You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा - कोर्ट : #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. जेव्हा गायीचं कल्याण होईल तेव्हा देशाचं कल्याण होईल - अलाहाबाद हायकोर्ट
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलं आहे. गोहत्याबंदी कायद्यानुसार उत्तर प्रदेशातील एका आरोपीचा जामीन फेटाळत असताना कोर्टानं याबाबत भाष्य केलं. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा. तसंच गायीला मुलभूत हक्क देण्यासाठी सरकारने संसदेत विधेयक आणावं, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
"एवढंच नाही तर गायींचं रक्षण करण्यासाठी कठोर कायदा असावा. गायीचं रक्षण करणं हे केवळ एका धर्म पंथाचं कार्य नसून गाय ही भारतीय संस्कृती आहे. जेव्हा गायीचं कल्याण होईल तेव्हा देशाच कल्याण होईल," असं मत अलाहाबाद हायकोर्टाने मांडलं आहे.
गोहत्या बंदी अधिनियमाअंतर्गत जावेदला अटक झाली होती. त्यावर सुनावणी करत असताना हायकोर्टाने हे मुद्दे मांडले आहेत. याप्रकरणी जावेदचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
2. 'पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा', चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
"आता शिवसेनेशी यूती नको, स्वबळावर लढूया," असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
"राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा," म्हणून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. पाठीत खंजिर खुपसणारे, असं म्हटलं की राजकारणात आतापर्यंत एकच नाव समोर येत होतं पण आता दुसरा चेहरा समोर येतो असं ते म्हणाले. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
'नाव मोठं आणि लक्षण खोटं' असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा यूतीच्या चर्चांना उधाण आलं होतं, पण चंद्रकांत पाटील यांनी यूती नको, असं म्हणत चर्चेला पूर्णविराम दिलाय.
३. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी एखाद्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते - राकेश टिकैत
उत्तर प्रदेश निवडणुकांआधी एखाद्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते, असं वादग्रस्त विधान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे. तसंच भाजपपेक्षा घातक पक्ष कोणताही नाही, असंही ते म्हणााले आहेत.
हरियाणाच्या सिरसा येथे शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
ते म्हणाले, "उत्तर प्रदेशात ते हिंदू-मुस्लीम मुद्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या ते प्रयत्नात आहेत. निवडणुकीआधी एखाद्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते. त्यांच्यापासून सावधान राहा."
"या देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. भाजपपेक्षा कोणताच पक्ष घातक नाही. ज्या लोकांनी पक्ष उभारला त्यांनाच आज कैद केलं आहे. ज्या एसडीएमने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहेत. हे आम्हाला खलिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू," असंही राकेश टिकैत म्हणाले.
4. जमीयत संघटनेचा मुलींसाठी 'हा' आहे नवीन फतवा
मुस्लीम मुलींचं धर्मांतर रोखण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याची गरज असल्याचं जमीयत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने म्हटलं आहे. यासंदर्भात संघटनेने एक फतवा काढल्याचंही समोर आलं आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
मुस्लीम मुलींनी मुलांसोबत शिकू नये, असा हा फतवा काढण्यात आला आहे. काही गैरमुस्लीम संघटित मुलं मुस्लीम मुलींशी लग्न करत आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे, असंही संघटनेने म्हटलं आहे.
यापार्श्वभूमीवर मुस्लीम मुलींना आपल्या धर्मासंबंधी ज्ञान असावं यासाठी स्वतंत्र शाळा असाव्यात, यात मुलांना परवानगी नसावी अशी भूमिका जमीयत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात मांडली आहे.
जमीयत-उलेमा-ए-हिंद संघटनेचे अध्यक्ष अशरद मदनी म्हणाले, "मुस्लीमांसोबतच गैरमुस्लीमांनीही मुलींसाठी वेगळ्या शाळा सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे हे प्रकार रोखले जातील."
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी यावर टीका केलीय. यूपीत मुलगा आणि मुलगी समान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हेच लोक मुस्लीम तुष्टीकरणासाठी जबाबदार आहे असंही ते म्हणाले. तर मंत्री मोहसीन रजा यांनीही जमियतच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
ते म्हणाले, "टोपी घातल्याने कोणी मौलाना होत नाही. त्याला ज्ञानाची गरज असते. अशरद मदनी हे देशविरोधी आणि तालिबानी विचारांचे आहेत."
5. राज्यत पुन्हा कडक निर्बंध?
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूर्व तयारी सुरू केली असून उपाययोजना केल्या जात आहेत. आगामी काही आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढली तर सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
बाजारपेठा आणि प्रवासादरम्यान होणारी गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. पण तूर्तास रात्रीची संचारबंद लागू केलेली नाही, असंही अस्लम शेख यांनी स्पष्ट केलंय. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा कोव्हिड टास्क फोर्सने दिल्याचं त्यांनी सांगितलं. अशी परिस्थिती उद्भवल्यास निर्बंधांचा पुन्हा विचार केला जाणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)