यवतमाळमध्ये बस पुराच्या पाण्यात वाहून गेली, चालक-वाहकाच्या मृत्यूची भीती

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी, यवतमाळ
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

यवतमाळात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेली आहे. या दुर्घटनेत चार जणांच्या मृत्यूची भीती वर्तवण्यात येत आहे, तर एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

बस नांदेडहून नागपूरकडे जात होती. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरून पाणी वाहत होतं. बस चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

ही घटना आज सकाळी 8.50 च्या दरम्यानची आहे. हिरकणी बस नांदेडहून नागपूरच्या दिशेने जात होती.

नाल्यापासून जवळपास 25 फूट दूर बस वाहत गेली. बचावासाठी बसमधील प्रवाशांनी झाडाचा आणि एसटी बसच्या टपाचा सहारा घेतला होता.

यातील दोन प्रवाशांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे, तर दुपारी उशिरा एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.

मात्र, बस पाण्याखाली गेल्याने एका प्रवाशांसह ड्रायव्हर आणि कंडक्टरचा मृत्यू झाल्याची भीती तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी व्यक्त केली.

देऊळगावकर यांच्या माहितीनुसार, "बस चालकाच्या अतिघाईमुळे ही दुर्घटना झाली आहे. बस अजूनही पाण्याखाली आहे. बसमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी SDRP चं पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. बसमध्ये एकून सहा प्रवाशी होते. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र या दुर्घटनेत बस चालक आणि कंडक्टर यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे."

नेमकं काय झालं?

आज सकाळी 8.30च्या दरम्यानची ही घटना आहे. 6 प्रवाशांना घेऊन 'हिरकणी बस' नांदेडहुन नागपूरकडे जात होती. यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे 'दहेगाव' नाल्याला पूर आला होता. पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत होते.

दरम्यान बस चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याने पुलावरून बस टाकली. चालकाने काही दूरपर्यंत बस सुखरूप नेली मात्र शेवटच्या टप्प्यावर बस पाण्याच्या प्रवाहात नाल्यात वाहून गेली.

पाण्याचा प्रवाह इतका होता की बस जवळपास 25 फूट दूर वाहत गेली. बसमधील प्रवाशांनी बचावासाठी झाडाचा आणि एसटीबसच्या टपाचा सहारा घेतला होता. 

जिवाच्या आकांताने प्रवाशी त्यांना वाचवण्यासाठी हाक मारतानाचा व्हिडीओ पुढे आला आहे.

पाण्याच्या प्रवाहातून बस काढू नका अस स्थानिक गावकऱ्यांनी बस ड्रायवरला सूचित केले होते. मात्र ड्रायवर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात टाकली असंही सांगितले जात आहे.

बसध्ये अडकलेल्या सहा जणांपैकी दोघांना वाचवण्यात सेस्क्यू पथकाला यश आले आहे. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तिघांचा मृतदेह काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहे.

रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचले आहे. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे अडचणी येत असल्याची माहिती यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

ते म्हणाले "दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यासोबतच एक मृतदेहही बाहेर काढण्यात आला आहे. पण इतर तिघे बसमध्येच आहे. बस अडकून पडली आहे. क्रेनच्या साह्याने आपण बस बाहेर काढतोय. आज सायंकाळ पर्यंत अडकलेली तीन मृतदेह आपण बाहेर काढू" .

"थोडा पाऊस झाला तरी नाल्यावरून पाण्याचं प्रमाण अधिक असतं. पाण्यातून गाडी काढू नका अशा सूचना आम्ही वारंवार करत असतो. पण अनेकजण ऐकत नाही. पाण्यातून बस काढू नका अशी विनंती स्थानिकांनी बस ड्रायवरलाही केली होती. पण त्याने ऐकले नाही, आणि हा अपघात झाला. सध्या नाल्यावरच पाणी ओसरत आहे. सायंकाळ पर्यंत बस पाण्यातून बाहेर काढली जाईल," असं जिल्हाधिकारी येडगे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)