महाराष्ट्र पाऊस : 'मंत्रालयात न जाणारे बांधावर कधी पोहोचणार?' - रावसाहेब दानवे, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. मंत्रालयात न जाणारे बांधावर कधी पोहोचणार? - रावसाहेब दानवे

"मुख्यमंत्री ना मंत्रालयात येतात, ना वर्षावर वेळेवर पोचतात. मग ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर कधी पोहोचणार?" असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

ते नांदेड जिल्ह्यातील एका प्रचारसभेत बोलत होते.

दानवे पुढे म्हणाले, "अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचं आणि शेतकऱ्यांचं काय भलं केलं ते सांगावं. तीन वेळा अतिवृष्टी झाली, पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. मुख्यमंत्र्यांना भुईमुगाच्या शेंगा भुईला येतात आणि कणसे कुठे येतात हे माहीत नाही, तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे समजतील?

"महाराष्ट्रात अतिवृष्टीने एवढे नुकसान केले आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी साधी पाहणी केली नाही. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान कसे कळेल."

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार म्हणून आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असा दिलासा देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

2. इन्स्टाग्राम, मेसेंजर पुन्हा डाऊन, फेसबुकने मागितली माफी

फेसबुकच्या मालकीच्या काही सेवा शुक्रवारी (8 ऑक्टोबर) पुन्हा काही काळासाठी बंद पडल्या. फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, वर्कप्लेस या सेवांच्या कामकाजावर काही काळासाठी परिणाम झाला.

कॉन्फिगरेशनमधल्या काही अडचणींमुळे असं झाल्याचं म्हणत फेसबुकने याबद्दल माफी मागितली आहे.

8 ऑक्टोबरच्या रात्री जगभरातल्या अनेक युझर्सना फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप वापरायला अडचण आल्याचं डाऊनडेक्टर या आऊटेजवर लक्ष ठेवणाऱ्या गटाने म्हटलंय.

अनेक युजर्सनी पुन्हा एकदा ट्विटरचा आधार घेत आपल्याला फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप वापरताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

हिंदुस्तान टाईम्सने याविषयीची माहिती दिली आहे.

3. तीनही बहिणी खंबीर, यातून बाहेर पडतील - सुप्रिया सुळे

अजित पवारांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

"मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्त्वावर विश्वास आहे, तीनही बहिणी खंबीर आहेत, यातून बाहेर पडतील," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

"छत्रपतींचं नाव भाषणात घेणारे दिल्लीतले नेते छत्रपतींच्या विचाराकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधीही महिलांना टार्गेट केलं नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

4. कोव्हिड ड्यूटीसाठी राज्यातल्या निवासी डॉक्टर्सना प्रत्येकी 1.21 लाख

कोव्हिड काळात केलेल्या सेवेबद्दल राज्यातल्या शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयं आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सगळ्या निवासी डॉक्टर्सना प्रत्येकी 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलंय.

विविध मागण्यांसाठी मार्डच्या निवासी डॉक्टर्सनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या.

महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

5. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 100 जागा MPSCने वाढवल्या आहेत. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला परीक्षा होईल.

MPSCने परिपत्रक काढत एकूण 20 संवर्गामध्ये 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 म्हणजे गट अच्या 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी होणार असल्याचं TV9 मराठीने म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)