गूढ तापामुळे उत्तर प्रदेशमध्ये लहान मुलांचा मृत्यू

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

उत्तर प्रदेशात गेल्याकाही दिवसांपासून एका गूढ आजाराने थैमान घातलंय. या आजारामुळे लहान मुलांचा तापाने फणफणून मृत्यू होतोय.

या अज्ञात आजारामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झालाय. तर, बहुतांश लहान मुलांचा मृत्यू ताप आल्यामुळे झाला असल्याची माहिती आहे. उत्तरप्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत शेकडो मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलांनी सांधेदुखी, डोकेदुखी, डीहायड्रेशन आणि उलटी होण्याची तक्रार केलीये. तर, काही मुलांच्या शरीरावर रॅश (चट्टे) उठल्याचंही दिसून आलंय.

भारत कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच, लहान मुलांना होणाऱ्या या गूढ आजाराची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दगावलेल्यांपैकी एकाही व्यक्तीची कोव्हिड-19 चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही.

या जिल्ह्यांमध्ये गूढ आजाराचं थैमान

उत्तरप्रदेशातील आग्रा, मथुरा, मैनपूरी, इटावा, कासगंज आणि फिरोजाबाद या जिल्ह्यांमध्ये या गूढ आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

परिसरातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डासांमुळे पसरणारा डेंग्यू या मृत्यूचं प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.

डॉ. निला कुलश्रेष्ठा फिरोजाबाद जिल्ह्यातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. त्या सांगतात, "रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे." फिरोजाबादमध्ये गेल्या आठवड्यात 40 लोकांचा मृत्यू झालाय ज्यात 32 मुलांचा समावेश आहे.

तज्ज्ञ म्हणतात, अनेक रुग्णांना रुग्णालयात नेत असताना त्यांचे प्लेटलेट काउंट कमी झाल्याचं दिसून आलंय. शरीरातील प्लेटलेट कमी होणं हे डेंग्यू झाल्याचं प्रमुख लक्षण आहे.

डेंग्यू कसा होतो?

डेंग्यू Aedes aegypti जातीच्या डासांमुळे पसरतो. हे डास घरातील शुद्ध पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रम, भांडी यात अंडी घालतात.

डासांमुळे पसरणाचा डेंग्यू गेले 100 वर्षापेक्षा जास्त काळापासून भारतात आढळून येतो. जगभरातील 100 देशांमध्ये डेंग्यू हा स्थानिक आजारासारखा आहे. पण, डेंग्यूच्या 70 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस या आशिया खंडात आढळून येतात.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डेंग्यूचे चार व्हायरस आहेत. लहान मुलांना दुसऱ्यांदा डेंग्यू झाला. तर, मृत्यूची शक्यता पाच पटीने अधिक वाढते.

डॉ. स्कॉट हालस्टेड डासांपासून पसरणाऱ्या आजारांचे तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, "माणूसच त्यांना प्रजननासाठी जागा उपलब्ध करून देतो. त्यामुळे या डासांना घालवणं माणसांच्याच हाती आहे."

जगभरात दरवर्षी डेंग्यूमुळे गंभीर आजार झाल्याची 10 कोटी प्रकरणं आढळून येतात.

ज्यामध्ये, खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव आणि शरीरातील अवयवांना इजा झाल्याचं पहायला मिळतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, "कोव्हिड-19 आणि डेंग्यूचा एकत्रित धोका खूप भयावह आहे. मोठ्या संख्येने लोकांचा यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे,"

उत्तरप्रदेशात जॅपनीज एन्सेफलायटीसचं प्रमाण किती?

उत्तरप्रदेशात 1978 साली पहिल्यांदा जॅपनीज एन्सेफलायटीस आजार आढळून आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत या आजाराने 6500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जॅपनीज एन्सेफलायटीस प्रामुख्याने नेपाळ सीमेलगतच्या गोरखपूर आणि इतर भागांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या भागात अनेकवेळा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे डासांना प्रजननासाठी योग्य जागा उपलब्ध होते.

जॅपनीज एन्सेफलायटीसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या रोखण्यासाठी लसीकरण मोहीम 2013 पासून सुरू करण्यात आली आहे पण, या आजारामुळे अजूनही लहान मुलांचे मृत्यू होत आहेत. यावर्षात गोरखपूरमध्ये जॅपनीज एन्सेफलायटीसची 428 प्रकरणं आढळून आली असून 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एन्सेफलायटीस आणि मायोकार्डायटीसच्या वाढत्या केसेसमुळे 2014 साली संशोधकांनी गोरखपूरमध्ये 250 मुलांवर अभ्यास केला होता. मायोकार्डायटीसमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज येते.

संशोधकांना आढळून आलं की, 160 मुलांमध्ये 'स्कर्ब टायफस' आजारासाठी कारणीभूत बॅक्टेरियाविरोधात अॅन्टीबॉडीज तयार झाल्या होत्या. हा आजार लहान किड्यांपासून होतो. ज्याला आपण माईट्स असं म्हणतो.

उत्तरप्रदेशात 2015 ते 2019 या काळात करण्यात आलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की, पावसाळ्यानंतर मुलांना आणि प्रौढांना येणाऱ्या तापासाठी डेंग्यू आणि 'स्कर्ब टायफस' हे दोन आजार प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

त्याचसोबत, पावसाळ्यात तापाचे रुग्ण वाढण्यासाठी लेप्टोस्पायरोसिस आणि डासांमुळे पसरणारा चिकनगुनिया कारणीभूत आहे.

पावसाळ्यानंतर वाढणाऱ्या आजारांवर संशोधन करणारे प्रो. वी रवी, नॅशलन इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थमध्ये (Nimhans) विषाणूजन्य आजारांवर काम करतात. ते म्हणतात, "पावसाळ्यानंतर अचानक विविध प्रकारच्या आजारांमध्ये अचानक वाढ होते. रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एका ठोस सर्व्हेलन्स प्रणालीची गरज आहे."

साल 2006 मध्ये संशोधकांनी उत्तरप्रदेशात झपाट्याने पसरणाऱ्या अशाच एका गूढ आजारावर संशोधन केलं होतं. या साथीतही लहान मुलांचे मृत्यू झाले होते. मुलांचे मृत्यू कासियाबीन खाल्यामुळे झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं.

संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, "गरिबी, अन्न न मिळाल्याने, पालकांचं लक्ष नसल्याने आणि खेळण्यासाठी वस्तू उपलब्ध नसल्याने मुलं झाडांसोबत खेळत होती त्यातून मुलांना विषबाधा होऊन मृत्यू झाला."

हे आजार कसे, कुठून आणि केव्हा सुरू झाले. लोकांमध्ये कसे पसरले याबाबत जास्त माहिती उपलब्ध होत नाही. रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा प्रवास याबाबतही माहिती नाही. या मुलांना टीबी झाला होता का? याबाबतही फारशी माहिती उपलब्ध नाही.

उत्तरप्रदेशात झपाट्याने पसरणारा हा गूढ आजार डेंग्यू असेल. तर, डेंग्यू रोखण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत हे स्पष्ट आहे. डॉ. हालस्टेड म्हणतात, "लहान मुलांमध्ये होणारा आजार किती गंभीर आहे. हे ओळखण्यासाठी अॅन्टीबॉडी टेस्ट महत्त्वाची आहे. या सिरोसर्व्हेमुळे आजार कोणत्या वयोगटात किती मुलांना झाला आहे याची माहिती मिळू शकते".

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)