रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही - रघुराम राजन

केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप करत नाही. हा खर्च करण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.

केंद्र सरकार अशी भूमिका का घेत आहे, अनेक जण केंद्र सरकारवर अवलंबून असल्याने त्यांची निराशा होत आहे, असंही रघुराम राजन म्हणाले.

सध्या राज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. केंद्रीय उपकराच्या माध्यमातून केंद्र सरकारने महसुलातील मोठा वाटा आपल्याकडेच ठेवला.

संपूर्ण देश एककेंद्री सत्तेतून हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आहे. पण अति केंद्रीकरणामुळे आपल्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात अडथळा येत आहे," असं मत राजन यांनी व्यक्त केलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. 'आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली का?'

दिल्ली आणि मुंबई येथील काही भागांत कट्टरवादी कारवाई करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो. तसंच त्यापैकी काही जणांनी मुंबई लोकलमध्ये रेकी केल्याची माहिती मिळत आहे.

पण ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडल्याचं दिसून येत आहे.

दिल्ली पोलीस येऊन दहशतवादी पकडतात, मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवली आहे का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून विचारला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

3. एअर इंडिया खरेदीसाठी टाटा कंपनीकडून बोली

कर्जाखाली दबलेली एअर इंडिया ही सरकारी मालकीची विमान कंपनी विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये टाटा कंपनीने बोली लावली आहे.

सरकार पूर्वी 2018 मध्ये एअर इंडियातील 76 टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत होते, पण त्यावेळी त्यासाठी कोणताही खरेदीदार सापडला नाही. त्यामुळे पूर्ण कंपनी विकण्याचा निर्णय घेण्यात आला.

एअर इंडियावर एकूण 43 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी 22 हजार कोटी रुपये एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेडला हस्तांतरित केले जातील.

एअर इंडियावरील 43 हजार कोटी रुपयांचे कर्ज सरकारी हमीवर आहे. टाटाने बोली जिंकल्यास त्यांना एअर इंडियामध्ये मालकी हक्क मिळतील. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. किरीट सोमय्यांकडे EDचं प्रवक्तेपद द्यावं, रोहित पवारांचा टोला

"किरीट सोमय्यांना भाजपने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. EDचे प्रवक्ते अशी काही पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केलं तर ते EDचे प्रतिनिधी असल्याचं अधिकृत होऊन जाईल. EDला कळण्याआधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही," अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे.

रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि कर्जत-जामखेडमधील विकासकामांवर चर्चा केली. दरम्यान माध्यमांशी बोलताना पवार यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्या तोडीची - जावेद अख्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली राज्यात ज्या तीन पक्षांचं सरकार स्थापन आहे, त्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. पण उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे.

ठाकरे सरकार भेदभाव अथवा अन्याय करत असल्याची टीका त्यांचे विरोधकही करू शकणार नाहीत, अशा शब्दांत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक एका लेखात केलं. ही बातमी लोकमतने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)