You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र पाऊस : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुढचे 48 तास महत्त्वाचे
राज्यात पावसाचं पुनरागमन झालं आहे. मराठवाडा तसंच विदर्भात अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाला आहे.
येत्या 2-3 दिवसांमध्ये कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसंच पुढचे 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सव अगदी 2 दिवसांवर आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मंगळवारी (7 सप्टेंबर) रात्री उशीरा झालेल्या अतिवृष्टीने पावसाचं पाणी रेलवे स्टेशनवरील ट्रॅकवरून वाहू लागलं. त्यामुळे तब्बल 4 तास मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक, आंबेडकर चौक, फुले चौक भाग पाण्याखाली गेला होता. दुकान आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालं.
धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने लेंडी आणि शाकंभरी नदीला नद्यांना पूर आला होता.
आज (8 सप्टेंबर) सकाळपासून परिस्थिती सामान्य व्हायला सुरूवात झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पैनगंगा नदीला पूर
बुलडाणा जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मंगळवार (7 सप्टेंबर) संध्याकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काही भागात पूर परिस्थिती होती. बुलडाणा तालुक्यात पैनगंगा नदीला मोठा पूर आला होता.
मुसळधार पावसामुळे धाड, गुम्मी यासह परिसरातील शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. काही भागात जमीन खरडून गेली आहे.
नळकुंड येथे अतिवृष्टिमुळे झाली त्यामुळं नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय.
अमरावतीमध्ये गणपती विक्रेत्यांना पावसाचा फटका
अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. शहरातील काही गणपती विक्रेत्यांना पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
शहरातील दस्तुर नगर परिसरात गणपती विक्रेत्याच्या दुकानात पाणी शिरले. दुकानात पाणी शिरल्याने गणेश मूर्तीचंही मोठं नुकसान झालं आहे.
जिल्ह्यातील आसेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. उभ्या पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाने माना टाकल्या आहेत.
नंदुबारमध्ये पावसामुळे दरड कोसळली
नंदुरबारमधल्या चांदसैली घाटात मंगळवारी (7 सप्टेंबर) दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे.
दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं जात होतं. रस्ता बंद असल्याने त्यांना खांद्यावर टाकून दवाखान्यात पायी नेलं जात होतं. प्रवासादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)