शरद पवार काँग्रेसला का डिवचतात?

फोटो स्रोत, facebook
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
'काँग्रेसची स्थिती ही जमीन न उरलेल्या जमीनदारासारखी झाली आहे,' अशा शब्दात राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा टोमणा मारला आहे.
मुंबई तक या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसची तुलना गतवैभव गमावलेल्या एखाद्या जमीनदाराशी केली आहे.
एकीकडे देशात भाजप विरोधी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि दुसरीकडे देशातील एक महत्त्वाचे विरोधी पक्षातले नेते शरद पवार अधूनमधून काँग्रेस आणि खासकरून राहुल गांधींना चिमटे काढायला विसरत नाहीत. शरद पवार असं काँग्रेसला वरचेवर का डिवचतात?
शरद पवारांचा काँग्रेस ते राष्ट्रवादीपर्यंतचा प्रवास
शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसला रामराम करून आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे काँग्रेसबद्दलची आणि गांधी घराण्याबद्दलची त्यांच्या मनातली अढी सगळ्यांनाच ठाऊक आहे.
पण, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं अनेक वर्ष महाराष्ट्रात आणि केंद्रात संसारही केलाय. अलीकडच्या काळात मात्र देशातली राजकीय परिस्थितीही बदललीय आणि दोन्ही पक्षांची स्थितीही. त्या पार्श्वभूमीवर पवारांचं असं काँग्रेसला डिवचणं नव्याने पहावं लागेल.
2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सलग दुसरी लोकसभा निवडणूक दिमाखात जिंकली आणि ती ही आधीपेक्षा जास्त मताधिक्याने... त्यानंतर एक गोष्ट देशात स्पष्ट झाली.
भाजप आणि नरेंद्र मोदींना विरोध करायचा असेल तर सगळ्या प्रमुख आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र आलं पाहिजे.
पण, अशा विरोधी आघाडीचं नेतृत्व कुणी करायचं हा मात्र मोठा प्रश्न होता. कारण, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दोन लोकसभा निवडणुका गमावल्या होत्या. 2019 नंतर तर ते काँग्रेसचं नेतृत्व करायलाही मनाने तयार नव्हते. पण तरीही काँग्रेस देशातला दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष आहे.
आताही त्यांच्याकडे 20 टक्के म्हणजे जवळपास साडेबारा कोटी जनतेची मतं आहेत. म्हणूनच पवारांनाही याचवर्षी जून महिन्यात काँग्रेसने भाजपविरोधी आघाडीत सामील व्हावं असं सूचवलं होतं.
पण, भाजपविरोधी आघाडीची इच्छा इतकी प्रबळ आणि गरजेची असतानाही शरद पवार काँग्रेसला अधून मधून डिवचायची एकही संधी सोडत नाहीत. मुंबई तक वेब पोर्टला दिलेली पवारांची आताची मुलाखतही तसाच प्रकार होता. पण, याची नेमकी कारणं काय असावीत?
पवार काँग्रेसला अधून मधून का डिवचतात? या प्रश्नाची ढोबळ मानाने पाच कारणं देता येतील.
1. दोन्ही पक्षांचा मतदार एकच आहे
राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमधून फुटूनच तयार झालेला पक्ष आहे. पण, दोन्ही पक्षांची विचारसरणी एकच असल्यानं त्यांचा मतदारही एकच आहे.
त्यामुळे निवडणुकांमध्ये मतंही विभागली जातात. अशावेळी एकाच विचारसरणीच्या पक्षांमध्ये वैचारिक मतभेदांमुळे हा संघर्ष निर्माण झालाय का?

फोटो स्रोत, Getty Images
सकाळ वृत्त समुहाचे राजकीय पत्रकार पद्मभूषण देशपांडे याविषयी म्हणतात,
"शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तरी कधीही काँग्रेसच्या विचारसरणीपासून दूर गेले नाहीत. नेहरुंच्या काळातल्या काँग्रेसशी त्यांची नाळ जोडलेली राहिली. अशावेळी काँग्रेस पक्ष निर्नायकी अवस्थेत असणं पवारांनाही दु:खदायक आहे.
शिवाय पवारच नाही तर ममता बॅनर्जींसारखे इतरही पक्षातले जुने नेते आहेत जे विचारांनी अजूनही काँग्रेसला जवळ आहेत. पण, संघटनात्मक विरोध करतात.
अशा नेत्यांना काँग्रेसने मोठ्या मनाने आपल्या राजकीय अस्तित्वाचा स्वीकार करावा असं वाटतं. पवारांच्या मनातही ही सल दिसते. काँग्रेसनं थोडंफार बदलावं असं ते या ना त्या मार्गाने सुचवत असतात."
शरद पवार यांची ही मुलाखत घेणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार राजदीप सरदेसाईही देशपांडे यांच्या मताशी सहमत आहेत. त्यांच्यामते काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सगळ्या नेत्यांनी आपल्या नवीन पक्षाच्या नावात काँग्रेस शब्द कायम ठेवलाय यातच सगळं आलं.
"तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यातल्या कुणीच 'काँग्रेस'शी फारकत घेतलेली नाही. शरद पवारांनीही हे वक्तव्य केलं हे काँग्रेस पक्षाच्या जुन्या आठवणी जागवतानाच केलं आहे.
शिवाय ज्या वृक्षाच्या आधारावर हे इतर पक्ष सुरू झाले त्या वृक्षाची पिछेहाट होणार असेल तर एकप्रकारे त्या विचारसरणीच्या सगळ्याच पक्षांची ती पिछेहाट आहे. म्हणून शरद पवारांना दु:ख होत असावं." राजदीप यांनी आपला मुलाखती दरम्यानचा अनुभव सांगितला.
2. पवारांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा
शरद पवारांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाही प्रयत्न केले होते.
पण, ते पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसबद्दलची ही नाराजी किंवा सल सतत समोर येते का?

फोटो स्रोत, Nilesh dhotre
"आपल्याला पंतप्रधानपद मिळालं नाही ही सल त्यांच्या मनात नक्की होती आणि आहे. पण, थेटपणे ते कधीच त्यावर बोललेले नाहीत. पण, पात्रता असलेल्या व्यक्तीने अशी अपेक्षा करणं हे आपण चुकीचं म्हणू शकत नाही.
देशाचं नेतृत्व त्यांनी करावं ही त्यांची एकट्याची इच्छा नव्हती. त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि नेतेही तसं म्हणत होते, म्हणून पवारांना असलेली सल आपण समजून घेतली पाहिजे. पण, जाहीरपणे ते कधी बोलून दाखवणार नाहीत"
राजकीय लेखिका अदिती फडणीस यांंचं याविषयीचं मत थोडं वेगळं आहे. शरद पवारांनी काँग्रेसविषयी व्यक्त केलेल्या भावनांचा त्या आदर करतात. पण, पंतप्रधानपदाची अपेक्षा त्यांना अनाठायी वाटते.
"सात दशकांचा राजकारणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पण, पंतप्रधानपदासाठी तेव्हाही सर्व काँग्रेसी नेत्यांचा त्यांना पाठिंबा नव्हता. म्हणून ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. नाहीतर ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर आणखी काही नेते बाहेर पडले असते.
आताही दुसरी आघाडी उभी करायची झाली तर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसबरोबर जाणंच फायद्याचं ठरेल. नाहीतर राष्ट्रवादी हा दुसरा प्रादेशिक पक्ष आहे. पक्षाची ओळख तीच आहे."
3. गांधी घराण्यावर निष्ठा नाही
काँग्रेस पार्टी इंदिरा काँग्रेस झाल्यानंतरची पक्षाची जडणघडण ही गांधी घराण्याला केंद्रस्थानी ठेवून झाल्याचं जाणकार सांगतात. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत गांधी घराण्यातल्या व्यक्तीला एक वेगळं महत्त्व आहे.
आताही 2019 च्या निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा हंगामी का होईना पण, अध्यक्षपद पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडेच आलं. आणि 1999 ला सोनिया गांधींना विरोध करतच पवारांनी काँग्रेस सोडून आपली वेगळी चूल मांडली होती. मग काँग्रेसवर टीका हा गांधी घराण्याला विरोधच आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
याविषयी राजदीप सरदेसाई म्हणतात,
"राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दलचा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर तुम्ही निवडणुकांचे निकाल बघा आणि ठरवा एवढंच ते म्हणाले. पण, महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर राज्यकारभार करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमकपणे विधानं करतात याचा संदर्भ पवारांच्या उत्तरात नक्की असू शकेल.
राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या बैठकीत काँग्रेसकडून चांगली वागणूक मिळत नाही, अशी तक्रार नेहमी ऐकायला मिळते. आणि म्हणूनच काँग्रेसने आपली सरंजामशाही वागणूक सोडावी हेच पवारांना सुचवायचं असावं."
4. पवारांच्या वक्तव्याचं टायमिंग
काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधी यांना अध्यक्षपदी बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युवा काँग्रेसच्या अलीकडेच काश्मीरमधल्या राष्ट्रीय परिषदेत राहुल यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं असा ठराव संमत केला गेला.
पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांना आपला कौल दिला आहे. अशा हालचाली सुरू असतानाच पवार यांनी काँग्रेसवर अशी टीका केली आहे. त्यामुळे पवारांचं हे राजकीय टायमिंग आहे का यावर राजदीप सरदेसाई म्हणतात,
"टायमिंगवर मी भाष्य करणार नाही. पण, काँग्रेसमध्ये आणि देशातही एक गट असा आहे ज्यांना वाटतं की काँग्रेसने जुने विचार सोडून राजकारणाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहावं. पुढच्या वर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत.
उत्तर प्रदेश सोडला तर चारही राज्यांत काँग्रेसला चांगली संधी आहे. तीन ठिकाणी त्यांचं सरकार अस्तित्वात आहे. अशावेळी काँग्रेसनं बदलावं आणि त्यासाठी गरज पडली तर नेतृत्व बदलावं असं मानणारा गट काँग्रेसमध्येही आहे.
तसं झालं तर विचारांनी काँग्रेसशी जोडल्या गेलेल्या पवार आणि इतर G-23 नेत्यांचाही त्याला पाठिंबा असेल हे नक्की."

फोटो स्रोत, Getty Images
तर अदिती फडणीस याविषयी म्हणतात, "शरद पवार हे वास्तववादी विचार करणारे नेते आहेत. काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर मागच्या वीस वर्षांत काँग्रेस अजूनही राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्याकडे तीन राज्यं आहेत. तर राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष म्हणून राहिला आहे. शिवाय सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाच्या नेतृत्वाला विरोध करत शरद पवार यांनी दुसरा पक्ष स्थापन केला. त्यानंतर मात्र राज्यात आणि केंद्रातही ते काँग्रेसच्या नेतृखालील आघाडीत सहभागी झाले. अशा त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या राजकीय धोरणांविषयी वेळोवेळी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना देशभरात पाठिंबा न मिळण्याचं एक कारण हे ही आहे. अशावेळी आताच्या त्यांच्या विधानाचा मोठा राजकीय परिणाम घडून येण्याची शक्यता कमीच आहे."
5. महाविकास आघाडी सरकारचं काय होणार?
भाजपविरोधी आघाडीची चर्चा सुरू आसताना महाराष्ट्रात त्याचं एक उदाहरण 2019 मध्ये उभं राहिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन पक्षांचं सरकार आलं. सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात ही महाविकास आघाडी यशस्वी झाली. पण, आघाडीतले दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर एकमेकांवर तोंडसुख घेणार असतील तर ही आघाडी कशी आणि किती वेळ टिेकेल? यावर मात्र राजकीय तज्ज्ञांचं एकमत आहे.
दोघांनाही राज्यातली सत्ता टिकवायची आहे. आणि त्याबद्दल सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात स्पष्टता आहे. पण, शरद पवार यांच्या काँग्रेसवरील टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























