You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आनंदराव आडसूळ: सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते अडसूळ यांना ED चे समन्स
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ यांना ED ने आज समन्स बजावले आहेत.
सिटी बँक घोटाळा प्रकरणी त्यांना आज ED कार्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. ED चे अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले होते. मात्र ताब्यात घेण्यापूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
सिटी बँकेच्या माध्यमातून मराठी माणसाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, "मुंबईत सिटी सहकारी बँकेच्या 14 शाखेत मराठी बांधवांचे खाते आहेत. त्यात गिरणी कामगार, डबे कामगार, पेन्शन धारक आणि छोटे मोठे व्यापार करणाऱ्यांच्या ठेवी आहेत. अडचणीच्या काळात पैसे कामी पडेल या उद्देशाने या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. पण गेल्या 3 वर्षांपूर्वी सिटी बँक बुडाली अस सांगण्यात आले. आणि खातेधारकाना पैसे मिळणे बंद झाले."
"पैसे परत मिळावे म्हणून ठेवीदारांनी आंदोलन केली. पोलीस स्टेशन आणि आर्थिक गुन्हे शाखेतही तक्रार करण्यात आली होती. पण बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी बँकेत असणारी 980 कोटी रुपयांच्या ठेवीत मोठा भ्रष्ट्राचार केला. अडसूळ यांनी 1 कोटींची प्रॉपर्टी असणाऱ्यांना तिप्पट कर्ज दिले. तेच ज्यांची 5 कोटींची प्रॉपर्टी आहे त्यांना पाचपट कर्ज देऊन त्यातून कमिशन घेतले. त्यामुळं बँक बुडाली, बँकेच्या मुंबईत असणाऱ्या 14 शाखा या मुलांच्या आणि जावयाच्या नावांनी असून तीच प्रॉपर्टी त्यांनी बँकेला भाडेतत्वावर दिलेल्या आहेत," असा आरोप आमदार राणा यांनी केला आहे.
"दरम्यान चौकशीसाठी ED चे अधिकारी घरी आले होते. आज दुपारी आम्ही ED कार्यालयात दाखल होणार आहोत. आमच्यावर सूड बुद्धीने कारवाई केली जात आहे," अशी प्रतिक्रिया अभिजित अडसूळ यांनी दिली आहे.
आनंदराव अडसूळ यांचे साताऱ्या जिल्ह्यातील शिरंबे हे मूळ गाव आहे. कट्टर शिवसैनिक आणि आक्रमक नेते म्हणून अडसूळ ओळखले जातात.
मात्र बुलडाणा लोकसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. 1996 मध्ये बुलडाणा मतदार संघ अनुसूचित जातीसाठीसाठी राखीव झाला. आणि अडसूळ पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत पोहचले. त्यानंतर दोनदा म्हणजेच एकूण तीन टर्म ते बुलडाणा मतदार संघाचे खासदार राहिले. दरम्यानच्या काळात केंद्रीय अर्थराज्यमंत्रीही ते होते.
त्यानंतर 2009 मध्ये अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदार संघांची निवडणूक लढवली आणि मताधिक्याने निवडून आले.
2009 ते 2019 पर्यंत ते दोनदा अमरावती लोकसभा मतदार संघातून खासदार होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अडसूळ विरुद्ध राणा अशी निवडणूक रंगली.
दरम्यानच्या काळात नवनीत राणा यांनी एका कार्यक्रमादरम्यान अडसूळ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. आणि इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
मात्र 25 वर्ष खासदारकी भूषविलेले, संसदरत्न आनंदराव अडसूळ यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थन असणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
यापूर्वी मुरब्बी राजकारणी आणि हिंदू दलित असल्याचा फायदा अडसूळ यांना व्हायचा अशी प्रतिक्रिया लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांनी दिली. ते म्हणतात, "गैर दलित मतदान मिळवण्यात अडसूळ यांना यश यायचं. मात्र त्यानंतर अति आत्मविश्वास त्यांच्या अंगलट आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नवनीत राणा विजयी झाल्या" अटाळकर म्हणाले.
खासदार नवनीत राणा यांच जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत अडसूळ न्यायालयात गेले. सध्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे. मात्र दरम्यानच्या काळात सिटी बँकेच्या घोटाळ्याचेही आरोप झाले. याच प्रकरणात अडसूळ याना समन्स मिळाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)