साई धरम तेजच्या गाडीला भीषण अपघात, कशी आहे प्रकृती?

साई धरम तेज

फोटो स्रोत, Sai Dharam Tej Instagram

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता साई धरम तेज एका अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर अपोलो उपचार असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर आणि त्याच्या नातेवाईकांकडून कळवण्यात आलं आहे.

शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री स्पोर्ट्स बाईकवरून जात असताना साई धरम तेजचा अपघात झाला. या अपघातात तो जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातानंतर साई धरम तेजला तात्काळ मेडिकोव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल केलं.

सुदैवानं त्याच्या डोक्यावर मार लागला नाही. मात्र शरीरावर इतर ठिकाणी साई धरम तेजला अनेक जखमा झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर लगेच हरपली शुद्ध

साई धरम तेजचा अपघात हैदराबादच्या माधापूर केबल ब्रिजवर झाला. साई त्याच्या स्पोर्ट्स बाईकवरून जात असताना बाईक घसरल्यानं हा अपघात झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे.

अपघातानंतर साई धरम तेज लगेचच बेशुद्ध झाला होता.

साई धरम तेज

अपघाताची माहिती कळताच दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीसह, पवन कल्याण, अल्लू अरविंद यांनी रुग्णालयात जात साई धरम तेजच्या तब्येतीची चौकशी केली.

साई धरम तेजच्या अपघातानंतरचा त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्या डोळ्याला, छातीवर, कमरेवर आणि शरीरावर इतर ठिकाणीही जखमा झाल्याचं दिसून येत आहे.

डॉक्टरांनी काय म्हटलं?

साई धरम तेजची प्रकृती स्थिर असल्याचं अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. साईच्या खांद्याचं हाड तुटलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र तरही काळजीचं कारण नसल्याचंही डॉक्टर म्हणाले.

मणक्याला आणि डोक्याला गंभीर इजा झाली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच गरजेनुसार 24 तासांनी पुन्हा चाचण्या केल्या जातील असंही डॉक्टर म्हणाले.

सध्या कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. खबरदारी म्हणून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून व्हेंटिलेटरवर उपचार दिले जात आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अभिनेता चिरंजिवीनेही एक निवेदन प्रसिद्ध करून साईच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी गुन्हा दाखल

हा अपघात रात्री 8.55 वाजता झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज वरून स्पष्ट झालं आहे. अपघात झाला तेव्हा साई धरम तेजच्या बाईकचा वेग ताशी 120 किमी एवढा होता, हेही पोलिसांनी सांगितलं आहे.

1160 सीसीचं ट्रिपल इंजिन असलेली 'ट्रिंफ' कंपनीची बाईक साई धरम तेज चालवत होता. ही बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.

साई धरम तेजची बाइक
फोटो कॅप्शन, साई धरम तेजची बाइक

साई धरम तेजनं अपघाताच्या वेळी डोक्यात हेल्मेट परिधान केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळं त्याच्या डोक्याला कुठल्याही प्रकारची गंभीर जखम झाली नाही.

गाडी चालवत असताना तो दारु प्यायलेला नव्हता हेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या अपघातामुळं इतर कोणालाही कुठल्याही प्रकारची इजादेखील झालेली नाही.

मात्र साई धरम तेजच्या विरोधात पोलिसांनी वेगानं वाहन चालवल्या प्रकरणी (रॅश ड्रायव्हिंग) गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 336 आणि मोटर वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे साई धरम तेज?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजिवी यांचा साई धरम तेज हा भाचा आहे. चिरंजीवीची बहीण विजयदुर्गा आणि शिव प्रसाद यांचा तो मुलगा आहे.

अल्लू अर्जुन, राम चरण, अल्लू शिरीष, वरुण तेज आणि निहारिका कोनिडेला हे तेलुगु कलाकार नात्याने साई धरम तेज याचे भाऊ, बहीण आहेत.

साई धरम तेज

फोटो स्रोत, Sai Dharam Tej Instagram

साई धरम तेजनं आतापर्यंत 14 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. रे, सुप्रीम, विनर, इंटेलिजन्ट, नक्षत्रम, तेज...आय लव्ह यू यांसरख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे.

त्यानं अभिनय केलेला रिपब्लिक हा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

साई धरम तेजनं चित्रपटांमधील भूमिकांच्याबरोबरच सामाजिक कार्याच्या माध्यातूनही चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)