक असतो. त्यांना प्रौढांबरोबरच लसीकरणाची आवश्यकता असेल. प्रौढ आणि गंभीर आजार असलेल्या मुलांना लस दिल्यानंतरच, सुदृढ मुलांना लस दिली जाईल," असं नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्यूनायझेशन इन इंडिया (एनटीएजीआई) चे मुख्य डॉक्टर एनके अरोरा म्हणाले.
सुदृढ मुलांनाही देणार लस
मुलांसाठी कोव्हॅक्सिनच्या वापराबाबत समितीनं काही सल्ले दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यात लसीकरणाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांपर्यंत दर 15 दिवसांनी कमिटीला डेटा पाठवावा लागेल. तसंच चाचण्या सुरू ठेवाव्या आणि सोबतच रिस्क मॅनेजमेंट प्लॅनही तयार करावा असं सांगण्यात आलं आहे.
त्यामुळंच सुदृढ मुलांना लस द्यावी की नाही, यावर भारतासह जगभरात चर्चा केली जात आहे.
"कोरोनापासून बचावासाठी वृद्ध आणि तरुण यांना प्राधान्य द्यायला हवं. त्यानंतर 12 ते 18 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या किशोरवयीन मुलांचा क्रमांक लागावा," असं डॉक्टर सुनीला गर्ग म्हणाल्या.
अनेक ठिकाणी झालेल्या सिरो सर्वेक्षणानुसार 60 टक्के लहान मुलांमध्ये अँटिबॉडी आढळल्या आहेत. म्हणजे त्यांना लागण झाली आणि ते बरेदेखील झाले.
त्यामुळं एखाद्या शाळेत 1000 मुलं असतील आणि त्यापैकी 100 जणांना कोव्हिडची लागण झाली, तरी घाबरण्याची गरज नाही.
त्याचं एक कारण म्हणजे मोठ्यांच्या तुलनेत मुलांमध्ये ACE रिसेप्टर्स खूप जास्त प्रमाणात असतात. विषाणू त्याला जोडला जातो.
भारत बायोटेकनं आतापर्यंत देशभरात 500 मुलांवर चाचणी घेतली आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही अत्यंत लहान स्तरावर करण्यात आलेली चाचणी आहे.
"लहान मुलांवर या लशीचा प्रभाव आणि दुष्परिणाम याबाबत अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र या चाचणीत लहान मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत कमी दुष्परिणाम आढळले असं समोर आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आणखी चाचण्या आणि डेटा गरजेचा असेल, विशेषतः 2-6 वयोगटातील मुलांसाठी त्याची आवश्यकता असेल," असं डॉक्टर सुनीला गर्ग म्हणाल्या.
जगातील इथर देशांमध्ये सध्या फायझरची लसही 5 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना दिली जात आहे. तिच्याबाबतही फार माहिती उपलब्ध नाही.
सुदृढ मुलं लशीपासून किती दूर?
मुलांना कोव्हॅक्सीनद्वारे लसीकरण कधी होणार, याबाबत केंद्र सरकारच्या वतीनं ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही.
आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी, याबाबचे अधिकार डीसीजीआयला असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकार यात हस्तक्षेप करत नाही. थोडा वेळ लागेल, असं त्या म्हणाल्या.
डॉक्टर एनके अरोरा यांच्या मते, पुढल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत सुदृढ मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
तर, डॉ. सुनिला गर्ग यांनी मात्र, सुदृश मुलांच्या लसीकरणाला 2022 च्या अखेरीच्या महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)