पश्चिम बंगाल पोटनिवडणूक: 'भाजप जिंकला असता तर मुर्शिदाबादचं नाव मोदीशाहबाद झालं असतं' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'भाजप जिंकला असता तर मुर्शिदाबादचं नाव मोदीशाहबाद झालं असतं'

"भाजपचा विकास हा फक्त नावं बदलण्यापुरताच मर्यादित आहे. ते मुर्शिदाबादमध्ये जिंकले असते, तर हे नाव बदलून त्याचं नामकरण मोदीशाहबाद झालं असतं," अशा शब्दांत तृणमूल काँग्रेस खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी टीका केली आहे.

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान उमेदवाराचाच मृत्यू ओढवल्यामुळे या मतदारसंघातली निवडणूक स्थगित करण्यात आली होती. तिथे 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेतली जात आहे. याठिकाणी आयोजित प्रचारसभेत बॅनर्जी बोलत होते.

"आम्ही भाजपाचं अस्तित्व असलेल्या प्रत्येक राज्यात जाऊ आणि त्यांच्याशी लढा देऊ. 'खेला' आसाम आणि त्रिपुरामध्ये सुरू झाला आहे. येत्या 3 वर्षांत भाजपाला देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे. ईडी आणि सीबीआय माझं काय करून घेणार आहेत?" असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केला. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

2. लोकांनी एकाऐवजी तीन-तीन बटणं का दाबायची? - राज ठाकरे

आगामी महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग असतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

"हा सत्ता काबीज करण्याचा डाव असून सोयीनुसार प्रभाग पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बटणं का दाबायची, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

देशात-राज्यात कायदे वेगवेगळे आहेत का? 2-3-4 प्रभाग हा खेळ कसला? उद्या 2-2 आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहे का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? अशी शंका ठाकरे यांनी उपस्थित केली.

आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असं राज ठाकरे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

3. PM केअर्स भारत सरकारचा फंड नाही, तो RTI अंतर्गत येत नाही - केंद्राचं स्पष्टीकरण

कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीत देशवासीयांना आर्थिक मदत करता यावी, यासाठी PM Cares फंड तयार करण्यात आला होता. पण हा भारत सरकारचा फंड नाही. यामधील रक्कम भारताच्या एकत्रित निधीमध्ये जात नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयासमोर दिलं आहे.

PM Cares फंडसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये हा फंड राज्य म्हणून घोषित करावे, पारदर्शकतेसाठी याला माहिती अधिकार कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली. याच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाने त्यावर सरकारचं नियंत्रण नाही, अशी माहिती दिली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

4. स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता? - अमृता फडणवीस

राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत, ही अत्यंत दुःखद बाब आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यावर साम, दाम, दंड, भेद धोरण वापरून तोडगा काढला पाहिजे. स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस बोलत होत्या. बलात्कारी विचारांना ठेचायला हवं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र लिहून महिला अत्याचारासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा असं सांगितलं आहे.

घरातील ज्येष्ठ व्यक्तीने कर्त्या पुरुषाला पत्र पाठवलं तर कर्ता पुरुष दुसऱ्या कुटुंबात काय चाललंय, हे सांगतात, तुम्ही दहा कुटुंबांबद्दल का बोलता, असा सवाल फडणवीस यांनी केला.

5. बिगबॉसमध्ये जाण्याच्या मुद्द्यावरून कीर्तनकार शिवलीला ट्रोल

मराठी बिग बॉस या कार्यक्रमात कीर्तनकार शिवलीला पाटील सहभागी झाल्या आहेत. पण याच मुद्यावरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

तुम्हाला अशा शोमध्ये येणे शोभत नाही तर एका नेटकऱ्याने वयस्कर बायांना मालिका बघता म्हणून नाव ठेवते आणि तू स्वतः फालतू शो मध्ये जाते मग तुला लाज वाटत नाही का.. असा सवाल करत शिवलीला पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

बिग बॉसमधील एका प्रसंगात शिवलीला या रडत असतात. इतर स्पर्धक येऊन त्यांचं सांत्वन करतात, तुम्ही खूप चांगलं खेळत आहात, असं ते म्हणतात.

याच संदर्भात लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. 'ताई चुकीचं आहे हे तुम्ही लोकांना ब्रह्मज्ञान शिकवता पण स्वतः कोरडे पाषाण निघाला,' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)