महाराष्ट्र पाऊस : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 365 कोटी 67 लाख रूपये मंजूर, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 365 कोटी 67 लाख रूपये मंजूर

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

यासंबंधीचा शासन निर्णय राज्याच्या महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचं वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे होणार आहे.

यात पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता परतीचा पाऊस चार ते पाच दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठवड्यातच शेतीची कामं उरकून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.

2. दीपकने गर्लफ्रेंडला सर्वांसमोर स्टेडियममध्ये घातली रिंग

आयपीएल 2021 मध्ये पंजाबने गुरुवारी (7 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने बिग बॉस फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहीण जया भारद्वाजला प्रपोज केलं आहे.

त्यानं जयाला स्टेडियममध्ये सर्वांसमोर रिंग घातली. याप्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

दीपक चाहर बॉलिवूड अभिनेत्री मालती चाहरचा भाऊ आहे. आयपीएलच्या दुसऱ्या फेजमध्ये दीपक त्याच्या गोलंदाजीने चांगली कामगिरी करू शकला नाही. दीपकची गर्लफ्रेंड जया भारद्वाजचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज 'बिग बॉस 5' तसंच 'स्प्लिट्सविला 2' मध्येही दिसला आहे.

3. मुंबईतील 'या' स्टेशन्सवर फलाट तिकीट पुन्हा 50 रुपये

नातेवाईकांना रेल्वे स्थानकांवर सोडायला जाणाऱ्या प्रवाशांना आता फलाटावर पोहचण्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा रेल्वे स्थानकांतील फलाट तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ आजपासून (8 ऑक्टोबर) लागू होणार आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकातील फलाट तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

4. यूकेमध्ये आता भारतीय क्वारंटाईन नाही

कोव्हिशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय व्यक्तींना यूकेमध्ये क्वारंटाईनमध्ये राहण्याची गरज नाही, असं यूकेनं जाहीर केलं आहे.

11 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल, असंही सांगण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी ट्टिटरवर म्हटलंय, "11 ऑक्टोबरापासून ब्रिटनला प्रवास करणाऱ्या आणि कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांना यूकेमध्ये क्वारंटाईन केलं जाणार नाही."

5. '500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून गांधी काढून टाका'

महात्मा गांधींचं चित्र 500 आणि 2,000 रुपयांच्या चलनी नोटांमधून काढून टाका, कारण या नोटा भ्रष्टाचारासाठी आणि बारमध्ये वापरल्या जात आहेत, अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार भरत सिंग कुंदनपूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

5, 10, 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटांवर गांधींचं चित्र कायम ठेवावं, कारण ते गरिबांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि गांधींनी आयुष्यभर निराधारांसाठी काम केले, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)