भारताचं ब्रिटनला प्रत्युत्तर, ब्रिटीश प्रवाशांना व्हावं लागणार क्वारंटाईन #5 मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविधं वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. भारताचं ब्रिटनला प्रत्युत्तर, ब्रिटिश प्रवाशांना व्हावं लागणार क्वारंटाईन
ब्रिटनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना लसीकरणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या त्रासाची दखल घेत, भारतानंही प्रत्युत्तर दिलं आहे. भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठीही कोव्हिड 19 बाबत कठोर नियम लागू करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे.
बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार 4 ऑक्टोबरपासून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना या नियमांचं पालन करावं लागेल. या नागरिकांच्या लसीकरणाची स्थिती काहीही असली, तरी त्यांच्यासाठी हे नियम अनिवार्य असतील.
या नियमांनुसार ब्रिटश नागरिकांना भारतात येण्याच्या 72 तास आधीचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवावा लागेल. तसंच भारतात आल्यानंतर विमानतळावरही त्यांची कोव्हिड 19 ची RT-PCR चाचणी केली जाईल.
एवढंच नव्हे तर, भारतात दाखल झाल्यानंतर 8 व्या दिवशी पुन्हा एकदा या ब्रिटिश नागरिकांना कोव्हिड-19 च्या RT-PCR चाचणीला सामोरं जावं लागेल.
लशीचे डोस घेतलेले असले तरी ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवसांसाठी होम क्वारंटाईन किंवा त्यांना जिथं जायचं आहे, त्याठिकाणी विलगीकरणात राहावं लागेल, असादेखील निर्णय सरकारनं घेतला आहे.
भारतासह अनेक देशातील प्रवाशांचे लशीचे दोन डोस झालेले असले, तरी ते लसीकरण ब्रिटनमध्ये ग्राह्य समजलं जात नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळंत, ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी असे निर्णय घेण्यात आल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
भारतानं ब्रिटनला कोव्हिशिल्ड लशीचे 50 लाख डोस दिले आहेत. इंग्लंडनं त्याचा वापरही केला आहे. असं असतानाही कोव्हिशिल्डला मान्यता न देणं हा भेदभाव असल्याचं भारताच्या परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी म्हटलं आहे.
2. बीएचआर घोटाळा उघड केल्याने मला अडकवलं, एकनाथ खडसेंचा थेट आरोप
एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून पुन्हा एकदा मनातली खदखद व्यक्त केली आहे. बीएचआर पतसंस्थेचा कोट्यवधींचा घोटाळा बाहेर काढल्यामुळंच, ईडीची पीडा आपल्यामागं लावण्यात आली असा आरोप खडसे यांनी केला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Facebook / Eknath Khadse
बोदवड याठिकाणी झालेल्या सभेमध्ये खडसे यांनी जिल्ह्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यावर नाव न घेता टीका केली.
"माझे बापजादे तर श्रीमंत होते, पण यांचे वडील शिक्षक असूनही त्यांच्याकडे 1200 कोटींची संपत्ती कशी आली," असा सवाल उपस्थित करत, खडसे यांनी भाजपच्या या बड्या नेत्यावर हल्लाबोल केला. माझ्या संपत्तीची वारंवार चौकशी होते, मग त्यांची चौकशी कशी होत नाही? असंदेखील खडसेंनी म्हटल आहे.
केवळ बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याचं प्रकरण मी लावून धरलं होतं, त्यामुळंच माझ्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला असल्याचं, खडसे म्हणाले.
मात्र बीएचआर पतसंस्थेत लोकांच्या मेहनतीचा पैसा होता. कोणत्याही परिस्थितीत लोकांना त्यांचा पैसा परत मिळवून देईल, त्यासाठी या प्रकरणातील दोषींच्या मालमत्ता विकायला भाग पाडेल असंदेखील खडसे यावेळी म्हणाले.
3. किरीट सोमय्यांचे विश्वास नांगरे पाटलांवर आरोप, मानवाधिकार आयोगात तक्रार करणार
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केलेल्या आरोपांच्या मालिकेनंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.
भ्रष्ट मंत्र्यांना वाचवण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकारांचा गैरवापर केला असल्याचं किरिट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच नांगरे पाटील यांची निष्ठा भ्रष्ट मंत्र्याशी असल्याचंही सोमय्या म्हणाले. झी 24 तासनं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याशी संबंधित अनेक घडामोडी घडल्या. त्यावर बोलताना सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर हे आरोप केले असून, याबाबत नांगरे पाटील यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी पोलिसांनी मला सहा तास कोंडून ठेवलं. त्यावेळी अधिकारी नांगरे पाटील यांच्या संपर्कात होते. नांगरे पाटील यांनी तेव्हा बेकायदेशीर काम करणाऱ्या वळसे पाटलांविषयी निष्ठा दाखवली असं सोमय्या म्हणाले.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अद्याप माफी मागितलेली नाही. त्यामुळं पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून ही कारवाई केली हे स्पष्ट करावं असंही सोमय्या म्हणाले.
4. भाजपच्या मदतीने परमबीर सिंह परदेशात फरार, नाना पटोलेंचा आरोप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची सध्या शोधाशोध सुरू आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यासाठी भाजपनं मदत केली असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.
परमबीर सिंह हे वारंवार निर्देश दिल्यानंतरही चौकशीसाठी चांदिवाल आयोगासमोर हजर झाले नाही. त्यामुळं त्यांना तीन ठिकाणी शोधण्यासाठी वॉरंट बजावलं. पण या तिन्ही ठिकाणी ते आढळले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं पटोले यांनी भाजपवर हे आरोप केले आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Facebook / Nana Patole
परमबीर यांचं अखेरचं लोकेशन हे गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याचं समोर आलं आहे. तिथूनच त्यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना संपर्क केल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे.
अटक होण्याच्या भीतीपोटी परमबीर सिंह विदेशात पळून गेले असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. ते सापडले तर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
परमबीर हे युरोपातील एखाद्या देशामध्ये लपले असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे, मात्र अद्याप याबाबत काही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
5. 'भाजपचे तुकडे-तुकडे करणार', कन्हैयाकुमारचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस प्रवेश केलेले नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 'भाजप माझा उल्लेख तुकडे तुकडे गँग असा करतं. पण आता मी भाजपचे तुकडे तुकडे करणार', असं कन्हैय्या कुमार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दोन दिवसांपूर्वीच कन्हैय्या कुमार यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव निश्चित असल्याचंही, त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
भाजप हा गांधींना नव्हे तर गोडसेंना राष्ट्रपिता मानणारा पक्ष आहे, असा गंभीर आरोप कन्हैय्या कुमार यांनी केला आहे. ते केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर गांधीजींचं कौतुक करतात असंही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी मोदी आणि शहा यांच्या जोडीचा उल्लेख त्यांनी 'गोडसे बनाई जोडी' असा केला. तसंच या पक्षाची विचारसरणी उघडपणे राष्ट्रपित्यांच्या विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आजच्या काळात ज्याला केवळ राजकीय करिअरची चिंता आहे, तेच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचंही कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधीशी बोलून कायम आपलेपणाची भावना येते. ते नेहमी आई वडिलांची चौकशी करतात. त्यांच्यातील हे गुण मला त्यांच्याकडे आकर्षित करतात. त्यांच्या लढ्यामध्ये सातत्य आहे. ते नीडर नेते असून कायम सत्याच्या मागे असतात, असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं.
जवळपास 10 वर्षे डाव्या पक्षांशी संलग्न असलेल्या कन्हैय्या कुमार यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























