मध्यप्रदेश: बेदम मारहाण करुन गाडीला बांधून खेचल्यानंतर आदिवासी तरुणाचा मृत्यू

मध्य प्रदेश
    • Author, शुरैह नियाजी
    • Role, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

मध्यप्रदेशमधील नीमच याठिकाणी एका आदिवासी तरुणाला किरकोळ वादावरुन मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला गाडीला बांधून दूरपर्यंत फरपटत नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

या तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना 26 ऑगस्टला घडल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भातला एक व्हीडिओ 28 ऑगस्टला समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दोन मुख्य आरोपींसह इतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आदिवासी तरुण कन्हैया लाल भील काही लोकांसोबत आपल्या गावी जात होते. तेव्हा त्यांची बाईक गुर्जर समाजातील एका व्यक्तीला लागली. याप्रकरणी परिसरातील गुर्जर समाजातील लोक एकत्र आले आणि त्यांनी कन्हैया लाल यांना बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना पिकअप वाहनाला बांधले आणि खेचून नेण्यात आले."

मध्य प्रदेश

या घटनेचा एका व्यक्तीने व्हीडिओ सुद्धा बनवला. नीमच पोलिस अधिक्षक सूरज कुमार वर्मा यांनी सांगितलं, "घटना सिंगोली ठाण्याची आहे. आठ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना लवकरच अटक केली जाईल."

पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेतले आहे.

आदिवासी तरुण त्यांची वारंवार माफी मागत होता तरीही त्याला मारहाण केली जात होती असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. कन्हैया लाल यांना मारहाण केल्यानंतर आणि गाडीला बांधून खेचल्यानंतर गुर्जर समाजातील लोकांनीच पोलिसांना फोन केला आणि चोराला पकडलं असल्याचं सांगितलं.

मध्य प्रदेश

या घटनेचा व्हीडिओ नंतर समोर आला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दखल घेतली. याप्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट केलं आहे. "आता नीमच जिल्ह्यातील सिंगोली येथे कन्हैया लाल भील नावाच्या आदिवासी व्यक्तीसोबत अत्यंत विदारक आणि अमानवीय घटना समोर आली आहे. चोरीची शंका घेऊन तरुणाला बेदम मारण्यात आलं आणि त्यानंतर गाडीला बांधून खेचण्यात आलं, यात त्याचा मृत्यू झाला. "

"सतना, इंदौर, देवास आणि आता नीमच येथ अमानवीय घटना? संपूर्ण देशात अराजकतेचे वातावरण आहे. लोक कायदा हातात घेत आहेत. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. सरकार कुठेही दिसत नाही?"

सरकारने याप्रकरणात तातडीने कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली. मध्यप्रदेशात गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

इंदूरमध्ये बांगड्या विकणाऱ्याला मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
फोटो कॅप्शन, इंदूरमध्ये बांगड्या विकणाऱ्याला मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

गेल्या रविवारी (22 ऑगस्ट) मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी इंदौर येथे मुस्लीम बांगडी विक्रेत्याला मारहाण केरण्यात आली आणि हिंदू परिसरात बांगड्यांची विक्री न करण्यासाठी धमकी देण्यात आली.

यासंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. पण मारहाणीच्या या प्रकरणात आता पोलिसांनी ज्या तरुणाला मारहाण झाली त्यावर पॉक्सो कायदा, छेडछाड आणि 420 सह 9 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

याव्यितिरिक्त देवास जिल्ह्यात हाटपीपल्या ठाणे क्षेत्रात आधार कार्ड दाखवू शकला नाही या कारणावरुन रस्त्यावर टोस्ट विकणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीला कथित मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)