You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लखीमपूर खिरीमध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितली कहाणी
- Author, सुशिला सिंह,
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"मला जेव्हा बाबांबद्दल समजलं तेव्हा भीती वाटू लागली. बाबा बरे आहेत की नाही, त्यांना फार काही लागलं तर नाही ना."
हे उद्गार आहेत सहज विर्क यांचे. त्यांचे वडील तेजिंदर सिंह विर्क मेदांता रुग्णालयात आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी जाले होते. इथल्या तिकोनिया भागात झालेल्या हिंसेमध्ये आठ लोकांचे प्राण गेले होते.
बीबीसीशी बोलताना सहज विर्क म्हणाले की ते घटनेच्यावेळेस तिथं उपस्थित नव्हते. पण व्हॉट्सअपवर त्यांना या घटनेची माहिती मिळाली.
मग वडिलांबद्दल विचारण्यासाठी त्यांनी फोन केल्यावर त्यांना घटनेचा तपशील मिळाला पण वास्तवात काय घडलं हे समजलं नव्हतं.
त्यांनी वडील आणि तिथं उपस्थित असणाऱ्या चुलत भावाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र बोलणं होऊ शकलं नाही. सहज यांचे चुलत भाऊ युवराज सिंह विर्क यांनी आपण घटनेच्यावेळेस तेथे उपस्थित होतो असं सांगितलं.
शेतकरी घरी परतत होते
ते सांगतात की "आंदोलन समाप्त करण्याची घोषणा झाली होती आणि गुरुद्वारेतून चहा आला आहे असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं. चहा पिऊन शेतकरी घरी जाणार होते."
त्यांच्या माहितीनुसार, "शेतकरी घरी जाण्यासाठी गाड्यांकडे वळले. तेव्हा मागून वेगाने गाड्या आल्या आणि चालणाऱ्या लोकांवर घातल्या गेल्या. त्यामध्ये माझे काकाही होते. ते गाडीबरोबर घसरत नाल्यात जाऊन पडले. अनेक लोक जखमी झाले. एक-दोन जणांचा जागीच मृत्यू झाला."
ते पुढं म्हणाले, "काकांना आम्ही आधी लखीमपूर रुग्णालयात नेलं, मग बरेलीच्या रुग्णालयात नेलं, तिथून रुद्रपूरला नेलं."
"तिथं सिटी स्कॅन केल्यावर त्यांच्या कवटीचं हाड मोडल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आम्ही त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांचं ऑपरेशन झालं असून ते आता आयसीयूमधून बाहेर आले आहेत.
"ते बेशुद्ध झाले होते आणि फार बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. रुद्रपूरमध्ये काही नीट सांगितलं जात नव्हतं. काही लोक ऑपरेशन करा म्हणत होते तर काही जण करू नका असं सांगत होते. त्यामुळे आम्ही इथं आलो.
"आता यापुढे कोणताही धोका नाही. तब्येतीला आराम पडला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे."
सहज सांगतात, "व्हॉट्सअप ग्रुपवर वडिलांचा व्हीडिओ आल्यावर त्यांची तब्येत खराब असल्याचं समजलं."
हरियाणामध्ये ज्याप्रकारे हिंसा झाली ते पाहाता काही होणार तर नाही ना अशी भीती वाटत होती. बाबा या आंदोलनात सुरुवातीपासून होते त्यामुळे या निदर्शनातही त्यांनी उपस्थित राहाणं गरजेचं होतं.
ते सांगतात, "माझी आई यामुळे घाबरुन गेली. रडत होती. दोन दिवस ती झोपलेली नाही. डोक्याबरोबर पाठीच्या हाडातही फ्रॅक्चर असल्यामुळे बरं व्हायला काही महिने लागतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे."
भीतीचं वातावरण
ते पुढं सांगतात, "वडील जेव्हा जेव्हा आंदोलनाला जातात तेव्हा आई घाबरलेली असे. शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून ते फार काळ कमी घरी आलेले आहेत."
ते सांगतात, "ऑपरेशननंतर मी त्यांना आयसीयूमध्ये भेटायला गेल्यावर मी ठीक आहे. तुम्ही लोक काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका, सर्व ठीक होईल असं म्हणाले."
सहज यांचं एकत्र कुटुंब आहे. त्यांची सुमारे 10 ते 12 एकर जमीन आहे. त्यांचे वडील आणि काका एकत्र जमीन कसतात. सहज आणि त्यांचा भाऊही त्यांना मदत करतो.
आंदोलनात सहभागी झालेले व या घटनेचे साक्षीदार संयुक्त मोर्चाचे सदस्य पिंडर सिंह सिद्धू बीबीसीला म्हणाले, "सर्व वातावरण ठीक होते. सुमारे अडीच वाजता अजय मिश्र यांचा मुलगा काही गुंडांसह आला आणि जे शेतकरी आपले झेंडे घेऊन फिरत होते त्यांच्यावर गाडी घातली. त्यांच्या मुलाने गोळ्याही चालवल्या."
अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्रने हे आरोप फेटाळले आहेत. आपण निर्दोष असल्याचे पुरावे देऊ असं त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "ही घटना दुर्देवी आहे. सरकार या घटनेच्या मुळापर्यंत जाईल आणि घटनेत सहभागी झालेल्यांना सर्वांसमोर आणेल आणि कडक कारवाई करेल. घटनास्थळी अपर मुख्य सचिव नियुक्ती, कार्मिक कृषी, एडीजी कायदा सुव्यवस्था, आयुक्त लखनौ, आयजी लखनौ उपस्थित आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवून घटनेमागच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे."
वडील गमावले
राजदीप सिंह 16 वर्षाचा आहे. तो अकरावीत शिकत आहे. लखीमपूर हिंसाचारात त्याचे वडील दलजित सिंह यांचे प्राण गेले.
राजदीप सांगतो, "मी माझ्या बाबांबरोबर गेलो होतो. ते कडेला उभे होते पण त्यांना धडक मारली गेली. मला आणि माझ्या भावालाही धडक बसली."
आम्ही शेतात पडलो, आम्हालाही दुखापत झाली. बाबा वारले. माझ्या आईची रडून रडून अवस्था वाईट झाली आहे.
आम्ही थांबणार नाही
समशेर सिंह 23 वर्षांचे आहेत. बीबीसीला ते म्हणाले, "रविवारी मला गाडीनं धडक दिली. माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. डोक्याला लागलंय, अंग दुखंतय."
"माझे बाबा मागेच होते. ते वाचले. माझी अवस्था पाहून आई रडायला लागली. अशी निदर्शनं यानंतर झाली तरीपण जाणार. आईनं थांबवलं तरी जाणार, न्याय मिळवणारच. आम्ही थांबणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)