You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी घेणार' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा जलसमाधी घेणार'
अयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत परमहंस यांनी हिंदुराष्ट्राबाबत वक्तव्य केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
रविवारी (26 सप्टेंबर) तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संत परमहंस यांनी ही घोषणा केली आहे.
ते म्हणाले, "1 ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित होईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर 2ऑक्टोबर रोजी ते शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतील."
2. 'घोडा लावायचा तेव्हा लावतो, त्यात मी एक्स्पर्ट' - संजय राऊत
"आपण लावायचं तेव्हा लावतो ना घोडा. त्याबाबत मला सांगायला नको. त्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. लोकं माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात. मी सगळ्या प्रकारचे घोडे वापरलेले आहेत. कळलं का?" असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. पुण्याच्या वडगाव शेरीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
संजय राऊत यांनी भाषणावेळी चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच शासकीय पद स्वीकारलं नाही. त्यांना अनेक पदांची लालसा धरता आली असती. पण कोणत्याही पदावर बसलेले नसताना या देशाचा सगळ्यांत मोठा सत्ताधीश कोण असेल तर तो बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे जे मंत्री, आमदार, खासदार होतात त्यांना सांगतो, हे काही नाही. पक्ष महत्त्वाचा, पक्षाचं संघटन महत्त्वाचं.
"मी कधीही केंद्रामध्ये संधी असताना मंत्री झालो नाही, कारण मला 'सामना'चं पद सोडावं लागेल. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जिथे पक्षाचं काम आहे, तिथ, मी काम करतो. मंत्रिपदं येतात आणि जातात. मग माजी, मला माजी म्हणू नका. आम्हाला कधी कोणी माजी म्हणणार नाही."
चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मला माजी मंत्री म्हणू नका, असं विधान केलं होतं.
3. SIM CARD घेण्यासाठीचे नियम बदलले
नवं सिमकार्ड घेण्यासाठीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारनं बदल केला असून काही नियम अधिक कडक केले आहेत. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
यापुढे एखादा नंबर प्रिपेडवरून पोस्टपेड करायचा असेल किंवा पोस्टपेडवरून प्रिपेड करायचा असेल, तर कागदी फॉर्म भरण्याची गरज नसेल. एक डिजिटल फॉर्म भरून ग्राहक हे काम जलद करू शकणार आहेत.
नव्या नियमांनुसार जर एखाद्या नागरिकाला नवं सिमकार्ड विकत घ्यायचं असेल, तर आता कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रत्येक नागरिकाचा डिजिटल केवायसी हाच त्यासाठी गृहित धरला जाणार आहे.
प्रत्येक टेलिकॉम कंपनीच्या ऍपवर यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर जाऊन ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी नागरिकांना केवळ 1 रुपया शुल्क भरावं लागेल.
4. पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं
दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ज्या मित्राकडे पेट्रोलची मागणी केली त्यालाच मित्रांनी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात समोर आली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
ही घटना 19 सप्टेंबर रोजी भरदुपारी एकच्या सुमारास गारखेडा परिसरात घडली. या घटनेत दिनेश रुस्तमराव देशमुख गंभीररित्या होरपळला आहे.
खासगी वाहन चालक दिनेश हा सकाळी घरातील काम आटोपून बाहेर पडला. साडेदहाच्या सुमारास मित्र किरण बालाजी गाडगीडे हा घराजवळ आला. त्यानंतर दोघेही दारू पिण्यासाठी किरणच्या अड्ड्यावर गेले. त्यानंतर दोघेही दिनेशच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटवर आले. तिथं गप्पा मारत असतानाच दुपारी एकच्या सुमारास नितीन सोनवणे आणि भागवत गायकवाड तिथं आले. त्यापैकी नितीननं दुचाकीसाठी थोडे पेट्रोल दे, अशी मागणी केली. त्याला दिनेशने नकार दिला. पण किरणच्या सांगण्यावरुन दिनेशनं त्याला दुचाकीची चावी देत पेट्रोल काढण्यास सांगितलं.
नितीननं पेट्रोल काढल्यानंतर थोड्या पेट्रोलमध्ये काय होणार म्हणत आणखी पेट्रोलची मागणी केली. तेव्हा मात्र दिनेशनं स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतनं चिथावणी देत नितीनला त्याच्या अंगावर पेट्रोल फेकण्यास प्रवृत्त केलं. नितीननं पेट्रोल फेकताच दुसरीकडून किरणनं माचीसची पेटलेली काडी त्याच्या अंगावर फेकली. त्यामुळे या आगीत दिनेश 25 टक्के भाजला. त्याला कुटुंबियांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
5. IPL : अखेरच्या चेंडूत CSK नं सामना जिंकला
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर 2 विकेट्सनं मात केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
केकेआरनं चेन्नईसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात चेन्नईच्या दीपक चहरनं अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय प्राप्त करुन दिला. अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
चेन्नईला विजयासाठी 15 चेंडूत 30 धावांची गरज असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाद झाला आणि सामन्यावर पूर्णपणे केकेआरनं पकड निर्माण केली होती. पण सामन्याच्या 19 व्या षटकात जडेजानं विस्फोटक फलंदाजी करत 22 धावा कुटल्या आणि संघाला पुनरागमन करुन दिलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)