You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाह: 'अशिक्षित व्यक्ती ही देशावरचं ओझं' #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. अशिक्षित व्यक्ती ही देशावरचं ओझं- अमित शाह
अशिक्षित व्यक्ती ही देशावरचं ओझं असते असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे.
अमित शाह यांनी दिलेल्या एका मुलाखतीची सध्या चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत हे मत त्यांनी मांडली आहे.
एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची.
त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल? असा प्रश्न शाह यांनी आपल्या मुलाखतीत उपस्थित केला. ही बातमी टीव्ही9 मराठीने प्रसिद्ध केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनसेवेतील 20 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त माझी मुलाखत असं लिहून त्यांनी ही मुलाखत ट्वीट केली आहे.
"मोदींचं काम मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांच्यावर हुकूमशाहीचे लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे आहेत. तथ्यहीन आहेत. ते कोणत्याही बैठकीत अगदीच मोजके बोलतात. त्यानंतर सर्वांचं ऐकून ते निर्णय घेतात.
"कधी कधी तर एवढा काय विचार करायचा? एखाद्या विषयावर एवढी चर्चा कशाला करायची असं आम्हाला वाटतं. पण मोदी सर्वांचं ऐकून घेतात.
"छोट्या छोट्या विधानाचीही ते दखल घेतात आणि गुणवत्तेच्या आधारेच निर्णय घेतात. त्यामुळे मोदी निर्णय लादतात असं म्हणणं चुकीचं असून त्यात काहीच तथ्य नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
2. कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी मागितली माफी
बिग बॉस या कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या कीर्तनकार शिवलिला पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
"माझा तेथे जाण्याचा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही.
"बिग बॉसमध्ये माझ्या जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते अशा शब्दांमध्ये शिवलीला पाटील यांनी माफी मागितली आहे," ही बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या त्या पहिल्या सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्या उपचारासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या.
शिवलीला बाहेर पडल्यामुळे बिग बॉसच्या घरातील वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या होत्या. शिवलीला पाटील या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आहेत.
सोशल मीडियावर शिवलीला या लोकप्रिय आहेत, पण तरीही 'बिग बॉस'च्या घरात कीर्तनकार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
"आपण कीर्तनकार आहोत, अध्यात्मात वाढलेली माणसं आहोत. हजार लोक आपल्यासमोर बसून ऐकतात, त्यांच्यासमोर सिद्ध करताना किती गोष्टींना जावं लागतं, असं त्यांना वाटत होतं. पण मी एक वाक्य मनात ठेवलं की किस्मत भी हिम्मतवालों का साथ देती आहे आणि मी धाडस केलं," असं शिवलीला यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी म्हटलं होतं.
3. राज्यभरात दिवसभरात 2000 पेक्षा कोव्हिड रुग्णांची संख्या कमी
मार्चनंतर प्रथमच कोव्हिडरुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 2000च्या खाली गेल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
काल 11 ऑक्टोबर रोजी राज्यात 1 हजार 736 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. काल 36 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यात कोव्हिड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 एवढे झाले आहे. राज्यात 32 हजार 115 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
4. राकेश झुनझुनवाला यांच्या हवाई कंपनीला परवानगी
आकासा एअरलाइन्स या नव्या कंपनीला नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे या कंपनीमध्ये 40 टक्के समभाग आहेत.
2022मध्ये आकासा एअर आपली सेवा सुरू करत असल्याचं कंपनीचे सीईओ विनय दुबे यांनी जाहीर केलं आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
विनय दुबे म्हणाले, "ना हरकत प्रमाणपत्र नागरी उड्डाण मंत्रालयाने दिल्याबद्दल आम्ही आनंदी आणि कृतज्ञ आहोत. आकासा एअरची यशस्वी सुरुवात होण्यासाठी योग्य ती पूर्तता करत आहोत. राष्ट्राच्या प्रगतीसाठी एक सशक्त हवाई वाहतूक प्रणाली महत्त्वाची आहे."
5. अमृता फडणवीसांवर राष्ट्रवादीची पुन्हा टीका
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांनी काल 11 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदवर एक ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
'Can anyone update me - आज वसूली चालू है या बंद?' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.
त्यावर रुपाली चाकणकर यांनी "वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी." अशा शब्दांमध्ये टीका केली आहे. सकाळने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)