You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजस्थान शिक्षक भरती परीक्षा : कॉपी करण्यासाठी चपलेमध्ये लपवलं ब्लू-टूथ
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, जयपूर, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर एक चप्पल व्हायरल झालेली तुम्ही पाहिली असेल. या चपलीमध्ये ब्लू-टूथ लावण्यात आलं होतं आणि ही चप्पल परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरली होती. अशी केवळ एकच चप्पल नव्हती तर हा पूर्ण घोटाळाच आहे.
नेमकं काय घडलं आणि कसं घडलं, याबाबत जाणून घ्या बीबीसी हिंदीचे सहकारी पत्रकार मोहर सिंह मीणा यांच्या रिपोर्टमधून.
राजस्थानातील शिक्षकांच्या सुमारे 31 हजार रिकाम्या जागांसाठी 'राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षा' (रीट) 26 सप्टेंबर रोजी पार पडली. राजस्थानातील व इतर राज्यांमधील सुमारे 13 लाख तरुण-तरुणींनी ही परीक्षा दिली.
या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कॉपी होऊ नये यासाठी राज्यभरात 12 तास इंटरनेटची सेवा बंद ठेवण्यात आली होती. पण सरकारच्या या प्रयत्नांवर मात करण्यासाठी परीक्षार्थींनी विविध क्लृप्त्या लढवल्या. कानात ब्लू-टूथ आणि चप्पलेत ब्लू-टूथ बसवणं, अशाही क्लृप्तीचा वापर या वेळी झाला.
बिकानेर पोलिसांनी परीक्षेआधीच कॉपीचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणल्यामुळे अनेक आश्चर्यकारक गोष्टी प्रकाशात आल्या. बिकानेरच्या पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा यांच्या पथकाने ब्लू-टूथ उपकरणाद्वारे कॉपी करणाऱ्या टोळीशी संबंधित पाच जणांना 25 सप्टेंबरला गंगाशहर इथून अटक केलं. अटक झालेल्यांमध्ये परीक्षा देणारे उमेदवारही आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची चौकशी केल्यानंतर बिकानेर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून प्रतापगढ, सीकर, अजमेर इथेही ब्लू-टूथद्वारे कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींना ताब्यात घेण्यात आलं.
बिकानेरच्या पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "आम्ही वेगवेगळी पथकं केली होती आणि परीक्षार्थींना ब्लू-टूथद्वारे कॉपीसाठी मदत करू पाहणाऱ्या पाच संशयितांना आम्ही ताब्यात घेतलं."
चंद्रा पुढे म्हणाल्या, "घटनास्थळी दोन परीक्षार्थींना उपकरणं देण्यात आली होती आणि त्यांचा वापर कसा करायचा हे समजावून सांगितलं जात होतं. त्यांनी मोठी रक्कम घेऊन 25 उमेदवारांना परीक्षेत पास करवून देण्याचा व्यवहारही केला होता."
ब्लू-टूथ बसवलेली चप्पल दिल्लीत तयार केली होती. राजस्थानातील या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कॉपी करण्याकरता वापरला गेलेला हा आश्चर्यकारक मार्ग सगळ्यांनाच चकित करणारा ठरला आहे. कॉपीसाठीच्या या खास चप्पला दिल्लीहून तयार करवून घेतल्या जात होत्या.
स्लीपर चपला मधोमध कापून त्यात व्हॉइस कॉलिंग उपकरणाची बॅटरी, सिमचं सॉकेट आणि इतर आवश्यक उपकरणं लावली जात असत.
बिकानेरच्या पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा सांगतात, "दिल्लीलाच या चप्पलांमध्ये ब्लू-टूथ बसवून इथे आणलं जात होतं. एका चप्पलेमध्ये ब्लू-टूथ लावण्यासाठी 30 हजार रुपये खर्च करण्यात आले होते."
"राज्यात 25 परीक्षार्थींना पास करण्याचं आश्वासन देऊन ही चप्पल सहा ते सात लाख रुपयांना विकण्यात आली," असं चंद्रा म्हणाल्या. तीस हजार रुपयांमध्ये तयार करण्यात आलेली ही चप्पल संबंधित परीक्षार्थींना सात लाख रुपयांना विकली जात होती. अशा रितीने संशयितांनी दीड कोटी रुपये गोळा केले.
कॉपीबहाद्दरांच्या या टोळीने परीक्षार्थींकडून आगाऊ रकमा व रिकामे चेकही घेतले होते. पोलिसांनी या सर्व गोष्टी जप्त केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर पोलिसांना व प्रशासनाला शंका येऊ नये यासाठी चपलांमध्ये ही उपकरणं लावण्यात आली.
कोचिंग क्लासचे संचालक मुख्य संशयित या कॉपीबहाद्दरांच्या टोळीचा संशयित सूत्रधार बिकानेरमधील तुलसाराम कालेर याला पकडण्यात पोलिसांना अजून यश मिळालेलं नाही. शनिवारपासूनच त्याचा फोनही बंद आहे.
परीक्षेत पास करवून देणं, कॉपीसाठी मदत करणं आणि प्रश्नपत्रिका मिळवून देणं, अशा गोष्टींच्या नावाखाली कालेर परीक्षार्थींकडून लाखो रुपये उकळायचा, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
परीक्षेच्या दोन दिवस आधी एखाद्या गोपनीय जागी तो आपल्या टोळीतील सदस्यांना बोलावत असे आणि परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कशी मदत करायची हे या सदस्यांना सांगत होता. शिवाय, ब्लू-टूथ उपकरणाचा उपयोग कसा करायचा, याचं प्रशिक्षणही या वेळी दिलं जात होतं.
इंटरनेट बंद असतानासुद्धा हे उपकरण कसं सुरू राहायचं?
चप्पलेमधील ब्लू-टूथचं उपकरण संबंधित परीक्षार्थींच्या कानात लावलेल्या उपकरणाशी जोडलेलं होतं, त्यामुळे टोळीसदस्य फोनद्वारे संबंधित उमेदवारांशी बोलू शकत होते. आवाज ऐकण्यासाठी अतिशय छोटं उपकरण परीक्षार्थींची कानात बसवण्यात आलं. हे उपकरण बाहेरून सहजी दिसणार नाही इतकं छोटं होतं.
या संदर्भात पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "इंटरनेट बंद असल्यामुळे यांनी ब्लू- टूथद्वारे कॉपी करण्याची योजना आखली."
एका वेळी 25 लोकांना फोनवरून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत केली जाणार होती. पण ही योजना अंमलात येण्याआधीच बिकानेर पोलिसांनी कारवाई करून कॉपीबहाद्दरांची टोळी फोडली.
चपलेत उपकरण लावून परीक्षाकेंद्रावर जाणारे उमेदवार बिकानेर पोलिसांनी कडक चौकशी केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या टोळीसदस्यांनी कबूल केलं की, त्यांनी राज्यातील 25 उमेदवारांना परीक्षेत पास करवून देण्याचं आश्वासन देऊन पैसे घेतले होते.
कॉपीसाठी ब्लू-टूथ उपकरणाचा वापर होत असल्याची माहिती बिकानेर पोलिसांनी अजमेर, सीकर, व आसपासच्या भागांना कळवली. अजमेरचे पोलीस अधीक्षक जगदीश चंद्र शर्मा या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "एटीएस आणि
एसओजी यांनी दिलेल्या माहितीनंतर एक विशेष पथक व मदनगंज पोलीसस्थानकाचं पथक यांनी केलेल्या कारवाईमध्ये किशनगढमधील मदनगंज इथल्या परीक्षाकेंद्रावरून एका उमेदवाराला अटक करण्यात आलं आहे. हा उमेदवार चुरूचा रहिवासी आहे."
"संबंधित उमेदवाराच्या डाव्या पायातील चप्पलेमध्ये ब्लू-टूथची बॅटरी, एअरटेल 4-जी सिम कार्ड लावलेलं सॉकेट बसवण्यात आलं होतं. या उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलं आहे."
राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्य सरकारने शक्य तितकी पावलं उचलली होती. तरीही, कॉपीबहाद्दर परीक्षाकेंद्रांपर्यंत पोचलेच. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. कॉपीचे हे प्रकार समोर आल्यामुळे काही परीक्षार्थी निराशही झाले.
करौलमधील आशा मीणा यांनी ही परीक्षा दिली. त्या म्हणाल्या, "परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी सरकारने आपल्या बाजूने कठोर पावलं उचलली आहेत. पण तरीही कॉपी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे आमच्यासारखे कष्ट करणारे परीक्षार्थी नक्कीच निराश होतात."
जयपूरमधील या परीक्षेचे उमेदवार कप्तान सिंह सांगतात, "बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोक नोकरीसाठी आडवाटा शोधू लागले आहेत. त्यामुळे भरती परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत करणऱ्या तरुणींचं भविष्य टांगणीला लागलं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)