You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : मंदिरं सुरू करण्याच्या आंदोलनात भाजपला कोरोना नियमांचा विसर
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
राज्यातील मंदिरे उघडावीत यासाठी भाजपकडून पुण्यात कसबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी नियम पाळून मंदिरे उघडू द्यावी अशी मागणी करण्यात आली. असं असलं तरी भाजपच्या आंदोलनात अनेकांनी मास्क घातला नव्हता तसेच सोशल डिस्टन्सिंग देखील पाळण्यात आलं नाही.
या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांनी कसबा मंदिरात जाऊन आरती केली.
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्रीची संचारबंदी लावण्याबाबत देखील सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकार खबरदारी घेण्याबाबत सूचना करत असताना दुसरीकडे भाजपकडूनच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास मंदिर उघडण्यासाठी कसबा मंदिरासमोर भाजप कडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील काही अपवाद वगळता कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग देखील कुठेही पाळण्यात आले नाही.
आंदोलनात चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मास्क घातला होता. परंतु भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर कार्यकर्ते विनामास्क दिसून आले. नियम करून मंदिरे सुरू करावीत अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
आंदोलनाला संबोधित करताना पाटील म्हणाले, "आजपासून भारतीय जनता पार्टी हे गृहीत धरत आहे की तुमचं नाक दाबलं की तोंड उघडतं, तुम्ही संध्याकाळपर्यंत ऑर्डर काढणार. म्हणून आजपासून मंदिरात प्रवेश सुरू."
"आपण नियम पाळणारे आहोत" असे देखील ते यावेळी म्हणाले. मंदिरे उघडले नाहीत तर जनतेचे शाप तुम्ही घ्याल असे देखील पाटील उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.
नियम पाळून मंदिरे सुरू करावीत अशी मागणी करत असताना आंदोलनात मात्र कोरोनाचे नियम पाळण्यात न आल्याबाबत बीबीसी मराठीने महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले, मोहोळ म्हणाले, "आंदोलन आहे गर्दी झाली. आंदोलनात देखील नियम पाळले पाहिजेत याबाबत दुमत नाही. परंतु मंदिरांच्याबाबतीत नियमांना बगल देऊ नये. त्यामुळे मंदिरे सुरू करण्यासाठी नियम करून परवानगी देण्यात यावी."
...तर तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल - उद्धव ठाकरे
"कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. आपल्याला हे टाळायचं आहे. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल," असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
"अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. कोणत्याही राजकीय स्वार्थ किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असं वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो की, आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका.
कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. आपल्याला हे टाळायचं आहे. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावणी दिली, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देऊ नका," असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते.
भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात - सचिन सावंत
भाजपने मंदिर उघडण्याबाबत आंदोलन केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून भाजपवर टीका केली. सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही"
"भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे."
"रुग्ण वाढले तर मोदी टीका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये."
पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांवर
ऑगस्टच्या सुरुवातीला पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांच्या खाली आला होता. ऑगस्टच्या पाहिल्या आढवड्यात पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 2.64 टक्के इतका होता. परंतु शहरात पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून शेवटच्या आठवड्यात पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 3.6 टक्के इतका वाढलेला दिसून आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)